मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 21 सप्टेंबरला आचारसंहिता लागू झाल्यानंतर महाराष्ट्रात धडाडू लागलेल्या प्रचार तोफा आता थंडावल्या आहेत. आचारसंहितेच्या नियमांनुसार आता कुणालाच जाहीर प्रचार करता येणार नाही. त्यामुळं प्रचाराची धामधूम संपली असली तरी उमेदवारांची धाकधूक नक्कीच वाढली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत मतदारांना गळ घालण्यासाठी छुपा प्रचार मात्र सुरुच राहणार आहे.

सर्वच पक्षांमधल्या बंडखोरांनी डोकं वर काढल्यानं अनेक उमेदवारांचं भवितव्य अडचणीत आहे. दरम्यान गेले चार आठवडे महाराष्ट्रानं प्रचाराच्या निमित्तानं महायुती आणि महाआघाडीमधलं वाकयुद्ध अनुभवलं. गेले चार आठवडे महाराष्ट्रात प्रचाराची धामधूम पाहायला मिळाली. भाजपच्या वतीनं खुद्द पंतप्रधान, अमित शाह, देवेंद्र फडणवीसांनी मैदान गाजवलं तर शिवसेनेसाठी यंदा उद्धव ठाकरेंसोबत आदित्यही प्रचाराच्या आखाड्यात उतरले. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून शरद पवारांचा झंजावात पाहायला मिळाला. सोबतच अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, अमोल कोल्हे यांच्या सभांनीही मैदान जागवले. तर ईडीच्या नोटिशीनंतर काही काळ राज ठाकरेंनी देखील मैदान गाजवत सरकारवर हल्लाबोल केला. कॉंग्रेसकडून राहुल गांधी यांच्या दोनच सभा झाल्या. तर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही सभा घेत प्रचार केला.

वंचित बहुजन आघाडीने देखील प्रचारात बाजी मारली असून प्रकाश आंबेडकरांनी राज्यभरात सभा घेतल्या आहेत. तर एमआयएमकडून असदुद्दीन ओवैसी यांच्या देखील सभा या दरम्यान गाजल्या. आता कुणाचा प्रचार फळाला येणार हे 21 ऑक्टोबरला मतदान झाल्यानंतर   24 ऑक्टोबरला स्पष्ट होणार आहे.

विधानसभा निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या 225 सभा
राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारतोफा आज थंडावत असताना सर्वाधिक सभा घेण्याचा विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला असा दावा भाजपकडून केला जात आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून एकूण 65 सभा मुख्यमंत्र्यांनी घेतल्या, तर त्यापूर्वी महिनाभरातील महाजनादेश यात्रेदरम्यान सुमारे 160 सभा मुख्यमंत्र्यांनी घेतल्या होत्या. तर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ सभा घेतल्या तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राज्यात 10 सभा घेतल्या.

विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक दृष्टीक्षेप…

एकूण मतदार
· महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार.
· महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत.
· यामध्ये पुरुष मतदार – 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750
· महिला मतदार- 4 कोटी 28 लाख 43 हजार 635,
· तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत.
· दिव्यांग मतदार – 3 लाख 96 हजार आहेत
· सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत

मतदान केंद्रे
· विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत.

मुख्य मतदान केंद्र – 95, 473
सहायक मतदान केंद्र – 1,188

  • खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदान केंद्रे’ स्थापन केली जातील.


यंत्रणा सज्ज

  • विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.

  • विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.