मंत्री गिरीश बापटांना औरंगाबाद खंडपीठाची नोटीस
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 23 Jan 2019 01:59 PM (IST)
बीड गेवराई तालुक्यातील संगम जळगाव गावातील निलंबित रेशन दुकान पुन्हा दुकानदाराला बहाल केल्याच्या प्रकरणी मंत्री बापट यांना नोटीस बजावली आहे.
फाईल फोटो
औरंगाबाद : स्वस्त धान्य दुकानाच्या संबंधित एका निकालाच्या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. कर्तव्यात कसूर आणि मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा ठपका खंडपीठाने गिरीश बापट यांच्यावर ठेवला होता. त्यानंतर आता खंडपीठाने सदरील प्रकरणाबाबत मंत्री गिरीश बापट यांना नोटीस बजावली आहे. यामुळे हे प्रकरण मंत्री गिरीश बापट यांच्या चांगलेच अंगलट येण्याची शक्यता आहे. बीड गेवराई तालुक्यातील संगम जळगाव गावातील निलंबित रेशन दुकान पुन्हा दुकानदाराला बहाल केल्याच्या प्रकरणी मंत्री बापट यांना नोटीस बजावली आहे. संगम जळगाव मध्ये रवींद्र चव्हाण यांचं रेशन दुकान आहे. या दुकानाच्या विरोधात प्रभाकर नागरे आणि मनोज नागरे यांनी तक्रार केली होती. दुकान मालक स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकतो आणि चढ्या भावाने देतो. यासंदर्भात तहसीलदारांनी चौकशी केली आणि संबंधित दुकानदाराचे रेशन दुकानाचा परवाना निलंबित केला.