माओवाद्यांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याच्या इशाऱ्यानंतर गडचिरोली-चिमुर मतदार संघात अतिरिक्त पोलीस बल तैनात
एबीपी माझा वेब टीम | 09 Apr 2019 09:37 PM (IST)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात गडचिरोली-चिमुरसह विदर्भातील 7 मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे.
गडचिरोली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात गडचिरोली-चिमुरसह विदर्भातील 7 मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 11 एप्रिल रोजी होणार आहे. गडचिरोलीतल्या दुर्घम भागात पोलिंग पार्टींना पाठवण्यास सुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमधील नागरिकांना माओवाद्यांनी निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. गडचिरोलीत माओवाद्यांमुळे कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हात अतिरिक्त पोलीस बल तैनात करण्यात आले आहे. गडचिरोलीमध्ये जिल्हा पोलीस दलातील सी-60 चे कमांडो, सीआरपीएफ, आणि एसआरपी दलाला अतिदुर्गम नक्षलग्रस्त भागात तैनात करण्यात आले आहे. ज्या भागात पोलिंग पार्टी सहजपणे पोहचू शकत नाही, ज्या भागात माओवाद्यांचा वावर असतो, त्या भागात वायुसेनेचे 3 MI 70 हे हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. अतिदुर्गम भागातील पोलिंग बूथवर जाण्यासाठी या हेलिकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे. गडचिरोलीतले नागरिक माओवाद्यांच्या बुलेटला लोकशाहीच्या बॅलेटने कसे मात करतात, हे येत्या 11 तारखेला कळेल.