रत्नागिरीमधला राजापूर मतदारसंघ हा शिवसेनेचा गड मानला जातो. शिवसेनेचे राजन साळवी हे राजापुरचे विद्यमान आमदार आहेत. 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत साळवी या मतदारसंघातून निवडून आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचं चांगलंच वर्चस्व आहे. त्यामुळे, यंदाही राजन साळवी यांचंच पारडं जड असल्याचे पाहायला मिळत आहे. नाणार आणि जैतापूर हे दोन्ही वादग्रस्त प्रकल्प याच मतदारसंघात असल्याने त्याद्रुष्टीनं हा मतदारसंघ खूप महत्त्वाचा आहे. 2014 साली जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेनं प्रखर विरोध केला होता. त्यानंतर राजन साळवी मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. आता नाणार प्रकल्पालाही सेनेनं कडाडून विरोध केला आहे. मात्र आता 2014 सारखी परिस्थिती नाही. कारण जैतापूर प्रकल्पाला सगळ्याच स्थानिकांचा विरोध होता. पण, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. नाणार प्रकल्पावरुन स्थानिकांमध्ये फूट पडली. त्यामुळे यंदा मतदारसंघाचा पूर्ण पाठींबा सेनेला मिळेलच असं नाही. मात्र राजन साळवींची जमेची बाजू म्हणजे अतिशय विखुरलेल्या छोट्याशा गावांमध्येही त्यांचा चांगला जनसंपर्क आहे. भाचपचं या मतदारसंघातलं अस्तित्व नगण्य आहे. त्यामुळे राजन साळवींनाच युतीची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. राजापुरात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कोणीही मोठा चेहरा नाही. त्यामुळे तगडा विरोधक नसणं हे सेनेच्या पथ्यावर पडू शकेल. मतदारांची संख्या पुरुष मतदार - 1,07,338 महिला मतदार - 1,26,821 एकूण - 2,34,159 विधानसभा मतदारसंघ क्रमांक- 267 2014 च्या विधानसभा निवडणुकीतील मतदानाची आकडेवारी राजन साळवी, शिवसेना –76266 राजेंद्र देसाई, काँग्रेस - 37204 अजित रमेश यशवंतराव, राष्ट्रवादी - 11923 संजय यादव - भाजप- 9953 आनंद कांबळे, बसपा – 2193 राजापूर हा रत्नागिरी जिल्ह्यातला निसर्गसंपन्न आणि प्राचीन असा भाग आहे. सोळाव्या शतकापासून राजापूर एक चांगलं बंदर व व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होतं. इंग्रजांच्या काळातही ते व्यापारी केंद्र होतं. राजापुरी पंचे, राजापुरी खोबरं, राजापुरी हळद हे ब्रॅण्ड त्यामुळे प्रसिध्द आहेत. इंग्रजांची वखार राजापूरला होती ती जीर्ण झाल्याने पाडण्यात आली. राजापुरात पेशवेकालीन स्थापत्य शैलीतील वाडे अजूनही अस्तित्व टिकवून आहेत. त्यामुळे, निसर्गचित्रकार, छायाचित्रकार यांना तर राजापूर म्हणजे नंदनवनच आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी राजापूरमध्ये पर्यटन वाढवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतु आतापर्यंत कोणत्याही लोकप्रतिनिधींनी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही. संपूर्ण रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यासोबत फणस, कोकम, जांभूळ, काजू आणि नारळाच्या बागा या भागात आहेत. या पट्ट्यात भातशेतीही केली जाते. त्यासोबत मासेमारी हा अनेकांचा व्यवसाय आहे. इथल्या समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता आणि सुशोभिकरणानंतर येथील पर्यटनाला चालना देता येईल.