परभणी : परभणीच्या पाथरीत शेतकऱ्यांचा प्रामाणिकपणाचे उदाहरण समोर आले आहे. पाथरीतील SBI मधील रोखपालाकडून चुकीने एका शेतकऱ्याला 2 लाख तर दुसऱ्याला 50 हजार अधिक दिले गेले होते. मात्र ती रक्कम या शेतकऱ्यांनी बँकेला परत करून प्रामाणिकपणा दर्शन घडविले आहे.

पाथरी शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत कानसूर येथील शेतकरी गोकूळ शिंदे हे शेतकरी पैसे काढण्यासाठी आले होते. त्यांनी रोखपाल उदित तिवारी यांच्याकडे एक लाख 55 हजार काढण्याची स्लिप दिली. मात्र तिवारी यांच्याकडून चुकीने त्यांना 3  लाख 55 हजार रुपये दिले गेले. बाब बँकेबाहेर आल्यानंतर शिंदे यांना कळली. तेंव्हा त्यांनी आगाऊ आलेली 2 लाखांची रक्कम त्यांच्या मित्रांच्या हस्ते बँकेत पाठवून दिली.

ही घटना ताजी असतानाच पुन्हा असाच प्रकार भगवान शिंदे यांच्या बरोबर झाला. त्यांनी 7 लाख रुपये काढले, मात्र त्यांना साडेसात लाख रुपये देण्यात आले. त्यांनीही लगेच रोखपालांकडे जाऊन ती रक्कम परत केली. या दोन्ही शेतकऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल बँकेकडून त्यांचे आभार मानण्यात आले. येत्या सोमवारी बँकेकडून दोघांचाही सत्कार करण्यात येणार आहे.