मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या सभा सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) केंद्रातील व दिल्लीतील दिग्गज नेतेही महाराष्ट्रात तळ ठोकून आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील सभांचा धडाका लावला आहे. त्यातच, आज बोरीवली विधानसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा होत असताना फटाके वाजवण्यावरुन ते चिडल्याचे पाहायला मिळाले. राज ठाकरेंचं भाषण सुरु होतानाच फटाक्यांचा आवाज सुरू झालाय. या फटाक्यांचा आवाज आल्याने राज ठाकरे चिडल्याचं पाहायला मिळालं. एकतर मला वेळ कमी आहे, फटाके लावून माझा मूड खराब करतात, असे म्हणत राज ठाकरेंनी सभेपूर्वी उडवण्यात येणाऱ्या फटाक्यांवरुन नाराजी व्यक्त केली. बोरवलीला मला सभा घ्यायचीच होती, यादीमध्ये नसलं तरी मी ती घेतली आहे. येथे मी अभ्यासू उमेदवार मी दिला आहे. आज काही जणांचे जाहीरनामे जाहीर झाले, वीस वर्षापूर्वी ज्या गोष्टी सांगितल्या होत्या, जाहीरनाम्यात आज पण त्याच होत्या, असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) बोरीवलीतील सभेतून महाविकास आघाडी व महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना अजित पवारांसोबत सोबत घेतल्यावरुन मिश्कील टोलाही लगावला. 


निवडणुकांच्या अनुषंगाने आज बऱ्याच जणांचे जाहीरनामे जाहीर झालेले आहेत. वीस वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टी आज सुद्धा त्या जाहीरनाम्यात होत्या. काँग्रेसचा तर बोलूच नका, एका बाजूला प्रगती झाली असं म्हणायचं पण दुसरीकडे जुना बोरिवली चांगलं होतं असं सुद्धा वाटत आहे.  याचं कारण म्हणजे कसलीही यंत्रणा लावलेले नाही, बाहेरून बदाबदा माणसं येत आहेत. एखादा शहर म्हटलं तर ठीक आहे, माणसं येणं स्वाभाविक आहे. पण जे मूळ आहेत त्यांना त्रास व्हायला लागला आहे. फुटपाथवर चालता येईना, रस्त्यावर गाड्या चालवता येईना, मैदानावर बागा उरल्या नाहीत, मग कोणती डेव्हलपमेंट झाली?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे. 


प्रत्येक नागरिकाला घरातून बाहेर पडल्यावर बरं वाटलं पाहिजे की मी या शहरात राहतो आहे. या बोरवलीमध्ये संजय गांधी नॅशनल पार्क आहे, फक्त भारतात नव्हे तर जगात इतकं मोठं नॅशनल पार्क असलेलं शहर म्हणजे फक्त मुंबई आहे. आपण बोलतो घरात बिबट्या आला, पण तुम्ही बिबट्याच्या घरात गेला आहात. आपलं संजय गांधी नॅशनल पार्क पवईला सुरू होतं आणि गौडबंदरला संपत इतकं मोठं पार्क आहे. अशाप्रकारचं पार्क इतर देशांकडे असतं तर त्यांनी इतकंच जपलं असतं की आपण त्याची कल्पना सुद्धा नाही करू शकत नाही. आपली शहरं बॉम्ब टाकल्यासारखी का वाटतात?, काहीही चालतंय, फुटपाथ तुटले, रस्ते नाहीत, खड्डे आहेत. याचं कारण म्हणजे आपल्याला नक्की काय पाहिजे याची कल्पना तुम्हाला सुद्धा नाही आणि राजकारण्यांना सुद्धा नाही.


छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड किल्ले पाहिले तर तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळेल. शहरांना एक कॅरेक्टर लागतं. राजकारणांनाच कॅरेक्टर उरलं नाही तर शहरांना कुठून येणार? त्यांच्याकडे आपलं लक्ष नाही कारण आपण त्यांना प्रश्न विचारत नाही. आतापर्यंत कोण कोण आमदार नगरसेवक खासदार होऊन गेले त्यांना एकदा प्रश्न विचारा. निवडणूक आल्या की हात जोडतात, पाया पडतात आणि निवडणुका झाल्या की पाच वर्ष तुमच्याकडे बघत सुद्धा नाहीत. कारण, तुम्ही प्रश्न विचाराल अशी त्यांना भीती वाटली पाहिजे पण त्यांना भीतीच उरली नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी राजकीय नेत्यांवर हल्लाबोल केला. चांगल्या जातीचा चांगल्या पक्षाचा असा आपण मतदान करतो पण हा चांगलं काम करतो की नाही यावर आपण मतदान करीत करीत नाही, अशी खंतही राज यांनी व्यक्त केली. 


5 वर्षे कशाला म्हणतात कळतं का?


पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा कै. बाळासाहेब ठाकरे असतील यांच्या नावावर तुमच्याकडे मत मागायला येतात. पण तुम्हाला प्रश्न पडत नाही की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मतदान केलं पण आता बाळासाहेब ठाकरे नाहीत. नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहून मतदान केलं पण आपल्या बोरिवली मधील प्रश्न नरेंद्र मोदींना कसे सांगायचे?. पाच वर्ष कशाला म्हणतात कळतं का? नुसता शिक्षित मतदार नाही चालत तर सुज्ञ मतदार पाहिजे, असेही राज यांनी म्हटलं. तुम्हाला उत्तम शहरं मिळू शकतात, फक्त तुम्हाला उत्तम आमदार निवडता आला पाहिजे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो, असेही राज यांनी म्हटले. 


राज ठाकरेंचा मोदींना मिश्कील टोला


अजित पवार यांना उपमुख्यमंत्री केलं तेव्हा त्यांच्याबाबत दहा दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं की, ज्यांनी 70 हजार कोटीचा घोटाळा केला त्यांना आम्ही सोडणार नाही. सोडणार नाही याचा अर्थ आता कळला अच्छा असं सोडणार नाही का धरून ठेवलं, असा मिश्कील टोला राज ठाकरेंनी लगावला.