उस्मानाबाद : एकीकडे राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना एकत्रित लढणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार सांगतात, मात्र दुसरीकडे भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचं समजतं. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सर्व जागांची चाचपणी सुरु केल्याची चर्चा आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने 288 विधानसभा मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुलाखतींमध्ये शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातही भाजपच्या मुलाखती पार पडत आहेत. शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघात भाजपकडून पाच ते दहा जण इच्छुक असल्याचं कळतं. विशेष म्हणजे भाजपने प्रत्येक इच्छुकांचे अर्ज भरुन घेतले आहेत.

चंद्रकांत पाटलांकडून 50-50 चा फॉर्म्युला रद्दबातल झाल्याचे संकेत
भाजप-शिवसेनेमधील चर्चेत 50-50 चा फॉर्म्युला रद्दबातल झाल्याचे संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी नागपुरात दिले होते. "युतीच्या जागावाटपावर 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा होणार नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर केली जाईल," असं पाटील म्हणाले होते.

जागावाटपाच्या निर्णयावरुन उद्धव ठाकरेंचा पाटलांवर निशाणा
चंद्रकांत पाटील यांच्या विधानानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. विधानसभेच्या जागांविषयी बोलताना ते म्हणाले की, "युतीमधील जागावाटपाचा फॉर्म्युला मी, मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाह मिळवून ठरवू."

परंतु आता भाजपने सर्वच 288 मतदारसंघात इच्छुकांच्या मुलाखती सुरु केल्याने, निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

संबंधित बातम्या

युतीत 2014 ला जिंकलेल्या जागांवर चर्चा नाही, चर्चा फक्त सीटिंग व्यतिरिक्त उर्वरित जागांवर : चंद्रकांत पाटील

चंद्रकांतदादा 'पेंटर', शिवसेना 'कारपेंटर', जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर संजय राऊतांची टीका