पालघर : लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात यावेळी कोण बाजी मारणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने बाजी मारली असली तरी या निवडणुकीमध्ये त्याची सहजगती पुनरावृत्ती होणे कठीण बनली आहे.

पालघर लोकसभा हा मतदारसंघ सध्याही सर्वच पक्षासाठी प्रतिष्ठेचा ठरला असून, शिवसेना-भाजपसाठी तर महाप्रतिष्ठेचा बनला आहे. एकूणच विचार केला तर मतदारसंघाचा विस्तार मोठा असून सागरी, डोंगरी आणि नागरी असा विस्तारलेला हा लोकसभा मतदारसंघ असून सहा विधानसभा मतदारसंघांनी बनलेला आहे. आताच्या मतदार नोंदणीनुसार 18 लाख 12 हजार 983 मतदार आहेत.



एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघातील मक्तेदारी मोडून काढण्यात भाजप यशस्वी ठरली. सन 2009 मध्ये बविआकड़ून पराभव झाल्यानंतर भाजपने 2014 आणि त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत पुन्हा बाजी मारली. भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा निवडून आले. वणगांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळाली, वणगांचे चिरंजीव भाजपाकडून नाराज होऊन शिवसेनेत गेले आणि काँग्रेसमध्ये असलेले राजेंद्र गावित भाजपच्या गळाला लागले. त्यानंतर मोठं निवडणुकीचं रणयुद्ध रंगून अखेर भाजपकडून राजेंद्र गावित निवडून आले.



परंतु येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसमोर बविआचे प्रचंड आव्हान उभे ठाकणार आहे. युती झाली किंवा झाली नाही तरी, बविआ या निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, असा अंदाज आहे. युती जरी झाली तरी जिल्ह्यातील शिवसैनिक भाजपसाठी जीव तोडून मेहनत करतील, अशी सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा याना मिळालेली अडीच लाख मते कोणाच्या पारड्यात जातात, यावर सारे काही अवलंबून आहे. पालकमंत्री विष्णु सवरा यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर भाजपचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक नाराज असून त्याचा फटका येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो.



भाजपकडून गावित यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, परंतु त्यांना याखेपेस प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. शिवसैनिक आणि गावित यांच्यामध्ये आजवर कधीही समन्वय निर्माण होऊ शकला नाही. गावित यांची राजकीय वाटचाल ही"एकला चलो रे"अशी राहिल्यामुळे प्रचरादरम्यान त्यांच्यासोबत फारसे कार्यकर्ते पाहावयास मिळत नाहीत. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मात्र त्यांना आपल्या या स्वभावाला वेसण घालावी लागली. मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये जिल्ह्यात ठाण मांडून बसल्यामुळे त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होऊ शकले. यावेळी मात्र त्याना विजयासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.



तर दुसऱ्या बाजूला शिवसेना-भाजप युती जरी झाली तरी पालघर लोकसभेतील शिवसेना भाजपा कार्यकर्ते एकमेकांशी जमवून घेतील का? हाही मोठा गंभीर प्रश्न आहे. एकीकडे भाजपचे खासदार राजेंद्र गावित काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले परंतु आता युतीचा प्रश्न जर निर्माण झाला तर शिवसेना पालघरच्या जागेसाठी अडून बसली आहे. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच्या श्रीनिवास वणगा यांचा झालेला प्रभाव जिव्हारी लागला असून ते वणगा कुटुंबियांना न्याय देण्यासाठी अडून बसले आहेत. तर दुसरीकडे भाजपला प्रश्न पडलाय ही जागा शिवसेनेसाठी सोडली तर राजेंद्र गावित यांचे पुनर्वसन कुठे करावं?

एकूणच पहायला गेलं काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन विकास आघाडी एकत्र आली तर बहुजन विकास आघाडीला पालघरची जागा जिंकणे सोपं जाईल तर दुसरीकडे शिवसेना-भाजपने मनापासून एकमेकांना साथ दिली तर युतीची जागाही जिंकून येणे सोपं जाईल.



तिसरीकडचा विचार केला तर या मतदारसंघात काही सामाजिक संघटनांचा प्रभावही पाहायला मिळेल. श्रमजीवींचे  विवेक पंडित सध्या भाजपच्या गोटात आहेत तर पोटनिवडणुकीत जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे निलेश सांबारेही भाजपकडेच होते. त्यामुळे यांचीही भूमिका महत्त्वाची ठरणार असून आगामी  लोकसभेत हे कुणाला साथ देतात हेही पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

चौथी बाब आपण लक्षात घ्यायला गेलो तर आरक्षणाचा मुद्दाही या निवडणुकीत गाजणार असून सध्या पेसा कायद्याचा फटका येथील बिगर आदिवासी समाजाला सतावू लागला आहे. त्यामुळे हा सर्व समाजही काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचे ठरणार आहे .

सध्या पालघर लोकसभेसाठी सर्व पक्षांची उमेदवार चाचपणी सुरु सुरु असून भाजपकडून राजेंद्र गावित, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा, बहुजन विकास आघाडीकडून बळीराम जाधव आणि राजेश पाटील यांची नाव चर्चेत आहेत तर काँग्रेसकडून माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा यांच्याही नावाची चर्चा आहे. तर दुसरीकडे काही अपक्ष उमेदवारही चर्चेत आहेत. सीपीएमची भूमिकाही या मतदारसंघात महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

एकूणच बघायला गेलं तर भाजप, शिवसेना यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे