Mumbai Corona Vaccination Update : मुंबईत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला गती देण्यासाठी आणि वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेनं (BMC) एक विशेष मोहीम हाती घेतली आहे. विशेषतः 12 ते 14 आणि 15 ते 17 वर्ष वयोगटातील मुला-मुलींचं लसीकरणाचं प्रमाण वाढवण्यासाठी मुंबईत केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 'हर घर दस्तक' ही मोहीम राबवण्यात येत आहे. ही मोहीम दिनांक 1 जून 2022 पासून सुरु करण्यात आली आहे. दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. घराजवळच्या कोरोना लसीकरण केंद्रावर जाऊन पात्र व्यक्तिंनी लस घ्यावी, यासाठी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. 


कोरोना लसीकरण जलद करण्यासाठी 'हर घर दस्तक' मोहीम 



  • दिनांक 31 जुलै 2022 पर्यंत राबवणार मोहीम

  • 12 ते 14 आणि 15 ते 17 वयोगटातील मुलांचं प्राधान्यानं लसीकरण


केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिनांक 16 जानेवारी 2021 पासून कोविड-19 विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. या अंतर्गत 18 वर्ष वयावरील सर्व पात्र नागरिकांचं पहिल्या मात्रेचं 112 टक्के आणि दुसर्‍या मात्रेचं 101 टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आलेलं आहे. 


दिनांक 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 17 वर्ष वयोगटातील लाभार्थ्‍यांचं तसेच दिनांक 16 मार्च 2022 पासून 12 वर्ष ते 14 वर्ष वयोगटातील लाभार्थ्‍यांचं कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण करण्‍यात येत आहे. यासाठी महानगरपालिका आणि शासकीय रुग्णालयात 107, खासगी रुग्णालयात 125 अशी एकूण 232 कोविड-19 लसीकरण केंद्रं कार्यन्वित करण्यात आली आहेत. 


12 ते 14 वयोगटातील लाभार्थ्‍यांचं पहिला डोस असलेल्यांचं 28 टक्के आणि दुसरा डोस असलेल्यांचं 12 टक्के लसीकरण झालं आहे. तर 15 ते 17 वयोगटातील लाभार्थ्‍यांपैकी पहिला डोस असलेल्यांचं 57 टक्के आणि दुसरा डोस असलेल्यांचं 45 टक्के लसीकरण झालेलं आहे. थोडक्यात, 18 वर्षांवरील पात्र नागरिकांच्या तुलनेत 12 ते 17 या वयोगटातील लसीकरण हे अत्यंत कमी प्रमाणात झालं आहे.


कोविड संसर्गाच्या चौथ्या लाटेच्या संभाव्य धोका लक्षात घेता, कोविड लसीकरण गतिमान करण्यासाठी आणि सामाजिक प्रतिकार क्षमता निर्माण करण्यासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दिनांक 1 जून, 2022 ते 31 जुलै 2022 पर्यंत 'हर घर दस्तक मोहीम 2' राबविण्यात येत आहे. यामध्ये 12 ते 14 वर्ष आणि 15 ते 17 वयोगटातील सर्व मुलांचं प्राधान्यानं लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासोबतच वृद्धाश्रमातील आणि इतर वरिष्ठ नागरिक (60 वर्ष आणि अधिक) यांना प्रतिबंधात्मक मात्रा (बूस्टर डोस) देण्याकरिता कार्यवाही केली जाणार आहे.  


या मोहिमेत महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येत आहेत. या भेटीआधारे 12 ते 14 आणि 15 ते 17 वयोगटातील पहिली आणि दुसरी मात्रा न घेतलेली मुलं तसेच प्रतिबंधात्मक मात्रा न घेतलेले 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांच्या याद्या तयार करण्यात येत आहेत. लस घेण्यासाठी घराजवळच्या लसीकरण केंद्रावर जाण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच विभाग पातळीवरील शाळा आणि महाविद्यालयात विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांसोबत महानगरपालिकेचं वैद्यकीय आरोग्य अधिकारी समन्वय साधत आहेत. जेणेकरुन, पात्र विद्यार्थ्यांचं लसीकरण करता येईल. या मोहिमेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी म्हणून आणि त्याद्वारे लसीकरणाला वेग देण्यासाठी विविध समाज माध्यमांचा देखील उपयोग करण्यात येत आहे.


मुंबईतील सर्व पात्र नागरिकांनी आपले लसीकरण पूर्ण करून घ्यावं. त्याचप्रमाणे आपल्या पात्र पाल्यांचे देखील लसीकरण पूर्ण करुन घ्यावं, असं आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांनी केलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :