नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यावर दुसऱ्या देशाने दखल द्यायची गरज नाही, असं राहुल गांधींनी पाकिस्तानला सुनावलं. पाकिस्तानने काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्र संघाला काश्मीरच्या मुद्द्यावर पत्र लिहिलं होतं, यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्वीट करत पाकिस्तानला खडेबोल सुनावले.


राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "माझे भाजप सरकारसोबत अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. मात्र जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे, हे मी स्पष्ट करतो. यामध्ये पाकिस्तान किंवा इतर देशांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही. "





जम्मू-काश्मीरमध्ये हिंसा झाली आहे. कारण जम्मू काश्मीरमधील नागरिकांना भडकवलं जात असून पाकिस्तानचा या सर्वाला पाठिंबा मिळत आहे. या पाकिस्तानची जगभरात दहशतवादाचा मुख्य समर्थक अशी ओळख आहे, अशा शब्दात राहुल गांधींनी पाकिस्तानवर निशाणा साधला.


पाकिस्तानच्या पत्रात राहुल गांधींचा उल्लेख


काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र संघाला काश्मीरच्या मुद्द्यावर पत्र लिहिलं होत. जम्मू-काश्मीरमध्ये सामान्य नागरिकांवर अत्याचार होत असल्याचा या पत्रात उल्लेख होता. यासाठी पाकिस्तानने राहुल गांधी यांच्या ट्वीटचा दाखला दिला होता. तसेच या पत्रात जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांच्या ट्वीटचाही उल्लेख करण्यात आला होता.