Priyanka Gandhi In Kolhapur : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रथमच कोल्हापूर दौरा केला. गांधी मैदानात त्यांची विराट सभा पार पडली. सभा पार पडल्यानंतर प्रियांका दिल्लीसाठी रवाना झाल्या. मात्र, दिल्लीला प्रस्थान करण्यापूर्वी कोल्हापूर विमानतळावर एक अनोखा प्रसंग घडला आणि त्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.
प्रियांका गांधी यांनी बाजीराव खाडे यांना बोलवून घेतलं
प्रियांका गांधी यांचा कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर पार्किगमध्ये उभे असलेल्या बाजीराव खाडे यांच्याकडे लक्ष गेले. आपल्या टीममधील जुना सहकारी प्रियांका गांधी यांनी ताफा अचानक थांबवला. बाजीराव खाडे प्रियांका गांधी यांच्या टीममधील एक सदस्य होते. त्यामुळे प्रियांका आणि बाजीराव खाडे यांचे जवळचे संबंध आहेत. मात्र, लोकसभा निवडणुकीत बाजीराव खाडे यांनी कोल्हापूर लोकसभेला बंडखोरी केल्याने काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
प्रियांका गांधी कोल्हापूर विमानतळावर आल्यानंतर त्यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी बाजीराव खाडे विमानतळाच्या पार्किंगमध्ये थांबले होते. लांबूनच बाजीराव खाडे यांना पाहिल्यानंतर प्रियांका गांधी यांचा ताफा अचानक थांबला. प्रियांका गांधी यांनी बाजीराव खाडे यांना बोलवून घेतलं आणि विचारपूस केली. मात्र, ताफा थांबवल्यामुळे सुरक्षारक्षकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.
बंडखोरी केल्याने काँग्रेस पक्षातून हकालपट्टी
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज यांना ओबीसी, वंचित तसेच एमआयएमकडून पाठिंबा देण्यात आला होता. अशा स्थितीत बाजीराव खाडे प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या बाजीराव खाडे यांनी केलेल्या बंडखोरीने त्यांच्यावर कारवाई होणार का? अशी चर्चा होती. मात्र, काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली. बाजीराव खाडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बंडखोरी केली होती. खाडे यांनी माघार घेण्यासाठी पंधरा-वीस दिवस मनधरणी सुरु होती, मात्र,पक्षाकडून सामान्य कार्यकर्त्यांना बेदखल केलं जात असून स्वाभिमानासाठी मैदानात उतरल्याची घोषणा केली होती. अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांना रडू कोसळले होते.
कोण आहेत बाजीराव खाडे?
करवीर तालुक्यातील सांगरुळमधील बाजीराव खाडे गेल्या 28 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यांनी युवक काँग्रेसपासून काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम पाहिलं आहे. त्यांच्यावर पक्ष नेतृत्वाने विविध राज्यांची जबाबदारीही दिली होती. दीड वर्षांपूर्वी त्यांनी लोकसभा निवडणूकीची तयारी सुरु केली. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात दौरा केला होता. कोल्हापूर मतदारसंघ काँग्रेसला मिळाल्याने नेतृत्व आपला विचार करेल, अशी आशा होती. तथापि, काँग्रेसने शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापूर मतदारसंघ मिळवत शाहू छत्रपती यांना उमेदवारी दिली.
इतर महत्वाच्या बातम्या