Pune Teacher Constituency : पुण्याची जागा अखेर भाजपच्याच वाट्याला! महायुतीत शिक्कामोर्तब, रवींद्र चव्हाणांकडून 15 नावांची यादी दिल्लीत सादर
Pune Teacher Constituency BJP : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये सुरू असलेली रस्सीखेच अखेर थांबली असून ही जागा भाजप लढवणार यावर एकमत झाल्याची माहिती आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागावाटपाचा तिढा सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या 'पुणे शिक्षक मतदारसंघा'वरून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, वरिष्ठ पातळीवरील दीर्घ चर्चेनंतर पुणे शिक्षक मतदारसंघ अखेर भाजपच्याच वाट्याला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mahayuti Seat Sharing Legislative Council : महायुतीचे मतदारसंघनिहाय जागावाटप निश्चित
विधान परिषदेच्या विविध जागांवर महायुतीतील घटक पक्षांमध्ये पुढीलप्रमाणे जागावाटप ठरल्याचे समोर आले आहे.
पुणे शिक्षक : भारतीय जनता पक्ष (BJP)
पुणे पदवीधर : भारतीय जनता पक्ष (BJP)
नागपूर पदवीधर : भारतीय जनता पक्ष (BJP)
अमरावती : शिवसेना (शिंदे गट)
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)
Ravindra Chavan List To Nitin Naveen : रवींद्र चव्हाणांकडून 15 नावांची यादी सुपूर्द
पुणे शिक्षक मतदारसंघाची जागा भाजपला मिळताच पक्षांतर्गत हालचालींना प्रचंड वेग आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेऊन तिन्ही मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावाची यादी सुपूर्द केली आहे.
भाजपने प्रत्येक जागेसाठी 5 संभाव्य उमेदवारांचे पर्याय ठेवले असून, 3 मतदारसंघांसाठी एकूण 15 नावं केंद्रीय नेतृत्वाकडे सोपवण्यात आली आहेत. यामध्ये पुण्याच्या जागेवरील प्रमुख दावेदारांचाही समावेश असून, केंद्रीय निवडणूक समितीकडून लवकरच अधिकृत उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब केले जाणार आहे.
Legislative Council Election : शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांची समजूत काढणार
पुणे शिक्षक मतदारसंघावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अनेक स्थानिक इच्छुकांनी दावा ठोकला होता. आता ही जागा भाजपच्या खात्यात गेल्यामुळे मित्रपक्षांतील इच्छुकांमध्ये काही प्रमाणात नाराजी पाहायला मिळत आहे. मात्र, महायुतीचा धर्म पाळत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराज इच्छुकांची वरिष्ठांकडून समजूत काढली जाईल, असे भाजप नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीमध्ये नाराजी
पदवीधर, शिक्षक निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तीन उमेदवारांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसनं परस्पर उमेदवारांची नावं जाहीर केल्यानं महाविकास आघाडीत नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, शनिवारी महाविकास आघाडीची यावर बैठक झाली परंतु त्यामध्ये कोणताही तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे.
ही बातमी वाचा:




















