मुंबई: राज्यात आता मुख्यमंत्री पदाची आणि मंत्रीमंडळाच्या शपथविधीची चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. शपथविधी सोहळा आणि कोणत्या नेत्याला कोणतं पद याबाबतची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. अशातच तारखेबाबतही अनेक संभ्रम आणि शक्यता वर्तवल्या जात आहेत. अशातच विधानसभा अध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार राहुल नार्वेकर यांनी साईदरबारी शपथविधीची तारीख सांगितली आहे.


विधानसभा अध्यक्ष व नवनिर्वाचित आमदार राहुल नार्वेकर यांनी आज साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. गेल्या दोन दिवसांपासून महायुतीचे अनेक नेते साई दरबारी हजेरी लावत असून मंत्रिमंडळ विस्तारात मोठं खातं मिळावं असं साकडं घालताना दिसत आहे.  आज विधानसभा अध्यक्ष व भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर हे देखील साई दरबारी आले. मध्यान्य आरतीपूर्वी त्यांनी साईबाबा समाधीचे दर्शन घेतले व त्यानंतर पत्रकारांची संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, 5 तारखेच्या सुमारास शपथविधी होऊन सरकार स्थापन होणार आहे. जो निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर होईल, असंही ते पुढे म्हणालेत.


महायुतीत पहिला, दुसरा, तिसरा नंबर असे काही नाही, सरकार सामुहिक जबाबदारीवर काम करत असते. सरकारच्या निर्णयासाठी सर्व मंत्रिमंडळ जबाबदार असते. त्यामुळे नंबरची शर्यत नाही. जो निर्णय होईल तो वरिष्ठ पातळीवर होईल. जनतेने मोठ्या विश्वासाने हे सरकार निवडून दिलं आहे. जनतेने भाजपला आणि महायुतीला अभूतपूर्व संख्याबळ दिलं आहे. हे सरकार येणाऱ्या पाच वर्षात राज्याला समृध्दी आणि भरभराटी मिळवून देणार असल्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. 


माझा कार्यकाळ पुढच्या विधानसभेच्या बैठकीपर्यंत असणार आहे. त्यानंतर पक्ष जी जबाबदारी देईल ती मी पार पाडेल. माझ्या पक्षाने मला न मागता खूप काही दिलेलं आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडेल, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. 


फेर मतमोजणी मागणीवर प्रतिक्रिया


फेर मतमोजणी मागणीवर बोलताना राहुल नार्वेकर म्हणाले, तो प्रत्येकाचा अधिकार आहे. निवडणूक आयोग नियमाप्रमाणे कारवाई करेल. विरोधकांकडून सातत्याने रडीचा खेळ करत आहेत. लोकसभा EVM वरच झाल्या. त्यावेळी विरोधकांनी निवडणूक आयोगाचे कौतुक केले. जेव्हा इच्छे विरुद्ध काही होते, तेव्हा विरोधक संबंधित संस्थेला दोषी ठरवतात. सर्वोच्च न्यायालय, लोकसभा अध्यक्ष, निवडणूक आयोग सर्वांवर टिका करतात. संविधानीक संस्थांवर यांचा विश्वास नाही. संविधानाबद्दल यांच्या मनात किती आदर आहे,  हे यातून दिसून येते, असंही त्यांनी म्हटलं आहे.