मुंबई: स्वाभिमानी शेतकरी संघटना सध्या तरी महाविकास आघाडीसोबत जाणार नसून स्वतंत्रपणे सहा जागा लढवणार असल्याची माहिती संघटनेचे प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिली. हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात (Hatkanangale Lok Sabha Constituency) राजू शेट्टी स्वतः निवडणूक लढवणार आहेत. तर रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाण्यातून (Buldhana) निवडणूक लढवण्याचं घोषित केलं आहे. 


शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी भेट घेतली. शेतकरी प्रश्नावर ही भेट असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. त्याशिवाय आपण सध्यातरी महाविकास आघाडी मध्ये जाणार नसून स्वतंत्र सहा जागा लढवणार ठाम असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या मागण्या संदर्भात जोपर्यंत महाविकास आघाडीकडून काही गोष्टींचे स्पष्टीकरण मिळत नाही तोपर्यंत कुठलाही विचार करणार नसल्याचं शेट्टी यांनी प्रतिक्रिया त्यांना सांगितलं


राजू शेट्टी यांची भूमिका ही एका स्वतंत्र पक्षाची भूमिका असून जे जे हुकूमशाहीच्या विरोधात फोर्स म्हणून सोबत येतील ते इंडिया आघाडीत आमच्या सोबत असतील अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. 


राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष इंडिया आघाडीत न जाता लोकसभेच्या सहा जागा लढवणार ठाम आहे. 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कोणत्या जागांवर दावा


1) हातकणंगले 
2) कोल्हापूर
3) सांगली
4) माढा
5) परभणी 
6) बुलढाणा 


काय म्हणाले राजू शेट्टी?


आज मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. राजकीय हेतूने भेटलो नाही तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी म्हणून भेटलो होतो. त्यांची अदानी उद्योग समूहाविरोधात जी लढाई सुरू आहे त्या अदानींचा आम्हा शेतकऱ्यांना सुद्धा मोठा त्रास होत आहे. एक तर केंद्र सरकारने अदानीवरील प्रेमापोटी आयात होणाऱ्या खाद्यतेलावर पाच टक्के आयात शुल्क कमी केल्यामुळे सोयाबीनला भाव नाही. 2000 साली असलेला भाव चार हजार होता, 24 वर्षानंतर तो आताही तेवढाच आहे. याचं कारण मोठ्या प्रमाणात कच्चे तेल जे बाहेरच्या देशातून आयात झालं आहे त्याच्यावर आयात शुल्क 2025 पर्यंत पाच टक्के कमी केल्यामुळे परिणाम झाला आहे. 


सोयाबीनच्या प्रश्नावर कर्जमाफीच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये दौरा सुरू करणार आहे आणि त्यासाठी अदानी विरोधात जी उद्धव ठाकरे शिवसेना यांची जी लढाई आहे ती शेतकऱ्यांची सुद्धा लढाई आहे. कारण शेतकऱ्यांच्या आत्महत्या या अडीच टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचबरोबर आमचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वैणगंगा नदीवर पावणेचार टीएमसीचं पाडगावचे धरण आहे. त्या धरणाचे पाणी वापरून अदानी उद्योग समूह आठ हजार चारशे कोटी रुपये खर्च करून सिंधुदुर्गात 2100 मेगावॅटची वीज निर्मिती करणार आहे आणि त्याचबरोबर कोल्हापूर आणि सीमा भागातील जनतेला शेतीला पाणी कमी पडणार आहे. 


या विरोधात सुद्धा आम्ही आंदोलन सुरू करतो आहोत. एक संघर्ष समिती या प्रकल्पासाठी निर्माण केले आहे म्हणून सिंधुदुर्गातील जनतेची आम्हाला साथ हवी आहे. म्हणून सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर मधील जनतेने एकत्र मिळून हा लढा उभारला पाहिजे. अदानी समूहाला पाणी देऊन उलटी गंगा वाहण्याचं काम सुरू आहे. 


या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा मिळावा, शिवसेनेचा पाठिंबा मिळावा यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि शेतकऱ्यांच्या लढ्यामध्ये आम्ही नेहमी तुमच्यासोबत राहू असं आम्हाला ठाकरेंनी आश्वासन दिला आहे.


जागावाटपावर काय म्हणाले राजू शेट्टी? 


या संदर्भात आमची काही चर्चा झाली नाही. कारण महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा आमचा विचार नाही. आम्ही स्वतंत्रपणे लढणार आहोत. ज्यावेळी निवडणुका जाहीर होतील तेव्हा आम्ही आमच्या भूमिकेसोबत जाऊ. जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. त्यासाठी पाठिंबा मिळावा यासाठी ठाकरेंची भेट घेतली.


महाविकास आघाडीसोबत माझं काही देणं घेणं नाही, मी वेळोवेळी स्पष्ट केलं आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे काही विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीने कारखानदारांना पूरक अशाप्रकारे एफआरपीचे तुकडे करणे, भूमी आधीग्रहण कायद्याची मोडतोड करून रस्त्यालगत जमिनीचा शेतकऱ्यांना जो चार ते पाच पट मोबदलला मिळायचा तो कमी करण्याचं काम महाविकास आघाडीचे सरकारने केलं. जे आमच्या आक्षेपाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवर जोपर्यंत स्पष्टीकरण मिळणार नाही तोपर्यंत महाविकास आघाडीवर जाण्याचा प्रश्न येत नाही. तरीसुद्धा त्या धोरणाला आमचा विरोध आहे. शिवसेना आघाडी सरकार उद्योग समूहाच्या विरोधात लढते त्यावेळी चळवळीत मदत घेणं गैर नाही.


ही बातमी वाचा: