पालघर जिल्ह्यातील पालघर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ. या मतदार संघावर सर्वच पक्षाचं लक्ष असतं. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आता शिवसेनावासी झालेले खासदार राजेंद्र गावित हे कॉंग्रेस कडून 20971 मताधिक्य मिळवून निवडून आले होते. मात्र 2014 मधे राष्ट्रवादीमधून शिवसेनेत प्रवेश केलेले कृष्णा घोडा यांनी गावित यांचा अवघ्या 515 मतांनी पराभव केला. त्यानंतर शिवसेना आमदार कृष्णा घोडा यांच्या अकाली निधनामुळे पालघर विधानसभेची जागा रिक्त झाली. त्यामुळे लागलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कृष्णा घोडा यांचे चिरंजीव अमित घोडा यांना उमेदवारी दिली. सहानुभूतीच्या लाटेवर अमित घोडा यांचा सहज विजय होईल, असं वाटत होतं. पण मागच्या वेळी फक्त 515 मतांनी पराभूत झालेल्या गावित यांनी या वेळी पुन्हा एकदा आपली सारी ताकद पणाला लावली. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपली सारी ताकद पणाला लावली होती. ठाण्यातून मोठ्या संख्येने शिवसैनिक पालघरमध्ये तळ ठोकून होते. विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार न देता शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही प्रचारासाठी आले होते. बहुजन विकास आघाडीनेही प्रचाराचे रान उठवलं. पण मतदानाच्या दिवशी मतदारांना घराबाहेर काढण्यात शिवसेना यशस्वी ठरली. त्यामुळे या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अमित घोडा यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. अमित यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत काँग्रेसचे माजी राज्यमंत्री आणि आत्ता शिवसेनावासी झालेले खासदार राजेंद्र गावित यांना १८, ९४८ मतांनी पराभूत केले. अमित यांना ६८,१८१ मते मिळाली, तर गावित यांना ४८,१८१ मतांवर समाधान मानावं लागलं. बहुजन विकास आघाडीच्या मनीषा निमकर ३६,७८१ मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.
पालघर लोकसभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वणगा कुटुंबियांना वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगितलं होतं तरीही श्रीनिवास वणगा यांना उमेदवारी न देता काँग्रेस मधून भाजप आणि भाजप मधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिली. परंतु आत्ता श्रीनिवास वणगा हे आत्ता पालघर विधानसभेसाठी इच्छूक असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही उमेदवारी श्रीनिवासला देऊन दिलेला शब्द पूर्ण करतील असा विश्वास वणगा कुटुंबियांना आहे.
तर पालघर विधानसभेचे विद्यमान आमदार अमित घोडा यांना मिळालेल्या कार्यकाळात ते जनतेवर आपली छाप पाडू शकलेले नाहीत, त्याच बरोबर आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी परकीयांना मदत केल्याची चर्चाही ऐकायला मिळत आहे. तर आमदार निधीचा फायदा जवळच्या कार्यकर्त्यांना देऊन इतरांची नाराजी ओढवून घेतली आहे. त्यामुळे पालघर मतदारसंघातील मतदार त्यांच्याबद्दल उघडउघड नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे त्यांना ह्या वेळेस उमेदवारी दिली जाईल का? यात शंका आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील महिला शिवसैनिकांची मागणी वेगळीच आहे. पालघर विधानसभा मतदारसंघात महिलांना उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. या साठी माजी जिल्हा परिषद सदस्य, शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटक आणि पत्रकार असलेल्या वैदेही वाढणे यांचे नावही पुढे येत आहे.
तर दुसरीकडे काँग्रेस ,राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी यांची युती होणार की वेगवेगळे लढणार हे अजूनही निश्चित नाही त्यातच पालघर विधानसभेत काँग्रेस राष्ट्रवादी सध्या खिळखिळी झाली असून कोण उमेदवार असतील ह्याचा संभ्रम कायम आहे. माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे चिरंजीव सचिन शिंगडा काँग्रेस राष्ट्रवादी कडून रिंगणात असण्याची शक्यता आहे. तर बहुजन विकास आघाडीकडून माजी राज्यमंत्री मनीषा निमकर यांच नाव समोर येत आहे.
त्यामुळे पालघर विधान सभेवर सध्या भाजपा शिवसेनेचे वर्चस्व दिसून येत असले तरीही उमेदवारी कोणाला मिळते, यावर बरंच काही अवलंबून आहे. मात्र मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांच्यात चर्चा होऊन पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वणगा यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे