सक्रिय राजकारणात घराणेशाहीचा आणि नात्यागोत्यांचा हा पॅटर्न आज पवार, देशमुख, चव्हाण, मुंडे, विखे पाटील व्हाया आज ठाकरे परिवारापर्यंत येऊन पोहोचला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेत दिसतील. ठाकरे खानदानातले ते पहिले व्यक्ती असतील जे विधानसभेत दिसतील.
पवार फॅमिलीची 'पॉवर' राज्याच्या राजकारणात जबरदस्त आहे, ती या निवडणुकीत जास्त तीव्रतेने दिसून आली आहे. काका अजित पवार यांच्यासोबत आता पुतणे रोहित पवार देखील विधानसभेत दिसतील. रोहित पवारांनी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. तर अजित पवारांनी बारामती आपला गड असल्याचे सिद्ध करत विरोधकांचे डिपॉझिट देखील जप्त केले आहे. पवार परिवारातूनच सुप्रिया सुळे या खासदार आहेत. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा यांचे भाचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे देखील तुळजापूरमधून भाजपकडून विजयी झाले आहेत.
मराठवाड्यात बीडच्या परळीत भावा-बहिणीतील राजकीय वादाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले. अखेर प्रचंड भावनिक वादविवादानंतर बहिण पंकजा मुंडे यांचा पराभव भाऊ धनंजय मुंडे यांनी बाजी मारली. पंकजा यांच्याबाबत धनंजय मुंडे यांच्या कथित वक्तव्यानंतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी देखील या वादात उडी घेतली होती. मात्र बहिणीचा पराभव त्या वाचवू शकल्या नाहीत.
लातूरमध्ये माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्याचे आणि देशाचे राजकारण गाजवले. त्यांचे दोन्ही पुत्र आता राज्याच्या राजकारणात दिसतील. अमित देशमुख लातूर शहरातून तर धाकटे चिरंजीव धीरज देशमुख लातूर ग्रामीणमधून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत. तर निलंग्यामध्ये माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील यांना पुतणे कॅबिनेट मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी पराभूत केले.
बीडमध्ये क्षीरसागर काका पुतण्याच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. शिवसेनेकडून मंत्री जयदत्त क्षीरसागर तर राष्ट्रवादीकडून संदीप क्षीरसागर हे मैदानात होते. इथे काकांचा पराभव करत पुतणे संदीप यांनी पहिल्यांदात विधानसभेत पोहोचले आहेत.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे येवल्यातून विजयी झाले आहेत. त्यांचे पुत्र पंकज भुजबळ नांदगावमधून मैदानात होते. ते पिछाडीवर आहेत. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे या श्रीवर्धनमधून पहिल्यांदाच आमदार झाल्या आहेत.
सोलापुरात माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी प्रणिती शिंदे यांनी तिसऱ्यांदा विधानसभा गाठली आहे. तर माढ्यातले शिंदे बंधू देखील विधानसभेत दिसणार आहेत. माढा मतदारसंघातून बबनराव शिंदे राष्ट्रवादीकडून तर करमाळातून त्यांचे बंधू संजय शिंदे यांनी विजय मिळवला आहे. संजय शिंदे यांना राष्ट्रवादीने शेवटच्या क्षणी पाठिंबा दिला होता. त्यांनी शिवसेनेच्या रश्मी बागल यांचा पराभव केला.
चंद्रपूरचे कॉंग्रेसचे एकमेव खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना वरोरा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी संजय देवतळे यांचा पराभव केला. यवतमाळच्या पुसदमध्ये माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या परिवारात देखील अंतर्गत वाद आहेत. राष्ट्रवादीकडून मनोहर नाईक यांचे पुत्र इंद्रनील तर भाजपकडून त्यांचे चुलतभाऊ निलय नाईक अशी लढत होती. यात इंद्रनील यांनी बाजी मारली. अमरावतीच्या बडनेरातून अपक्ष रवि राणा यांनी पुन्हा विधानसभा गाठली आहे. त्यांच्या पत्नी नवनीत कौर राणा अमरावतीच्या खासदार आहेत. अमरावतीच्या तिवसातून कॉंग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आपल्या बहिणीचा पराभव करत विधानसभा गाठली.
दापोलीमधून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम यांनी संजय कदम यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे. विक्रोळीतून खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी पुन्हा बाजी मारली आहे. ठाण्याच्या कोपरी पाचपाखाडीमधून शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पुन्हा दणदणीत विजय मिळवत विधानसभा गाठली. त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याणचे खासदार आहेत.
वसईतून बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेचे विजय पाटील यांचा पराभव केला तर नालासोपारातून त्यांचे पुत्र क्षीतिज ठाकूर यांनी शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांचा पराभव करत विधानसभा गाठली आहे.
कणकवलीतून माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांचे चिरंजीव नितेश राणे भाजपकडून मैदानात होते. शिवसेनेचे कडवे आव्हान पार करत नितेश यांनी पुन्हा विधानसभा गाठली आहे.
जालन्यातून केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे भाजपकडून पुन्हा विधानसभेत पोहोचले आहेत. तर शिर्डीतून राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपकडून विधानसभेत पुन्हा पोहोचले आहेत. त्यांचे पुत्र डॉ. सुजय विखे पाटील हे खासदार आहेत. कुलाब्यातून विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांनी भाजपकडून विधानसभा गाठली आहे.
हे देखील वाचा - महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावरचा गोतावळा, घराणेशाहीचा रुबाब कायम