प्रियांका गांधी राहुल गांधींना पर्याय नव्हे तर पूरक ठरणार?
एबीपी माझा वेब टीम | 23 Jan 2019 04:36 PM (IST)
'प्रियांका लाओ'ची मागणी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. पण तेव्हा राहुल गांधी अपयशी असल्याने प्रियांका हव्यात असं चित्र होतं. आज मात्र ते चित्र बदललंय. अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर एका वर्षात राहुल गांधींचं नेतृत्व परिपक्व होत चाललंय, तीन राज्यांच्या यशाची मोहोरही उमटलीय, त्यावेळी प्रियांकांना आणलं जातंय
फोटो सौजन्य : गेट्टी इमेज
नवी दिल्ली : आता येणार, मग येणार म्हणून ज्या प्रियांका गांधींची चर्चा इतकी वर्षे सुरु होती, त्या प्रियांकांची राजकारणातली एन्ट्री आज अखेर जाहीर झाली. काँग्रेसने इतके दिवस राखून ठेवलेलं आपलं शेवटचं अस्त्र अखेर बाहेर काढलं. काँग्रेस पक्षाच्या महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करत त्यांना पूर्व उत्तर प्रदेशचं प्रभारीपद देण्यात आलं आहे. प्रियांका गांधी आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये केवळ पडद्याआडच काम पाहत होत्या. लोकसभा निवडणुकीत अमेठी, रायबरेली या दोन मतदारसंघांचीच जबाबदारी त्यांच्यावर असायची. राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर प्रियांकांच्या एन्ट्रीची चर्चा थांबलीय असं वाटत असतानाच काँग्रेसने आज ही सरप्राईज खेळी केली. संघटनेत पहिल्यांदाच अधिकृतपणे त्यांना पद देण्यात आलं आहे. एका अर्थानं त्यांच्या राजकीय प्रवेशाची औपचारिकता पूर्ण झाली. प्रियांका गांधी यांना ज्या टायमिंगला आणलं जात आहे, तेही महत्त्वाचं आहे. 'प्रियांका लाओ'ची मागणी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. पण तेव्हा राहुल गांधी अपयशी असल्याने प्रियांका हव्यात असं चित्र होतं. आज मात्र ते चित्र बदललंय. अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर एका वर्षात राहुल गांधींचं नेतृत्व परिपक्व होत चाललंय, तीन राज्यांच्या यशाची मोहोरही उमटलीय, त्यावेळी प्रियांकांना आणलं जातंय. एकप्रकारे राहुलला पर्याय नव्हे तर पूरक म्हणून प्रियांका येतायत, हे या टायमिंगमधून दाखवलं जातंय.