लातूर : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने प्रचारसभांचा धडाका सुरू झाला असून सर्वपक्षीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. विशेष म्हणजे दिल्लीतील बडे नेतेही निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ते काँग्रेस नेते राहुल गांधीही महाराष्ट्रात दौरे करत आहेत. महायुती व महाविकास आघाडीचे दिग्गज व पक्षप्रमुख नेत्यांनीही सभांचा धडाका सुरू केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेही एकापाठोपाठ एक सभा घेत आहेत. त्यातच, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Amebdkar) यांनीही आजपासून प्रचारसभांना सुरुवात केलीय. त्यांच्यावर गेल्याच आठवड्यात शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर, आता ते विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात विनोद खटके यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा झाली. या सभेतून त्यांनी थेट काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर थेट हल्लाबोल केला.


राहुल गांधी तुम्हाला **त्या बनवत आहेत, एवढं मी तुम्हाला सांगतो. त्याच्याशिवाय दुसरा शब्द माझ्याकडे नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीत संविधान वाचविणे एका बाजूला आणि संविधान बदलले दुसऱ्या बाजूला होते. या देशातील संविधानप्रेमी व लोकशाही प्रेमी आहे, त्यांनी मोदींना लाथाडला. तुम्ही संविधान बदलणार असाल तर आम्हीच तुम्हाला बदलतो, असे लोकांनी म्हटल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारसभेत सुरुवातीलच राहुल गांधींना लक्ष्य केलं.  


मुस्लीम समाजाला आवाहन


नरेंद्र मोदी प्रत्येक सभेत संविधान डोक्यावर घेतात, बायबल आहे असे सांगतात. मी मुस्लिम समाजाला आव्हान करतो, मागच्या पाच वर्षात खूप हल्ले झाले आहेत. त्यावेळी, वंचित बहुजन आघाडीच आपल्या पाठीमागे उभी राहिली, बाकी कोणी आले नाहीत. राज्यातील विधानसभा मतदारसंघात32 जागा अशा आहेत, जिथे शिवसेनेच्या दोन गटांमध्ये थेट लढत होत आहे, तेथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारही मैदानात आहेत. शिवसेनेचे दोन्ही गट तुमच्या बाजूने नाहीत, म्हणून मौलविना माझा प्रश्न आहे आमच्या बाजूने या. तुम्हाला लज्जा कोणती आहे तुम्ही आम्हाला पाठींबा देत नाहीत, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले. 



इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल


इम्तियाज सारख आम्ही वागणार नाहीत, विजय झाल्यावर त्याने मार्ग वेगळा घेतला होता. मी मुस्लिम समाजाला आव्हान करतो की संधी निघून गेली की काही राहत नाही, असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमवर व इम्तियाज जलील यांच्यावर हल्लाबोल केला. तसेच, मुस्लीम समाजाला वंचितसोबत येण्याचं आवाहन केलंय. 


हेही वाचा


फटाके वाजवणाऱ्यांवर चिडले, मोदींनाही लगावला मिश्कील टोला; राज ठाकरेंनी मुंबईतील सभा गाजवली