मुंबई : देशात बेरोजगारीवर राजकारण तापत असताना राज्य सरकारने घोषणा केलेल्या मेगा भरतीच्या प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली आहे. मात्र याला खरंच मेगा भरती म्हणावं का? असा प्रश्न निर्माण होत आहे. याचं कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यात प्रसिद्ध झालेल्या चार हजार पदांसाठी तब्बल साडे सात लाख अर्जदारांनी नोंदणी केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या सूत्रांकडून समोर आली आहे.


सरकारची 72 हजार जागांची पदभरती दोन टप्प्यात करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात विविध आस्थापनांच्या पदांसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. 'वर्ग क आणि ड' च्या या सरकारी नोकऱ्यांसाठी तरुणांकडून मिळणारा प्रतिसाद थक्क करणारा आहे. कारण आतापर्यंत निघालेल्या एकूण 4410 पदांसाठी तब्बल 7.88 लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. याचा अर्थ 1 पदासाठी सरासरी 178 अर्जदार स्पर्धा करत आहेत.


विभागनिहाय पदे आणि त्यासाठी आलेल्या अर्ज


सार्वजनिक बांधकाम विभाग
कनिष्ठ अभियंता : 405 पदांसाठी 58,000 अर्ज


कृषी विभाग
कृषी सेवक : 1416 पदांसाठी 82,307 अर्ज


वित्त विभाग
लेखापाल, क्लर्क, कनिष्ठ लेखापरीक्षक आणि कनिष्ठ लेखापाल : 959 पदांसाठी 1.74 लाख अर्ज


वन विभाग
वन रक्षक : 1218 पदांसाठी 4.3 लाख अर्ज
वन सर्वेक्षक : 51 पदांसाठी 1233 अर्ज


मत्स्य विभाग 
सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी : 79 पदांसाठी 591 अर्ज


जल संधारण विभाग 
सहाय्यक माती व जल संरक्षण अधिकारी : 282 पदांसाठी 42,078 अर्ज