अकोला : एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, त्याचं लोकांमध्ये सहज मिसळणं, त्याचं 'लो प्रोफाईल' वागणं, खरंच  अशा गोष्टी आणि गुण एखाद्या मतदारसंघाची राजकीय समीकरणं ठरवत असेल का?. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात या सर्व प्रश्नांची उत्तरे 'होय' अशी आहेत. कारण, अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार गोवर्धन शर्मा यांच्या राजकीय यशाचं हेच रहस्य आहे. गेल्या पाच टर्म म्हणजेच सलग पंचवीस वर्षांपासून त्यांचा या मतदार संघावर 'एकछत्री' अंमल आहे.

2014 पर्यंत 'बकाल' शहर अशी ओळख असलेलं अकोला अलिकडच्या पाच वर्षांत काहीसं बदलतांना दिसतं आहे. मात्र, नागपुर, अमरावतीच्या तूलनेत अकोला विकासाच्या बाबतीत आजही माघारल्याचं शल्य अकोलेकरांना आहे. सध्या दिल्लीपासून अकोल्यातील महापालिकेच्या गल्लीपर्यंत भाजपाची 'शत प्रतिशत' सत्ता आहे. मात्र, आजही अकोला विकासासाठी चाचपडतांना दिसत आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात आमदार गोवर्धन शर्मांची ओळख 'लालाजी' अशी आहे. या निवडणुकीतील तिकिटाचं गणित, विरोधकांच्या आव्हानांना 'लालाजीं'ची 'कला' तोंड देऊ शकणार काय?, याची चर्चा अकोल्यातील राजकीय कट्ट्यांवर सुरू झाली आहे.

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा जिल्ह्याच्या मुख्यालयाचा मतदारसंघ पूर्णतः शहरी असलेल्या या मतदारसंघात 3 लाख 27 हजार 134 मतदार आहेत. गेल्या पंचवीस वर्षांत अनेक राजकीय लाटा आणि वादळं आलीत पण, या मतदारसंघावरील भाजपची मांड ना ढिली झाली ना खिळखिळी. तर प्रत्येक निवडणुकीत भाजपचे 'कमळ' येथे मोठ्या दिमाखात आणि ताकदीने उमलत गेलेय. याआधी या मतदारसंघाचे नेतृत्व माजी मंत्री नानासाहेब वैराळे, जमनालाल गोयनका, अझर हुसेन आणि अरुण दिवेकर यांच्यासारख्या दिग्गजांनी केलं आहे. भाजपच्या या मतदारसंघातील ताकदीचे मर्म लपलेय ते मजबूत पक्षसंघटन, कार्यकर्त्यांचे जाळे अन् या सर्वांना एका धाग्यात बांधणारे गोवर्धन शर्मा अर्थातच 'लालाजी' यांना.

2014 च्या विधानसभा निकालाची आकडेवारी

गोवर्धन शर्मा : भाजप : 66,934

विजय देशमुख : राष्ट्रवादी : 26,981

आसिफखान : भारिप-बमसं : 23,927

गुलाबराव गावंडे : शिवसेना : 10,572

उषा विरक : काँग्रेस : 9,164

मतदारसंघातील मतदारसंख्या (लोकसभा निवडणुक आकडेवारीनुसार)

  • एकूण मतदार : 3,27,134

  • पुरुष मतदार : 1,65,914

  • स्त्री मतदार : 1,61,206


 

1995 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसचा गड होता. मात्र, काँग्रेसच्या या गडाला अंतर्गत मतभेदांचा विळखा पडला अन् हा मतदारसंघ अलगदच भाजपच्या ताब्यात गेला. संपूर्णतः शहरी असलेला हा मतदारसंघ आहे. अकोला महापालिकेच्या 20 पैकी 15 प्रभागांचा या मतदारसंघात समावेश आहे. सध्या महापालिकेत भाजपाची स्वबळावर सत्ता आहे. महापालिकेत 80 पैकी 48 नगरसेवक भाजपाचे आहेत. तर अकोल्याचे भाजप खासदार संजय धोत्रे केंद्रात तीन मोठ्या खात्यांचे राज्यमंत्री आहेच. त्यामूळे अकोल्यात भाजपसाठी सर्वार्थाने 'फिलगुड'चं वातावरण आहे. लोकसभेत या मतदार संघातून भाजपला 15 हजारांची आघाडी मिळाली आहे. मात्र, लोकसभेत संजय धोत्रेंना सर्वात कमी आघाडी याच मतदार संघात मिळाली आहे. त्यामूळे भाजप विरोधकांनी या मतदारसंघावर आपलं लक्ष चांगलंच केंद्रीत केलं आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत प्रमुख उमेदवाराला मिळालेली मते

