लातूर : तिकीट वाटपानंतर भाजप-शिवसेना युतीला बंडाळीचं ग्रहण लागलं आहे. कारण राज्यात सर्वच ठिकाणी नाराजांनी बंड पुकारल्याचं पाहायला मिळत आहे. लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपने मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक भाजपमधूनच त्यांना मोठा विरोध होत आहे. लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील आणि औसामधील काही नेत्यांनी गेल्या तीन तासांपासून राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. अनेक तासांपासून निदर्शनं सुरु असल्याने महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल (1 ऑक्टोबर) 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना लातूरच्या औसा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. परंतु त्यांच्या उमेदवारीला शिवसेना आणि भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध दर्शवला आहे. "आम्हाला मुख्यमंत्र्यांचा पीए नको भूमिपुत्र द्या," अशी मागणी या नेत्यांची आहे.

शिवसेनेच्या दिनकर माने यांनी दोनवेळा औशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्यानंतर गेल्यावेळी काँग्रेसच्या बसवराज पाटील यांनी ही जागा खेचून आणली. यावेळी पुन्हा उमेदवारी मिळेल अशी शिवसेना नेत्यांची अपेक्षा होती, पण मुख्यमंत्र्यांनी अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही जागा शिवसेनेकडून सोडवून घेतली.

खरंतर संभाजी पाटील निलंगेकर आणि अभिमन्यू पवार यांच्यात सुप्त संघर्ष आहे. औसामधल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी अभिमन्यू पवार यांच्याविरोधात उभारलेल्या बंडाला संभाजी पाटील निलंगेकर यांची फूस असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एका अर्थाने संभाजी पाटील निलंगेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही आव्हान दिल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, मधल्या औसा मतदारसंघात भाजपच्या अभिमन्यू पवार यांना काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांचं आव्हान आहे.

कोण आहेत अभिमन्यू पवार?

  • अभिमन्यू पवार हे मूळचे लातूर जिल्ह्यातील, जन्म औसा तालुक्यातील उंबडग्यात

  • वडील प्राथमिक शिक्षक होते, तर आई गृहिणी

  • अभिमन्यू पवार यांचं प्राथमिक शिक्षण लातूरच्या केशवराज विद्यालयात झालं

  • त्यांनी दयानंद कॉलेजातून वाणिज्य शाखेतून पदवी घेतली

  • पुणे विद्यापीठातून त्यांनी लेबर लॉचं शिक्षण घेतलं

  • लहानपणापासून ते संघात सक्रीय होते, कॉलेज जीवनात अभाविपशी नाळ जुळली

  • त्यानंतर लातूर जिल्हा भाजपचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलं

  • 2014 ला महाराष्ट्र प्रभारी ओम माथूर यांचे स्वीय सचिव झाल्यावर ते राजकीय पायऱ्या वेगाने चढले

  • फडणवीस मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर ते त्यांची स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहू लागले


अल्पावधीत त्यांची आणि मुख्यमंत्री फडणवीसांची गट्टी जमली. गेल्या तीन वर्षात त्यांनी औसा तालुक्यात 110 कोटी रुपयांचा विकासनिधी आणला. पद्धतशीरपणे मतदारसंघात प्रतिमा तयार केली आणि मुख्यमंत्र्यांशी असलेल्या निकटच्या संबंधांमुळे शिवसेनेने आपला हक्काचा मतदारसंघही सोडला.

मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला सहजी विरोध करण्याचं धाडस भाजपात कुणी करत नाही. पण संभाजी निलंगेकरांच्या बंधूंनी आणि कार्यकर्त्यांनी ते करुन दाखवलं. लातूर जिल्ह्यात दुसरं सत्ताकेंद्र निर्माण होऊ नये यासाठीचा हा डावपेच आहे. त्यातही जर येणारा नेता मुख्यमंत्र्यांचा निकटवर्तीय असेल तर धोका अधिकच.