माहीमजवळ लोकलचं चाक रुळावरुन घसरलं; अंधेरी-सीएसएमटी, अंधेरी-पनवेल वाहतूक ठप्प
एबीपी माझा वेब टीम | 02 Oct 2019 01:32 PM (IST)
आज (2 ऑक्टोबर) सकाळी साडे अकरा वाजता हा प्रकार घडला. इंजिनपासून तिसऱ्या डब्याचं चाक रुळावरुन घसरलं. हा महिलांचा डबा आहे.

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. माहीम स्टेशनजवळ सीएसएमटी-वांद्रे लोकलचं चाक रुळावरुन घसरल्याने, अंधेरी-सीएसएमटी आणि अंधेरी-पनवेल मार्गावरील वाहतूक बंद आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत अप-डाऊन वाहतूक बंद राहणार आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. आज (2 ऑक्टोबर) सकाळी साडे अकरा वाजता हा प्रकार घडला. इंजिनपासून तिसऱ्या डब्याचं चाक रुळावरुन घसरलं. हा महिलांचा डबा आहे. डबाच रुळावरुन घसरल्याने मोठा आवाज झाला. यानंतर मोटरमनने तातडीने गाडी थांबवली. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. सध्या घसरलेला डबा रुळावर आणण्याचं काम सुरु आहे. दुरुस्तीसाठी आणखी दोन ते तीन लागू शकतात, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून बघ्यांची गर्दी हटवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. मात्र दोन तासांपासून वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.