Rajya Sabha Election 2022 : राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध करण्याच्या महाविकास आघाडीच्या प्रयत्नांना अपयश आले असून आता राज्यसभेसाठी निवडणूक होणार यावर शिक्कामोर्तब झालेय. राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्षाकडून परस्परांना उमेदवार मागे घेण्यासाठी ऑफर देण्यात आली होती. मात्र, दुपारी तीनपर्यंत कोणीही अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळे आता राज्यसभेची निवडणूक अटळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे उमेदवार रिंगणात असले तरी महाविकास आघाडी सरकारची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. 


ना भाजपने उमेदवार अर्ज मागे घेतला... ना शिवसेनेने... दुपारपर्यंत चर्चेच्या फेऱ्या झाल्या मात्र अखेर दोन्ही बाजूने माघार घेतली नाही. त्यामुळे राज्यसभेत सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात उतरले आहेत, आणि येत्या 10 तारखेला राज्यसभा कोण जिंकणार याचा फैसला होईल. सकाळी साडेदहाच्या सुमारास राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शिवसेनेचे अनिल देसाई आणि काँग्रेसच्या सुनील केदार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पोहोचले आणि राज्यसभेच्या बदल्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीची चर्चा सुरू झाली.


महाविकास आघाडीकडून भाजपला ऑफर देण्यात आली ज्यामध्ये भाजपनं राज्यसभेचा तिसरा उमेदवार मागे घ्यावा आणि त्याबदल्यात विधानपरिषदेच्या पाच जागा लढवाव्यात असं सांगितलं. पण भाजपकडून हाच प्रस्ताव महाविकास आघाडीलाही दिला.  ज्यानुसार महा विकास आघाडीचा एक उमेदवार मागे घ्यावा आणि त्याबदल्यात विधानपरिषदेला 6 जागा महाविकास आघाडीने लढवाव्यात. 


भाजपचा हा प्रस्ताव घेऊन महाविकास आघाडीचे नेते पुन्हा चर्चेला बसले.  आणि शिवसेनेने मित्रपक्षांना एक प्रस्ताव दिला.  या प्रस्तावानुसार शिवसेनेने राज्यसभेची दुसरी उमेदवारी मागे घेण्याची तयारी दाखवली मात्र त्या बदल्यात शिवसेनेने विधान परीषदेच्या तीन जागा मागितल्या. काँग्रेसच्या कोट्यातील विधान परीषदेची जागा निवडूणक येण्यास मोठी अडचण आहे.... त्यामुळे हा प्रस्ताव दिला. पण या प्रस्तावावरही जुळलं नाही. 


खरं तर महाराष्ट्रात तब्बल 18 वर्षानंतर आता राज्यसभेची निवडणूक होणार आहे. यासाठी महाविकास आघाडी आणि भाजप यांनी एकमेकांना प्रस्ताव दिले परंतु ते मंजूर झाले नाहीत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे. आता या निवडणुकीत कोण बाजी मारत यावर येणाऱ्या काळातलं राजकारण ठरणार आहे.


महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल


सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ


शिवसेना - 55
राष्ट्रवादी - 53 
काँग्रेस - 44
बहुजन विकास आघाडी - 3 
समाजवादी पार्टी - 2
प्रहार जनशक्ती पार्टी - 2 
माकप - 1
शेकाप - 1 
स्वाभिमानी पक्ष - 1 
क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1 
अपक्ष - 9


सत्ताधाऱ्यांकडे एकूण संख्याबळ - 172


......................


विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ 


भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1 
राष्ट्रीय समाज पक्ष - 1 
अपक्ष - 4


विरोधाकडे असलेले एकूण संख्याबळ - 112