  • संजय धोत्रे : भाजप : 78,769

  • हिदायत पटेल : काँग्रेस : 63,638

  • प्रकाश आंबेडकर : वंचित बहूजन आघाडी : 23,741


 

अकोला भाजपात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांचे दोन गट आहे. मात्र, पक्षसंघटना, महापालिकेत धोत्रे गटाचा एकछत्री अंमल आहे. तर, डॉ. रणजीत पाटील गटाची शहरात अगदी मर्यादीत ताकद आहे. आमदार गोवर्धन शर्मा हे धोत्रे गटाचे आहेत. त्यामूळे धोत्रे-पाटील यांच्या पक्षांतर्गत कुरघोडीमूळे या मतदारसंघात भाजपात तिकिटासाठी मोठी चढाओढ होण्याची शक्यता आहे. आमदारकीची पाचवी 'टर्म' उपभोगणारे गोवर्धन शर्मा सहाव्यांदाही मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत. मात्र, त्यांना यावेळी पक्षातून मोठं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. भाजपमधून इतर दावेदारांमध्ये अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल यांचं नाव सर्वात समोर आहे. हिंदी भाषिक असणं आणि व्यापारी लॉबीशी जवळीक हे शर्मांचे 'मेरीट्स' त्यांच्याकडेही आहेत. याशिवाय भाजपचे जेष्ठ नगरसेवक हरिष आलिमचंदानी आणि प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे हेही पालकमंत्री गटाकडून  तिकिटासाठी इच्छूक आहेत. या चार नावांची चर्चा सध्या भाजप वर्तूळात उमेदवारीसाठी सुरु आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असतांना हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला होता. मात्र, 2014 निवडणुकीत आघाडी तुटली. या मतदारसंघात 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार विजय देशमुख दुसऱ्या क्रमांकावर होते. तर काँग्रेस उमेदवार उषा विरक यांची अमानत जप्त झाली होती. त्यामुळे या मतदार संघावर आघाडीतून राष्ट्रवादीने दावा केला आहे. राष्ट्रवादीकडून येथे गतवेळचे पराभूत उमेदवार विजय देशमुख, माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा आहे. मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला गेला तर वेळेवर इतर पक्षातील एखाद्या मातब्बरालाही उमेदवारी दिली जाऊ शकते.

मात्र, पारंपारिक मतदारसंघ असल्यानं काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत या मतदार संघावरचा दावा मागे घ्यायला तयार नाही. येथील काँग्रेसमधील इच्छुकांची यादीही खूप मोठी आहे. मात्र, येथील काँग्रेस ही गटातटांत विखुरली असल्याने प्रत्येकवेळी येथील हेच गट काँग्रेस उमेदवाराच्या पराभवाला हातभार लावत असतात. यावेळी माजी महापौर आणि प्रदेश सरचिटणीस मदन भरगड, माजी राज्यमंत्री अझर हुसेन यांचा मुलगा नगरसेवक डॉ. जीशान हुसेन, काँग्रेसचे महानगराध्यक्ष माजी आमदार बबनराव चौधरी, जेष्ठ नेते रमाकांत खेतान, महापालिका विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, राजेश भारती यांनी उमेदवारीवर प्रामुख्याने दावा केला आहे. काँग्रेसच्या इच्छुकांची संख्या येथे 20 पेक्षा जास्त असल्याने पुन्हा पाडापाडीचे राजकारण होणार का?, असा प्रश्न आहे.

अकोला शहरात वंचित बहूजन आघाडीची फारशी ताकद नाही. महापालिकेत या पक्षाचे फक्त तीन नगरसेवक विजयी झाले आहेत. मात्र, यावेळी एमआयएम सोबत असल्यानं वंचितला मुस्लिम मतांची साथ मिळण्याची आशा आहे. वंचित बहूजन आघाडीकडून महापालिका गटनेत्या ॲडव्होकेट धनश्री देव-अभ्यंकर, सिंधी समाजाचे नेते मनोहर पंजवाणी, सीमांत तायडे यांची नावं प्रामुख्याने शर्यतीत आहे. वंचित बहूजन आघाडी ऐनवेळी येथे एमआयएमला मैदानात उतरवण्याचीही शक्यता आहे. एखाद्या ताकदवान मुस्लिम नेत्याला एमआयएमच्या तिकिटावर उभं करण्याची खेळी प्रकाश आंबेडकर करू शकतात. महापालिकेत काँग्रेसच्या 13 नगरसेवकापैकी 11 मुस्लिम नगरसेवक आहे. त्यामूळे काँग्रेसच्या पारंपारिक मुस्लिम मतांवर डल्ला मारण्याची खेळी वंचित बहूजन आघाडी खेळू शकते. याशिवाय इतर पक्षांचं अकोला शहरातलं स्थान अतिशय नगण्य आहे.

