मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचार कार्डवर सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख सापडल्याने निवडणूक आयोगाने खारमधील ठिकाणावर छापा टाकला आहे. निवडणूक आयोगाने ही जागा सील केली आहे आणि त्याठिकाणी असलेलं सामानही ताब्यात घेतलं आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली आहे.


पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या एअर स्ट्राईकचा प्रचारासाठी वापर न करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र भाजपच्या प्रचार कार्डवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोसह सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख करण्यात आला आहे. ही कार्ड मुंबईतील खारमधील एका ठिकाणी बनवली जात होती. याची माहिती मिळताच निवडणूक आयोगाने त्याठिकाणी छापा टाकला. मात्र ही जागा भाजपचं कार्यालय आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती नाही.

देशात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान 2 दिवसांवर आलं आहे.  11 एप्रिल रोजी देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. त्यात निवडणूक आयोगानं भाजपवरच स्ट्राईक केला आहे.

निवडणूक आयोगानं सर्जिकल स्ट्राईकचा वापर निवडणुकीच्या प्रचारात करण्यास सक्त मनाई केली आहे, मात्र तरी देखील भाजपकडून सर्जिकल स्ट्राईकचा प्रचारात वापर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगानं कारवाई करत ही जागा सील केली आहे.