Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले असून आता राज्यसभेसाठी निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाकडून परस्परांना उमेदवार मागे घेण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, दुपारी तीनपर्यंत कोणीही अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक पार पडणार आहे.


भाजपा आणि शिवसेना यांच्यात कांटे की टक्कर बघायला मिळणार आहे. या निवडणुकीत प्रत्येक आमदाराचे मत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सध्या पक्ष आणि अपक्ष आमदारांचा भाव वधारला आहे. पालघर जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांच्या मतांसाठी आता दोन्ही पक्ष झटत असताना दिसत आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आपले पत्ते अजून खुले केलेले नाहीत. त्यामुळे ही तीन निर्णायक मते कुणाला मिळणार याबाबत आता तर्कविर्तक लावले जात आहेत.  ही तीन मते कुणाला हे अजून, हितेंद्र ठाकूरांनी स्पष्ट केलेले नाही.


वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर, नालासोपाराचे आमदार क्षितिज ठाकूर, बोईसरचे आमदार राजेश पाटील असे तीन आमदार बहुजन विकास आघाडीकडे आहेत. बविआने महाविकास आघाडीला सत्ता स्थापनेसाठी सुरुवातीला पाठिंबा दिला होता. वसई विरार क्षेत्रात बविआचं प्रभूत्व आहे. या भागात शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे आतापर्यंत बविआला शिवसेना ठक्कर देत आली आहे. 


क्षितिज ठाकूरांच्या विरोधातही शिवसेनेने प्रदीप शर्मांना तिकिट दिलं होतं. त्यावेळीही बविआ आणि सेना यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. मात्र बविआ ही नेहमी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने राहिली आहे. आता मात्र परिस्थिती वेगळी आहे. हितेंद्र ठाकूरांचे चुलत बंधू दीपक ठाकूर यांचे मोठे पुत्र मेहुल ठाकूर उर्फ मॉन्टी यांच्यावर सध्या ईडीचा सासेमिरा सुरु आहे. ते 2 मार्चला वैद्यकीय जामिनावर सुटून आले आहेत. त्यामुळे हितेंद्र ठाकूर भाजपाशी वैर घेणार नाहीत, असं बोललं जात आहे. त्याचमुळे हितेंद्र ठाकूर भाजपला मतदान करणार की शिवसेनेला? यावर सध्या मतदारसंघात चर्चा सुरु आहे.  


महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल


सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ


शिवसेना - 55
राष्ट्रवादी - 53 
काँग्रेस - 44
बहुजन विकास आघाडी - 3 
समाजवादी पार्टी - 2
प्रहार जनशक्ती पार्टी - 2 
माकप - 1
शेकाप - 1 
स्वाभिमानी पक्ष - 1 
क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1 
अपक्ष - 9


सत्ताधाऱ्यांकडे एकूण संख्याबळ - 172


......................


विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ 


भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1 
राष्ट्रीय समाज पक्ष - 1 
अपक्ष - 4


विरोधाकडे असलेले एकूण संख्याबळ - 112


इतर महत्वाच्या बातम्या


Rajya Sabha Election: भाजपनं पैसा वाया घालवू नये, सामाजिक कार्यात वापरावा, चटक लावू नये- संजय राऊत


राज्यसभा निवडणुकीचा धुरळा; आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भाजप, मविआ लागले कामाला


Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची घोडे कुठे अडले?'