नाईक परिवाराचा बालेकिल्ला म्हणून पुसद मतदारसंघ ओळखला जातो. मात्र नुकतीच पक्षांतरांवरुन झालेली नाईक परिवार आणि कार्यकर्त्यांची सहविचारसभा पुसदकरांना विचार करायला लावणारी ठरली आहे आणि त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक अनेकांचे राजकीय भविष्य ठरविणारी सुद्धा राहणार आहे.
पुसद मतदारसंघातील जनतेने आणि नाईक परिवाराने एकमेकांवर नेहमी विश्वास ठेवला आणि सतत पुढे वाटचाल केली. पुढे नाईक परिवारातील कुठल्याही पिढीच्या सदस्याला मागे वळून पाहण्याची वेळ या मतदारसंघात आली नाही. प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जनतेने भक्कम साथ दिल्याने नाईक परिवाराचे मतदारसंघात कायम वर्चस्व निर्माण झालं.
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री कै. सुधाकरराव नाईक या पुसदच्या दोन सुपुत्रांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि त्यांच्या नेतृत्वात राज्याने हरितक्रांती तसेच जलसंधारणच्या माध्यमातून विकासाची पावलं टाकली.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्यानंतर त्यांचा वारसा त्यांचे पुतणे मनोहर नाईक चालवत आहेत. त्यांच्या सोबतीला त्यांचे दोन चिरंजीव ययाती आणि इंद्रनील नाईक आहेत.
आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे आमदार मनोहर नाईक हे मात्र काही दिवसांपासून जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर नाराज होते.
त्यामुळे राजकीय घडामोडींबाबत पुढे काय निर्णय घ्यावा यावर चिंतन सुरु असताना, शिवबंधन बांधण्याचा पर्याय चाचपून पाहिला गेला.
त्यासाठी पुसद येथे नाईक परिवाराने सहविचारसभा आयोजित केली. या सहविचारसभेत कार्यकर्त्यांचा कौल काय ते जाणून घेतलं गेलं. मात्र सहविचारसभेला पुसदमधील राष्ट्रवादीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फळीतील नेत्यांनी दांडी मारली. राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून शिवबंधन बांधणं हा अचानक होणारा बदल कार्यकर्त्यांना समजण्यापलीकडचा होता असं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळेच राष्ट्रवादीचे तालुक्यातील नेते-कार्यकर्ते या सभेला गैरहजर राहिले.
नाईकांचा राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याचा प्रवास पुसद - मुंबई असा थेट न होता, व्हाया उस्मानाबाद असा झाला होता असं आता बोललं जातंय. मात्र या प्रवासाला जायचं नाही यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.
विशेष म्हणजे मनोहर नाईक आणि परिवार राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाणार असल्याच्या वार्ता जेव्हा पुसद आणि परिसरामध्ये सुरू झाल्या, घुमू लागल्या तेव्हा सहविचारसभेला अनुपस्थित असलेल्या स्थानिक नेत्यांनी काय निर्णय घ्यावा यावरही मंथन झाल्याचीही चर्चा आहे.
दरम्यान राजकीय घडामोडीबाबत काय निर्णय घ्यावा, यावर नाईक परिवाराचे चिंतन सुरु असताना नाराज मनोहर नाईक यांच्याशी राष्ट्रवादीतील राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील नेत्यांनी मोबाईलवर केलेल्या संभाषणनंतर थांबा, पहा, पुढे चाला असे सत्र सुरु राहिले त्यावेळी पुढे काय होते याची उत्कंठा अनेकांना होती.
मात्र नुकतीच पुसद येथे राष्ट्रवादी पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेसाठी नाईक परिवाराने हिरीरीने सहभाग नोंदविला आणि तेथेच मनोहर नाईक यांनी आता शेतकऱ्याची परिस्थिती बदलविण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला जिंकून द्या असं आवाहन केलं. त्यावेळी नाईक राष्ट्रवादी सोडून शिवबंधन बांधणार नाही हे निश्चित झालं.
स्व. नाईक साहेबांचे विचार शिवसेनेत जसेच्या तसे स्वीकारले जातील का या विषयी मनोहर नाईक साशंक होते, असं आता सांगितलं जातंय. यातूनच त्यांनी राष्ट्रवादी न सोडण्याचा निर्णय घेतला असंही जाणकार सांगतात.
असं असलं तरी आजही पुसदचं राजकारण नाईक परिवाराच्या अवतीभवती फिरतं..
पुसद विधानसभा मतदारसंघात ग्रामीण भागातील जनता नाईक यांच्या पाठीशी भक्कम उभी असते हे याअगोदर अनेकदा सिद्ध झालं आहे.
सहविचार सभेच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण जनतेसह स्थानिक गावपुढाऱ्यांवरील पकड जरी सैल झाली असं वाटत असलं तरी बहुतांश जनतेच्या मनात नाईक घरण्यावरील श्रध्दा कायम असल्याचं दिसून आलंय. तरीही मोठे नाईक साहेब यांचे ते कुटुंबीय असल्याने त्यांना मानणारा मोठा वर्ग आजही पुसद भागात पाहायला मिळतो.