पक्षनिहाय प्रमुख दावेदार :

भाजप : गोवर्धन शर्मा (विद्यमान आमदार), महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक हरिष आलिमचंदानी, डॉ. अशोक ओळंबे.

काँग्रेस : माजी महापौर मदन भरगड, महानगराध्यक्ष बबनराव चौधरी, नगरसेवक डॉ. जीशान हूसेन, मनपा विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, रमाकांत खेतान, राजेश भारती.

राष्ट्रवादी : विजय देशमुख, माजी महापौर रफिक सिद्दीकी.

वंचित बहूजन आघाडी : महापालिका गटनेत्या ॲडव्होकेट धनश्री देव-अभ्यंकर, सिंधी समाजाचे नेते मनोहर पंजवाणी.

जिल्हा मुख्यालयाचा मतदारसंघ असलेला अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ अद्याप  विकासापासून कोसो दूर आहे. नागपूरनंतर विदर्भातील मोठे शहर अशी अकोल्याची ओळख. बाजूच्या अमरावतीचा विकास झपाट्याने झाला पण अकोला मात्र जिथल्या तिथेच आहे. या शहरात सर्वात मोठ्या समस्यांमध्ये वाहतूक आणि अतिक्रमणाची समस्या मोठी आहे. अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्याने 'पार्किंग'ची समस्या निर्माण झाली आहे. शहरात मागच्या चार वर्षांत रस्त्यांचं जाळं बर्यापैकी वाढलंय. मात्र, त्याला दर्जा नसल्याचं चक्क जिल्हाधिकार्यांनी केलेल्या सोशल ऑडीटमध्ये समोर आलं आहे. शहराच्या वाहतूक समस्येवर अशोकवाटीका ते रेल्वे स्टेशनदरम्यानच्या उड्डाणपुलामूळे तोडगा निघू शकेल. मात्र, नुकतंच सुरू झालेलं हे काम लवकर पुर्ण होणं महत्वाचं आहे. डाबकीरोड रेल्वेपुलाचं काम पुर्णत्वास जात आहे. मात्र, न्यू तापडीयानगर उड्डाणपुलाचा प्रश्न अद्यापही 'जैसे थे' आहे.

याशिवाय औद्योगिक वसाहतीत अत्याधुनिक सुविधा नसल्याने अनेक उद्योग येथून स्थलांतर करतायेत. येथील विमानतळ विस्तारीकरणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने अनेक मोठे उद्योग येथे येण्याची प्रक्रिया थांबली आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय दयनीय असल्याने अनेक योजना आणि कर्मचाऱ्यांचे देयक प्रलंबित असतात. मोर्णा नदी, असदगड किल्ला या ऐतिहासिक आणि भौगोलिक वर्षांची दुरावस्था झाली आहे. याशिवाय नियमित पाणीपुरवठा होण्याची वाट अकोलेकर गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहे. त्यामुळे नव्या आमदारासमोर या सर्व समस्या सोडविण्याचे आवाहन असणार आहे.

मतदारसंघातील प्रमुख समस्या

  1. अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था.

  2. अतिक्रमन आणि पार्किंग.

  3. अस्वच्छता

  4. औद्योगिक वसाहतीचं बकालपण.

  5. विमानतळ विस्तारीकरणाचा प्रलंबित प्रश्न.

  6. मोर्णा नदी, असदगड किल्ल्याची दुरावस्था.


 

व्यक्तीच्या प्रतिमेवर तरणारा अकोला मतदारसंघ यावेळी आपली ओळख बदलेल काय? भाजपच्या या बालेकिल्ल्याला काँग्रेस धडक देणार काय? भाजपचे गोवर्धन शर्मा यावेळी 'डबल हॅट्ट्रिक' मारणार काय?, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणारी ही निवडणूक असणार आहे. मात्र, याशिवाय ही निवडणूक अकोला शहराच्या राजकीय आणि विकासात्मक भवितव्याचा शोध घेणारीही असणार आहे, हे मात्र नक्कीच.