जळगाव : शिवसेनेतून बंडखोरी केलेले आणि राष्ट्रवादी पुरस्कृत चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांचा पराभव केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना हा मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान मुक्ताईनगरमध्ये ऐतिहासिक बदल झाला आहे. दिवाळीच्या निमित्ताने नरकासुराचा वध झाला आहे, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. खडसे यांनी 30 वर्षांत यांनी या मतदारसंघाचा कोणताच विकास केला नाही. त्यांना पक्षाने तिकीट नाकारलं तर घराणेशाहीला ऊत आणला. त्यांच्या कन्येला समोर केलं याची लोकांमध्ये चिड निर्माण झाली होती आणि आज त्यांना हेच लोकांनी दाखवून दिल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

विजयी होताच चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगरमधून ढोल ताशाच्या तालावर मिरवणूक काढली. हजारो कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष साजरा केला आहे

कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून हा विजय मिळवून आणला असून तुमच्याकडून काम होऊ शकत नाही. तुम्ही यशस्वी नाही हे लोकांनी आज दाखवून दिलंय, विकास शून्य आणि घराणेशाही खडसे यांना भोवली. सिंचन, बेरोजगारी, चांगले शिक्षण यासाठी मी काम करणार आहे, असे पाटील म्हणाले.

उत्तर महाराष्ट्रात भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही याची खंत : खडसे

यावेळी एकनाथ खडसे म्हणाले की, हा पराभव आणि मतदारांनी दिलेला कौल आम्ही आम्ही मान्य करतो. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते झटले. इथे भाजप विरुद्ध सारे असे चित्र होते. हा मतदारसंघ हा भाजप कमी आणि नाथाभाऊंवर प्रेम करणारा अधिक होता. हे मी वरिष्ठांना सांगितलं होतं. हा मतदारसंघ प्रतिकूल परिस्थितीत मी सांभाळला.  या पराभवाची कारण शोधावी लागतील. नावाला तो बंडखोर होता मात्र पक्षातून शिवसेनेतून त्यांना बाहेर काढण्यात आलं नव्हतं. राष्ट्रवादीचा देखील आजपर्यंत शिवसेनेला छुपा पाठिंबा होता. यावेळी राष्ट्रवादीने उघड पाठिंबा दिला, असे ते म्हणाले.

खडसे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्रात भाजपला अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही याची खंत आहे. उत्तर महाराष्ट्रात 40 जागा येतील असा अंदाज गिरीश महाजन यांनी व्यक्त केला होता., मात्र तस झालं नाही. त्यांना महापालिका आणि अन्य निवडणुकांचा अनुभव होता. मात्र तस झालं नाही,  मी भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. पक्ष उभा करण्यात माझा महत्वाचा वाटा आहे त्यामुळं पक्ष सोडून जाण्याचा विचार नाही, असेही खडसे म्हणाले.