मनोहर नाईक यांना आदर देणारा त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणारा, मान देणारा, जीव लावणारा मोठा वर्ग आजही या भागात पाहायला मिळतो.
मनोहर नाईक यांच्या सोबतीला आजही जुन्या जाणत्या मातब्बर लोकांचा मोठा चाहता वर्ग आहे.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या पुण्याईमुळे घराण्यातील वारसा चालवणाऱ्यांवर आजही येथील जनतेचा विश्वास आहे. मात्र नाईक परिवाराचा वारसा आता आमदार मनोहर नाईक आणि आमदार निलय नाईक यांच्यात विभागला गेल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
काही वर्षांपूर्वी निलय नाईक यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भाजपनेही निलय नाईक यांना विधान परिषदेत आमदार केलं. तेव्हापासून या भागात भाजपा झपाट्याने वाढली आणि त्याची झलक जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालामध्ये दिसली. त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत पुत्र ययाती नाईक यांचा झालेला पराभव नाईक यांना एक धक्का होता.
राष्ट्रवादी सोडण्याबाबत बोलावलेल्या सहविचार सभेनंतर पूर्वी न बोलणारी मंडळी उघडपणे प्रश्न मांडू लागली आहेत.
त्यामुळे यंदा मनोहर नाईक स्वतः उमेदवार असतील तरच मतदारसंघातील जनता कमी अधिक प्रमाणात का होईना साथ देईल अन्यथा याच परिवारातील सदस्याला तशीच साथ मिळेलच अशी शक्यता कमी आहे. त्यामुळे नाईक परिवार आपला गड, किल्ला शाबूत ठेवण्यासाठी काय रणनीती आखतो यावर बरंच काही अवलंबून आहे.
सध्या भाजपासोबत असलेले निलय नाईक यांनी काका मनोहर नाईक यांच्याविरोधात उघडपणे भूमिका मांडत काकांविरोधात सन 2004 साली विधानसभेची निवडणूक लढवली होती.
निलय नाईक हे सुद्धा नाईक घराण्यातील सन्माननीय सदस्य आहेत. ते यवतमाळ जिल्हा परिषदचे अध्यक्षही होते. आता ते विधानपरिषदेत भाजपाचे आमदार आहेत.
त्यात पुसद विधानसभेची जागा भाजप आणि शिवसेनेच्या पारंपरिक जागावाटपात शिवसेनेकडे आहे. अशावेळी भाजपचे आमदार म्हणून निलय नाईक यांची भूमिका काय राहील, यावरही बरंच काही अवलंबून राहणार आहे.
पुसद मतदारसंघातील जनता 1962 च्या पहिल्या विधानसभा निवडणूकीपासून नाईक परिवारासोबत राहिली आहे.
प्रथम 1962 झाली वसंतराव नाईक यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढवली त्यानंतर 1967, 1972 साली सुद्धा ते या मतदारसंघातून जिंकून आले. त्यानंतर सुधाकरराव नाईक यांनी सुद्धा 1978, 1980, 1985 ते 1990 पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर राजकीय घडामोडीमुळे सुधाकरराव नाईक यांचे पुतणे, ज्यांना जनता आदराने 'भाऊ' म्हणते आणि याच नावाने ते जनतेत लोकप्रिय आहेत. त्याच भाऊंनी म्हणजे मनोहर नाईक यांनी येथून 1995 साली निवडणूक लढवून आमदार झाले.
त्यानंतर 1999 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कै. सुधाकरराव नाईक हे राष्ट्रवादी पक्षाच्या स्थापनेपासून सोबत असल्याने त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर त्यांनी 1999 ची पुसद विधानसभा निवडणूक सुध्दा जिंकली.
त्यानंतर या मतदारसंघात राष्ट्रवादीचा कायम दबदबा राहिला.
2004, 2009 आणि 2014 या वर्षात झालेल्या निवडणुकांमध्ये जनतेने मनोहर नाईक यांना भक्कम पाठिंबा दिला. आघाडी सरकार मध्ये त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद सुद्धा सांभाळलं.
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक, माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्यामुळे पुसदचा विकास झाला. शेती आणि शेतीवर आधारित उद्योग येण्यास सुरवात झाली, सिंचनासाठी धरणं बांधली गेली. नव्या शैक्षणिक संस्थांचे जाळं उभं राहिल्याने त्यावेळी ग्रामीण भागातील मुलांची शैक्षणिक प्रगती झाली. पुसद एक नवीन जिल्हा व्हावा यासाठी अनेक शासकीय कार्यालये उभी राहिली, एमआयडीसी उभी राहिली, सहकार तत्त्वावरील साखर कारखाने, सूतगिरण्या उभ्या राहिल्या, दुग्ध व्यवसायासाठी संकलन केंद्र निर्माण झाले.
