Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांच्या विचारापासून, बाळासाहेब यांच्या विचारापासून ते कोसो दूर निघून गेले आहेत. शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यस्पद आहे, अशी टीका खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज कोल्हापूरमध्ये केली. कोल्हापूरमध्ये डॉक्टर संघटनेसोबत बैठक झाल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
या निवडणुकीमध्ये लोकच तुम्हाला घरी बसवणार आहेत
श्रीकांत शिंदे म्हणाले की, आता त्यांच्याकडून लोकांची दिशाभूल करणारे वक्तव्ये येत आहेत. ज्या काँग्रेसचा विरोध हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर केला, त्याच काँग्रेसला मांडीवर घेऊन बसले आहेत. या निवडणुकीमध्ये लोकच तुम्हाला घरी बसवणार आहेत. दरम्यान, लाडकी बहीण योजनेवरून होणाऱ्या टीकेला शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले. 1500 रुपये मध्ये काय होते म्हणतात, जे कधी स्वतःच्या घराबाहेरून निघाली नाहीत त्यांना दुसऱ्याच्या घरात काय सुरू आहे कसे कळणार? अशी टीका त्यांनी केली. ते माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं मर्यादित आहेत. पंधराशे रुपयांमध्ये मुलांची फी देता येते, घर खर्च भागू शकतो, छोटा मोठा उद्योग सुरू करू शकतो या स्टोरीज आपण दाखवल्या असल्याचे ते म्हणाले. गरिबांसाठी पंधराशे रुपये महत्त्वाचे आहेत. वचननाम्यात पंधराशे रुपयांचे पुढील काळात 2100 रुपये देणार असल्याचे त्यांनी सांगितलं. ज्यांची देण्याची दानत नाही ते कधीच देऊ शकत नाही, ते फक्त घेण्याचं काम करू शकतात, बंद करण्याचं काम करू शकतात अशी टीका त्यांनी केली. अडीच वर्षांमध्ये सर्वच गोष्टी स्थगित केल्या, सर्व गोष्टी बंद केल्या होत्या, पण आमचं सरकार आल्यानंतर रेकॉर्ड ब्रेक योजना आम्ही सुरू केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र पायाभूत सूविधा आणि स्टार्टअपमध्ये एक नंबरला आहे. आता योजनांमध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे. महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे म्हणून कालच्या मेळाव्यात आम्ही दहा योजना जाहीर केल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही
दरम्यान कोल्हापूर उत्तरच्या घडामोडींवरून सुद्धा त्यांनी टीका केली. महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ राहिलेला नाही. महाविकास आघाडीमध्ये प्रत्येक जण मुख्यमंत्री चेहऱ्याच्या अडकले आहेत. महायुतीच्या सर्व जागा व्यवस्थित वितरित झाल्या आहेत. आम्ही खुर्चीच्या लालसेपोटी एकत्र आलो नाही, आम्हाला महाराष्ट्र पुढे घेऊन जायचं असल्याचे श्रीकांत शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यासाठी धावपळ सुरू आहे. ताळमेळ नसल्यास काय प्रकार होऊ शकतो हा प्रकार कोल्हापूर उत्तरचा प्रकार उत्तम उदाहरण असल्याचे ते म्हणाले. कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेना धनुष्यबाण चिन्हावर राजेश क्षीरसागर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील, यामध्ये शंका नसल्याने त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या