पूना बोर्डिंग हे पुण्यातले प्रसिद्ध हॉटेल आहे. त्याची सुरुवात पुण्याच्या सदाशिव पेठेत 1925 साली झाली. येथे घरगुती पद्धतीचे शाकाहारी जेवण थाळी पद्धतीने मिळते. काही शे लोक येथे दररोज सकाळी-संध्याकाळी जेवून जातात. सगळ्यांना इथल्या जेवणाची चव आवडते.
पूना बोर्डिंग म्हणजे, पुण्यात स्पर्धापरीक्षेचा अभ्यास करायला आलेल्या मुलांसाठी चालवलेली ‘मेस’ नाही. खरतर ‘डेली मेस’ ऊर्फ खानावळीचा व्यवसाय सोडून रोजच्या थाळीचा व्यवसाय करायला सुरुवात करुनही पूना बोर्डिंगला आता 35 वर्षं होऊन गेली.
पूना बोर्डिंग, त्याचे मालक सुहास उडपीकर यांचे कुटुंबिय आणि त्यांचा सगळा स्टाफ, टीम हे प्रकरण,जरा ‘फुरसत’’ मधे लिहावं असं आहे.
काही ठिकाणं असतात जिथे मी काही नवीन ट्राय करुन बघायचं म्हणून जातो. काही ठिकाणी जवळपास काहीच बरं नाही त्यामुळे गत्यंतर नाही म्हणून जातो. काही दोस्त लोकांच्या हॉटेल्सवर सरावानी जातो, जेवून खाऊन गप्पा मारुन परत येतो.
पण पुण्यातल्या पूना बोर्डिंगसारख्या मोजक्या ठिकाणी मी काहीशा भक्तीभावानी जातो. माझ्यासाठी पूना बोर्डिंगच्या जेवणाची आठवण म्हणजे लहानपणापासून,घरच्यासारखं जेवण देणारं ठिकाण ही राहिल्ये, ती आजही कायम आहे, यातल्या पूना बोर्डिंगचा वाटाच 100%!
जरी ही खानावळ नसली तरी म्हणून, त्याला हॉटेल म्हणायचं पातक मी करणार नाही. कारण हॉटेलात जेवायला वाढताना फक्त प्लेट, त्याचा रेट , त्याची क्वांटीटी आणि रोज येणारे कस्टमर्स ह्याचाच विचार होतो. पण पुण्यात पूना बोर्डिंगसारखी मोजकी ठिकाणं अशी आहेत, जिथे आजही हा ‘हॉटेल टाईप’विचार केला जात नाही. पूना बोर्डिंग मधलं जेवणाची आणि त्यामागील त्यांच्या भावनेची तुलना जर करायचीच झाली तर मी देवाला नैवेद्य दाखवण्याशी करेन.
कारण ज्या भक्तीभावाने पूजेला देवाला नैवेद्य दाखवला जातो, त्याच भक्तीभावाने इथे रोज दोन वेळेचा स्वयंपाक केला जातो. ज्या प्रेमाने भाविकांना प्रसाद वाढला जातो, तीच भावना इथे जेवणाऱ्या व्यक्तींना वाढताना इथल्या वाढप्यांची असते. त्यामागे मालक मंडळींनी पहिल्यापासून पाडून दिलेला आत्मीयतेने वाढण्याचा पायंडा आहे. याच पद्धतीने 1925 सालापासून, 3 पिढ्या यज्ञकार्याच्या भावनेतून उडपीकर कुटुंबीय हा व्यवसाय करत आहेत.
पूना बोर्डिंगची सुरुवात खानावळ स्वरूपात झाली आणि ती केली, कर्नाटकातून आलेल्या गुरुराज ऊर्फ मणीआप्पा उडपीकर ह्यांनी. मणीआप्पांनी कर्नाटकी वैष्णव ब्राह्मणी चवीचा स्वयंपाक पुण्यात बनवणं सुरु केलं. पेरुगेटाजवळ सध्याच्या जागेच्या पलिकडे खालच्या मजल्यावर ‘’ पूना बोर्डिंग’ ही वैष्णवी खानावळ सुरू झाली. सोवळ्यात केलेला स्वयंपाक, पाटावर बसून पंगतीत बसून जेवायला,त्याकाळी भारतरत्न भिमसेन जोशी यांच्यासारखे अनेक दिग्गज जमेल तेव्हा आवर्जून हजेरी लावायचे.