मात्र पुढे जाण्यासाठी ज्या गतीने उद्योगासाठी मालवाहतूक आणि दळणवळणासाठी येथे रेल्वे वाहतूक आवश्यक होती, ती नसल्याने येथे रस्त्यांचे जाळे विणले गेले. मात्र नंतरच्या काळात त्यात नाविन्यता आणि दूरदृष्टीने पावले उचलली गेली नाही आणि एकेक संस्था, उद्योग, कारखाने, सूतगिरण्या बंद पडत गेल्या. आता एमआयडीसीचा परिसर ओस पडला आहे.
नवा उद्योग नाही, हाताला काम नाही, वाढती बेरोजगारी अशावेळी ग्रामीण भागातील मजूर मोठया प्रमाणात रोजगारासाठी स्थलांतर करत आहे.
ग्रामीण भागातील रस्ते कितीतरी वर्षांपासून किरकोळ डागडुजीविना आहेत तसेच ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुद्धा नीट नाहीत. पुसदच्या रुग्णालयात खेड्यापाडयातून रुग्ण उपचारासाठी येतात मात्र वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शासकीय रुग्णालयात सुधारणा नाही. त्यामुळे बहुतांश रुग्णांना यवतमाळ किंवा नांदेड येथे उपचारासाठी जावं लागतं.
पुसद जिल्हा आणि रेल्वे या दोन गोष्टींची पुसदकरांना दीर्घकाळापासून प्रतीक्षा आहे.
या मतदारसंघातील 40 गावे माळपठार म्हणून ओळखली जातात. येथे पाण्याची समस्या कायम असून माळपठार भागात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे हे प्रकर्षाने जाणवतं.
पुसदच्या जनतेने अगदी पहिल्या निवडणुकीपासून नाईक परिवाराला साथ दिली असली तरी प्रत्यक्ष निवडणुकीत काही विरोधक तयार होतातच. पुसदकराचं प्रेम असलं तरी एकही निवडणूक एकतर्फी अथवा बिनविरोध झालेली नाही.
यामध्ये 1962 साली माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या विरोधात नलिनीबाई मुखरे यांनी निवडणूक लढविली तर 1995 साली मनोहर नाईक यांच्या विरोधात नरेंद्र मुखरे यांनी जनता दलाकडून उभं राहून जोरदार टक्कर दिली. त्यावेळी मनोहर नाईक यांना 63732 मते मिळाली होती तर जनता दलाचे नरेंद्र मुखरे यांना 61614 मते मिळाली.
आणि त्यानंतर 1999 साली कै. सुधाकरराव नाईक यांच्या विरोधात राजन मुखरे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढविली. त्यावेळी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढतांना सुधाकरराव नाईक यांना 60 हजार 177 मते मिळाली होती तर शिवसेनेचे राजन मुखरे यांना 44 हजार 507 मते मिळाली आणि काँग्रेसचे विजयराव नाईक यांना 21 हजार 488 मते मिळाली.
2004 मध्ये मनोहर नाईक यांच्या विरोधात शिवसेनेच्या डॉ .आरती फुपाटे यांनी रणशिंग फुंकलं होतं त्यावेळी मनोहर नाईक यांना 92 हजार 647 मते मिळाली होती तर डॉ . आरती फुफाटे यांना 51 हजार 226 मते मिळाली होती.
तर 2009 साली मनोहर नाईक यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे सध्याचे भाजप आमदार निलय नाईक यांनी काका विरुद्ध अपक्ष निवडणूक लढविली होती. त्यावेळी मनोहर नाईक यांना 77136 मते मिळाली होती तर शिवसेनेच्या डॉ आरती फुफाटे यांना 46 हजार 296 मते मिळाली होती तर अपक्ष निलय नाईक यांना 18 हजार 486 मते मिळाली होती.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे मनोहर नाईक यांना 94152 मते मिळाली होती तर शिवसेनेचे प्रकाशराव पाटील देवसरकर यांना 28793 मते मिळाली तर भाजपचे वसंतराव पाटील 19155 तर काँग्रेसचे सचिन नाईक यांना 15017 मते मिळाली होती.
तसंच पुसदमध्ये नाईक परिवाराच्या विरोधात अनेक जण वेळोवेळी निवडणुकीत उभे राहतात. मात्र पुढच्या काळात विरोधक राहात नाहीत किंवा त्याचा विरोध कमी होत जातो.
लोकसभा निवडणुकीसाठी पुसद विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात समाविष्ट होतो. यवतमाळ-वाशिमच्या शिवसेना उमेदवार भावना गवळी पहिल्यांदाच पुसद मतदारसंघातून 75 हजाराचं मताधिक्य मिळालं.
अशा स्थितीत पुसद येथील जनता परंपरेने नाईक घराण्यातील व्यक्तीला साथ देते की नव्या उमेदवाराला निवडून आणते हे पाहणं उत्सुकतेचं आहे.