परभणी : सामन्य माणसांना रोजचं जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक तक्रारी करुनही प्रशासन त्याची दखल घेत नाही. मात्र एखाद्या वेळी नेतेमंडळींना त्रास झाला की संतापून नेते मंडळी त्याविरोधात कारवाई करतात. असाच प्रकार परभणीमध्ये समोर आला आहे. परभणी, हिंगोली दौऱ्यावर असेलल्या परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या ताफ्याला रिक्षांमुळे काही काळ अडथळा निर्माण झाला होता. त्यांनी रावतेंनी थेट रिक्षांवर कारवाईचे आदेश दिले.


दिवाकर रावते 14 ऑगस्टला परभणी, हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी आधी परभणीत बस पोर्टच्या उद्घाटनासाठी आले असताना त्यांच्या ताफ्यासमोर अचानक प्रवासी रिक्षा आल्या. त्यावेळी त्यांनी त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र रावते परभणीहून हिंगोलीकडे जात असताना पुन्हा एक रिक्षा चालक जवळा बाजार येथे त्यांच्या ताफ्यासमोर आल्याने ताफा थांबला. त्यावेळी मात्र रावतेंना संताप अनावर झाला आणि त्यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतलं.


दिवाकर रावतेंनी थेट नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानंतर परिवहन अधिकाऱ्यांनी कारवाई करत शहरातील जवळपास 400 ते 500 रिक्षांवर कारवाई केली. कारवाई केलेल्या रिक्षा दोन दिवसांपासून याच ठिकाणी आहेत. अनेकांचा संसार या रिक्षांवर चालतात. त्यामुळे शहरातील सर्व रिक्षा चालक संघटनांनी येत्या सोमवारी शहरातील रिक्षा सेवा बंद ठेवून मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.


परभणीच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने ही कारवाई का आणि कशामुळे केली, याची माहिती मिळू शकली नाही. परिवहन अधिकारी रोहित काटकर हे मुंबईला गेले असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांनी सांगितले की, मंत्र्यांचे आदेश असल्याने कारवाई करावीच लागेल, असं कॅमेऱ्यासमोर न येता सांगितलं.