महिन्याचे पैसे घेऊन मोजके जेवण वाढण्याच्या खानावळ व्यवसाय करतानाही, मणीआप्पा आणि त्यानंतर त्यांचे पुत्र आण्णा उडपीकर ह्यांनी आपल्या उत्कृष्ट जेवणाच्या आणि दिलदारपणे वाढण्याच्या स्वभावाच्या जीवावर अक्षरशः हजारो सर्वसामान्य माणसं जोडली. घरापासून लांब राहून इथे घरच्यासारखे जेवायला येऊन पुढे नामवंत डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट, बँकर, उद्योजक आणि खेळाडू झालेले त्याकाळातले शेकडो विद्यार्थी ( आणि आताचे बुजुर्ग ) आजही याची साक्ष देतात.
1977 साली आत्ता आहे त्या जागी पूना बोर्डिंग नव्याने सुरु झालं. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला, पूना बोर्डिंगनी ‘मंथली मेस’ हा प्रकार बंद करुन लिमिटेड थाळी पद्धतीने जेवण द्यायला सुरुवात केली. बऱ्याच जणांच्या बाबतीत ती नावालाच लिमिटेड रहाते ते सोडा !
चार पोळ्या, दोन भाज्या,आमटी, वरण-भात,पापड, चटणी, कोशिंबीर आणि अत्युच्च दर्जाचं ज्याला ‘कवडी’ चं म्हणतात त्या परफेक्ट विरजलेल्या दह्याची वाटी! कोणीही व्यक्ती वर्षातले 365 दिवस दोनवेळा जेवली तरी त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी खरोखरच घरगुती चवीची थाळी, ही पूना बोर्डिंग च्या जेवणाची खरी खासियत! वरती गोड पदार्थ घ्यायचा असेल ऑप्शनल आणि तोही इथेच बनवलेला. आठवण होईल तेव्हा इथल्या जेवणाचा डबा मी मागवत असतो पण परवा अनेक महिन्यांनी अग्रजच्या बासाहेब थत्ते यांच्याबरोबर पूना बोर्डिंगला जेवायला जायचा योग आला.
जायला उशीर झाला होता, थाळी वाढली जात असताना शेजारी बसलेल्या बाळासाहेबांना सहज म्हणालो,” आज जेवायला नेहमीपेक्षा उशीर झालाय , कडकडून भूक लागल्ये”. ते ऐकताच वाढपी काकांनी हातातल्या बटाट्याच्या भाजीचा अजून एक डाव चटकन पानात वाढला.मी त्यांच्याकडे बघेपर्यंत खा खा! हसून हसत पुढेही गेले.नंतर स्टाफ करता शिल्लक ठेवलेल्यातली डाळिब्यांची उसळ न मागता पानात पडली.. हे अगत्य आज कुठे बघायला मिळतं ?
लहानपणापासून बघत आलोय त्या उडपीकर कुटुंबीयांच्या आतिथ्याचा यावेळी नव्याने अनुभव मिळाला. जेवणानंतर रंगलेल्या गप्पांमधे पूना बोर्डिंगबद्दलच्या अनेक आठवणी निघाल्या. कुतूहल म्हणून वाढप्यांनी अगत्याने ( आपणहून) वाढलेल्या भाजी आणि नंतरच्या जेवणाबद्दल त्यांना विचारलं. त्यांच्याकडून उडपीकरांचा माणसांना माणुस म्हणून वागवण्याचा नवा पैलू माझ्या समोर आला.
पूना बोर्डिंगमधे रोज शेकडो लोक जेवून जातात हे आधीच सांगितलं पण इथे सर्वात आधी जेवण होतं ते इथल्या सगळ्या स्टाफचं ! बोर्डिंगसाठी केलेला स्वयंपाक ते सुरु व्हायच्या आधी साडेदहा - अकराच्या सुमारास सगळा स्टाफ पोटभर जेवतो. त्यानंतरच येणाऱ्या लोकांकरता इथले दरवाजे उघडले जातात.
वाजता बोर्डिंग बंद होताना मालक उडपीकर इथेच जेवतात ( रोज) ग्राहकांना एक स्वयंपाक, स्टाफला जरा कमी दर्जाचा आणि मालकांसाठी जरा ‘स्पेशल’ स्वयंपाक, ही पद्धत बहुतांशी हॉटेल्समधे बघायला मिळते. पण तसली भानगड इथे नाही. ही पण इथली तीन पिढ्या सुरु असलेल्यापैकी एक परंपरा ! पण त्याचेही अवडंबर इथे ( मालकांसकट) कोणीही करत नाही. “ स्वतः मालक ही इथेच जेवतात छाप पाटी तर नाहीच नाही.
मी स्वतःच ज्यावेळी भोचकपणा करुन ( नेहमीप्रमाणे) विचारलं त्याचवेळी ही माहिती उडपीकरांनी दिली. त्याहीवेळी,” स्वतः उपाशी असलेला मनुष्य दुसऱ्याला पोटभर जेवायला कसा वाढणार ?” हे त्यांचे साधेसोपे तत्वज्ञान मनाला भिडलं. कोणत्याही हॉटेलमधे क्वालिटी द्यायला जवाबदार असणारे स्वयपाकी, वाढपी आणि स्वतः मालक हे तिन्ही घटक जेव्हा रोज दोन वेळा ताजा बनवला जाणाऱ्या स्वयंपाकाचे सेवन करतात, त्या ठिकाणी मालाचा दर्जा कधीही निकृष्ट असूच शकत नाही. हे मीच नाही तर फुड इंडस्ट्रीमधली कोणीही व्यक्ती सांगू शकेल.
ह्याच उत्तम चवीच्या आणि दर्जेदार खाण्याच्या जीवावर,आता रहायला बरेच लांब गेले असूनही आता नव्वद वर्षे वय असलेले श्री. परांजपे आजोबा इथे गेले तब्बल ५५ वर्ष,आवडीने जेवायला येतायत. त्याच बरोबर हिंजवडी,मुंढव्यात असलेल्या आयटी कंपनीत नोकरी करुन,रोज रात्री इथे जेवायला येणारी ‘ कपल्स’ ही इथे बघायला मिळतात.साधारण ३-४ पिढ्या एकाचवेळी जेवायला येण्याचं भाग्य फार मोठंय.
लिमिटेड थाळी असूनही आजकाल मुलं जेवत नाहीत म्हणून हॉस्टेलवर रहाणाऱ्या मुलामुलींसाठी तिसेक रुपयात दोन पोळ्या आणि हाफ प्लेट भाजीही इथून पार्सल होतात. पण उडपीकरांचा खरा आग्रह लोकांनी इथे येऊन मनापासून जेवावं हा असतो.मग तिथे मोजमाप नाही.वाढताना हात सढळ ! हेच प्रेम मग येणाऱ्या नेहमीच्या ग्राहकांमधे दिसून येतं. म्हणूनच आजही बिटाची कोशिंबीर, गुरुवारी रात्री असलेली मुगाची खिचडी, कढी. दर रविवारचा मेन्यु मसालेभात आणि अळूची भाजी खायला इथे येणारी ग्राहकांची रांग, पार खालच्या मजल्यापर्यंत पोचते.
स्वानुभवावरुन सांगतो,कोणत्याही मोठी परंपरा लाभलेल्या हॉटेल, मेसला असं भाग्य लाभणं हे सोपं काम नाही.फार अभावानी लाभतं ते.वर्षानुवर्षे अविरत दर्जेदार काम, पिढ्यानपिढ्या टिकवून ठेवलेला आपलेपणा असल्याशिवाय हे कधीच शक्य होत नसतं. माझ्या माहितीप्रमाणे शंभरीच्या उंबरठ्यावर असलेल्या ‘’ पूना बोर्डिंग’ येवढी जुनी आणि अजूनही तितक्याच जोरात सुरु असलेली पुणेरी मराठी शाकाहारी थाळी पुण्यात तरी दुसरी नसावी. ही शंभरी आणि त्यानंतरची त्यांची इनिंग अशीच बहरत जावो,ही एक खवैय्या पुणेकराकडून मनोमन प्रार्थना !
पूना बोर्डिंग पत्ता : पेरुगेट चौक, पोलीस चौकीसमोर, सदाशिव पेठ ,पुणे 30
वेळ
सकाळी : 11.30 ते दुपारी 3
संध्याकाळी : 7 ते रात्री 10 पर्यंत
साप्ताहिक सुट्टी : शुक्रवार
पूना बोर्डिंग : आवडीने जेवायला वाढणारी माणसं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jan 2019 02:11 PM (IST)
पूना बोर्डिंग हे पुण्यातले प्रसिद्ध हॉटेल आहे. त्याची सुरुवात पुण्याच्या सदाशिव पेठेत 1925 साली झाली. येथे घरगुती पद्धतीचे शाकाहारी जेवण थाळी पद्धतीने मिळते. काही शे लोक येथे दररोज सकाळी-संध्याकाळी जेवून जातात. सगळ्यांना इथल्या जेवणाची चव आवडते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -