प्रतिनिधी : पवार साहेब आहेत माझ्या बरोबर... महाराष्ट्राचे चार वेळचे मुख्यमंत्री.. ज्यांनी किल्लारीचे.. भूकंपांतरचे व्यवस्थापन केले.. जागतिक पातळीवर त्याचे खूप कौतुक झाले.. ज्याची प्रशासनावर खूप चांगली मांड आहे.. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.. जे महाराष्ट्राचे आणि देशाचे विकीपीडियाच आहेत.. असे असून सुद्धा .. महाराष्ट्रात कुठे काहीही झाले .. अगदी भूकंप सुद्धा झाला तर पवार साहेबांनीच घडवला अशी एक वदंता होती...
शरद पवार : हं .ह
प्रतिनिधी : हसलात तुम्ही सुद्धा .... तुम्हीच म्हणाला होतात एकदा ... लातूरला आला होतात .. काय झाले होते .. कोणाचा रेफरन्स होता तो ..
शरद पवार : गंमतीने बोललो असेल .. असो
प्रतिनिधी : मी आज तुमच्या दोन्हीही बघतोय..सोलापुरता तुमची जी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उस्फूर्तता आता उस्मानाबादेत.. मला वाटते मंत्री असताना ज्या पद्धतीची उस्फूर्तता लोकात जाणवायची नाही.. ती आता मला येथे दिसली.. विशेषतः तरुण मुले येथे खूप आहेत..
शरद पवार : सगळ्या महाराष्ट्रात बघतोय.. तरुण पिढीत परिवर्तनाच्या संबंधी भरपूर भावना आहे आणि ते राष्ट्रवादी करू शकेल या निष्कर्षाशी लोक यायला लागलेत. हे मला जाणवतंय आणि त्यामुळेमाझ्या कुठल्याही सभेला... माझ्या सहकाऱ्याच्या, जयंत पाटील असो.. अजित पवार असो.. आपले धनंजय मुंढे असो.. छगन भुजबळ असो.. या सगळ्यांच्या सभेला अशा प्रकारचा प्रतिसाद .. आणि मला अधिकचा प्रतिसाद .. आणि तो विशेषतः तरुण पिढीचा. हा ठिकठिकाणी दिसतो. मला आठवतंय १९८० साली .. आम्ही ज्यावेळी काँग्रेस एस बांधायला घेतली...उभी करायला... त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात फिरलो... पण सगळ्यात जास्त प्रतिसाद मला मराठवाड्यात मिळाला... आणि मराठवाड्यातील तरुण पिढी ... त्यावेळी जास्तीत जास्त आमच्या जागा निवडून आल्या. ६० ते ६२ मधील २८ ते ३० जागा ह्या मराठवाड्यातील होत्या. ह्या मर्यादित असलेल्या जागेतून ७० टक्के जागा निवडून येणे ही काय लहान गोष्ट नव्हती. पण त्याचे श्रेय सगळे तरुण पिढीला जाते. त्याच्यातून दुसरी गोष्ट अशी झाली की, तरुण पिढीतून नेतृत्व तयार झाले. आज मला ते सबंध चित्र दिसतंय महाराष्ट्रात. पण मराठवाड्यात अधिक दिसतंय आणि याचे परिणाम एक तर नवीन लीडरशिप तयार होईल, सामान्य कुटुंबातील तरुण पिढीची. आजच्या आणि त्यावेळचा फरक असा आहे. यावेळेला तरुण पिढी येथे जी दिसते आहे त्यात फार मोठी टक्केवारी ही शिक्षित आहे. म्हणजे ग्रॅज्युएट वगैरे अशा प्रकारची आहे आणि त्यामुळे गुणात्मक परिवर्तन करणारे नेतृत्व यातून तयार होत आहे, असे मला जाणवतंय. महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे
प्रतिनिधी : की मग अशी एक गोष्ट आहे की, तुमच्या पक्षातील.... जे पहिल्या फळीतील नेते आहेत... ते जेथे जेथे गेले... पक्षवाढीच्या दृष्टीने हे जे तरुण पोरं आहेत ह्यांना आता नेतृत्व करायचं आहे. त्यांना एका अर्थाने ब्लॉक करुनच ठेवले होते.
शरद पवार : थोडेसे मला हे कबूल केले पाहिजे. आम्ही सत्तेत जवळपास दहा ते पंधरा वर्ष होतो. पंधरा वर्ष सत्ते गेल्याच्यानंतर .. साहजिकच ... एक त्या सत्तेच्या माध्यमातून.. जी काही धोरणे असतील... कार्यक्रम असतील.. ती राबविण्याच्या दृष्टीने सगळे लक्ष केंद्रित असते. बाहेर नव्या पिढीमध्ये एक प्रकारचे अंतर निर्माण होत आहे, हे मला जाणवत होते. त्यानंतर निवडणुकीचे जे निकाल लागले त्याच्यातून ते स्पष्ट झाले. पण त्याचा एक फायदा असा झाला, आपण दुरुस्त होणासाठी काय केले पाहिजे हे आमच्या लक्षात आले.. मी काळ एका ठिकाणी बोललो .. माझा यापूर्वीचा अनुभव असा आहे .. सत्ते मध्ये असताना आपण अनेक निर्णय घेतो .. आणि त्या निर्णयाचे काय झाले ... लोकात त्याचा लाभ किती होतो वगैरे याचा आम्ही निष्कर्ष कसा काढतो ... कलेक्टर .. सी ओ .. खालच्या लोकांकडून जे रिपोर्ट येतात .. ते आमच्या पुढे ठेवतात ... त्याच्यातून आम्ही ठरवतो हे चांगले झाले .... बर झाले .. पण सत्ते मध्ये नसतो .. आणि माझी जुनी सवय आहे .. तर मी फिरतो फार ... त्या फिरण्यातून सत्तेत असताना मी घेतलेल्या निर्णयचा प्रत्यक्ष किती लाभ झालेला आहे ... लोकांना .. हे माझ्या बरोबर कोणी अधिकारी असत नाहीत .. कोणी माझा रिपोर्ट पाठवत नाही ... मला डायरेक्ट त्या माणसाकडनं कळते काय झाले त्याचे .. ती पहाण्याची संधी एक मोठ्या प्रमाणात मिळते ... त्यानंतर कधी लोकांनी अधिकार दिला ... त्यातून मेजर्स घ्यायला त्याची मदत होते ...
प्रतिनिधी : माझ्या सारख्या राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या पत्रकाराला नेहमी हा प्रश्न पडतो , अलीकडे तुम्ही जो महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिला होता .. तो विचार तुमच्या पक्षातील नेत्यात पोचलाच नाही .. कारण ते ज्या पद्धतीने सोडून गेलेत
शरद पवार : पुरोगामी विचार म्हणून गेले असे नाही ... एक गोष्ट मला कबूल केली पाहिजे .. सत्तेच्या चौकटीच्या बाहेर राहण्याचा आमचा जो जुना अनुभव होता ... म्हणजे मी जे सांगितले .. ७८ च्या नंतर ८३ .. ८४ काय महाराष्ट्रात ८६ नंतर आम्ही सत्तेत आलो ..
शरद पवार : औरंगाबादेला
शरद पवार : त्यावेळी आम्ही एकत्र आलो .. सत्तेत नंतर आलो .. हा सगळा मधला जो काळ गेला ... त्यावेळी आम्ही विरोधकांच्या भूमिकेत होतो .. त्या भूमिकेत समाधान होते .. आज त्या सगळ्यातून आमची जी मानसिक तयारी झाली .. जो एक अभ्यास झाला ... परिस्थितीला सामोरे जाण्याचे तयारी .. एक लीडरशिप डेव्हलप झाली .. आम्ही सत्तेच्या चौकटीच्या बाहेर असलेले हाताशी धरून आम्ही लीडरशिप बिल्टप केली .. त्यामुळे त्याची कुठे आम्हाला अडचण नाही आली ... पण ... ज्यावेळेला ते सगळे आमचे सहकारी नंतरच्या काळातील पंधरा वर्षाच्या सत्तेत गेले .. आम्हा लोकांचे सरकार होत .. मला नेहमी ऐकायला मिळायचं की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांचे मंत्री होते ... मंत्रिमंडळ ज्यावेळी झाले सुरुवातीला.. त्यावेळी लोकांच्या कडून ऐकायला मिळायचे की राष्ट्रवादीचे मंत्री चांगले काम करतात .. ते कामात सगळ्यात अग्रभागी आहेत .. हे घडलं पहिल्यांदा पाच वर्षात .. त्याचा आम्हला लाभ ही झाला .. २००९ च्या निवडणुकीत आम्हाला आणखीन यश मिळाले ..
प्रतिनिधी : मग चुकलं कुठे .. ?
शरद पवार : त्यानंतरच्या काळात आम्ही सत्तेवरच होतो .. २०१४ पर्यंत .. ह्या सगळ्या सत्तेच्या काळात .. सत्तेची जबाबदारी असलेली घटक होते .. ते पाच - पाच.. दहा - दहा .. वर्ष सत्तेत राहिल्याच्या नंतर सामान्य लोकांच्या दैनंदिन जीवनापासून थोडे आम्ही दूर गेलो ... त्याची किंमत आम्हाला द्यावी लागली ...
प्रतिनिधी : हे तुम्ही केलेलं मूल्यमापन आहे ... एका जाणत्या नेत्यांनी... कारण तुम्ही लोकात राहता म्हणून हे तुमचे मूल्यमापन आहे .. पण माझ्या सारख्या अभ्यासकाला असे वाटते की, जे गेले ते सत्तेशिवाय राहूच शकत नाहीत ...
शरद पवार : ते ही थोडे कारण आहे काही लोकांचे .. ज्या लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही .. हे शक्य नाही असे लोक आधी गेले ... त्याची संख्या अधिक असेल हे मी मान्य करतो ... कस असते खूप वेळेला ... आपल्याला ठाऊक असते ..सत्ते मध्ये .. काही लोकांचा सत्तेत सुद्धा उपयोग होतो ... कामाच्यासाठी .. प्रशासनासाठी ...
प्रतिनिधी : एखादे असे उदाहरण सांगू शकाल ...
शरद पवार : एखादे मला .. आठवते .. अरुण गुजराथी ... यांना आम्ही त्यावेळी घेतले ... मला आठवत नाही ते फायनांस मिनिस्टर होते .. ही अशी महत्वाची कामे ज्यांना दिली .. कारण माझा विश्वास होता ... की .. ते चार्टर्ड अकाउंटंट होते .. त्यांना इकॉनामि .. अर्थशात्र व्यवस्थित समजत होते .. त्यांचा लौकिक चांगला होता .. स्वच्छ लोक होते ... अशी लोक आम्ही घेतले होते ..
प्रतिनिधी : तुम्ही म्हणता सत्तेशिवाय हा मुद्दा होता पण काही मंडळी अशी म्हणतात, सरकारने आम्हाला खूप प्रेशर केले .. सुदैवाने मी काही जणांचे इंटरव्यूव्ह केला
शरद पवार : मला काही लोकांनी पत्र दाखवली .. त्याच्या सहकारी संस्थेची विक्री करण्याचे संबंधीचे आर्डर काढलेली आहे .. त्याच्या कॉपी मला काही लोकांनी दाखवल्या आणि त्यामुळे सत्तेचा गैरवापर करुन विविध कारणाने नमवायची भूमिका यापूर्वी कधी महाराष्ट्रात घेतली नव्हती... ती आता घेतली... पण त्यात ही दोन भाग आहेत... काही लोकांच्या बाबतीत हे केले पण ते घाबरले नाहीत.. त्यांना काही चिंता नव्हती.. ज्यांना चिंता होती.. ते अवस्थ झाले..
प्रतिनिधी : हा जो बॅलन्स .. थोडा इकडून तिकडे .. उजव्या विचारसरणीकडे गेलाय... ज्या यशवंतरावचे .. तुम्ही तर शाहू फुले आंबडेकर विचाराचे आहात.. आताची करंट राजकीय परस्थिती बघता ... ह्या पुरोगामी विचाराचे काय होणार महाराष्ट्रात ...
शरद पवार : मला आज शाहू फुले आंबेडकरांचे विचार .. ह्या महाराष्ट्रात कोणी विसरू शकत नाहीत ... तो जतन करणारा फार मोठा वर्ग आहे... सीनियर जनरेशन आहे. नव्या पिढीत तो प्रस्तुत करण्यासंबंधीची काळजीही ते घेतात आणि अनेक ठिकाणी नव्या पिढीत हा विचार हळूहळू तयार होत आहे. हे दिसतंय. अभ्यास करतात.. चांगले बोलतात.. चर्चा करतात.. टीका टिप्पणी आम्हा लोकांवर ही करतात .. आणि मला त्याचा आनंद आहे .. ह्या विचारांची जर पिढी तयार होत असेल तर त्यांना प्रोत्साहितच केले पाहिजे ... आणि मला महाराष्ट्रात त्याची चिंता वाटत नाही... ह्या राज्यात प्रतिगामी विचार डायजेस्ट होणार नाही ... म्हणजे आता भाजपचं राज्य आहे .. भाजपाच्या राज्यात प्रतिगामी विचार असताना सुद्धा आवडो न आवडो ह्या राज्यकर्त्यांना सुद्धा काही निर्णय घ्यावे लागतात.. जे प्रागतिक विचाराशी सुसंगत आहेत... त्याचे कारण आहे लोकांचा रेटा..
प्रतिनिधी : पण ते सत्तेवरती आहेत. निवडणूक येत आहेत.
शरद पवार : निवडून येतात... ते काय नेहमीच येत नाहीत निवडून .. काही त्याचे परिणामही होत आहेत आपण पाहिले आहे ... पण समजा, भाजपा वाजपेयी साहेबाच्या काळात .. १९९८ ते २००४ च्या काळात .. त्याच्या सारखा अत्यंत लोकप्रिय नेता असताना सुद्धा .. सरकार राहिले नाही .. पाच वर्षात लोकांनी बदल केले .. आज त्याच्यात आणि यांच्यात गुणात्मक फरक एवढा आहे .. वाजपेयींची काम करण्याची आणि निवडणुकीला सामोरे जाण्याची पध्द्त वेगळी होती आणि आजच्या राजकारण्यांची वेगळी आहे ... वाजपेयी हे स्वतःची भूमिका मांडण्याच्या कौशल्याने ते लोकांना जिंकत होते. त्यांनी सत्तेचा गैरवापर.. त्यामधून अर्थकारण मोठ्याप्रमाणावर केंद्रीत करुन निवडणुका या गोष्टीत आता आपल्याला बघावयास मिळतात. त्या वाजपेयींच्या काळात नव्हत्या. आता ह्या गोष्टी बघायला मिळतात. दुसऱ्या बाजूला विरोधक आहेत. विरोधकांना विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यासाठी काही किमान गोष्टी लागतात त्याची सुद्धा उपलब्धतता होत नाही. किंवा होऊन दिली जात नाही.
प्रतिनिधी : साधन उपलब्ध करुन दिली जात नाहीत.. मध्यंतरी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या घरावर धाडी पडल्या...
शरद पवार : उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला की.. किंवा कोणी साह्य केले.. की साह्य करणाऱ्यावर लक्ष केंद्रित करण्यात येते. आम्हाला लोकांना काम करायला. कसं आहे एवढ्या मोठ्या राज्यात प्रवास आणि पैसे काय आम्हाला वाटायला लागत नाहीत. पण कमीत कमी कम्युनिकेशन. काही पब्लिकेशन..या गोष्टी साठी जी काही साधन सामुग्री लागते.. त्यांनाही मर्यादा यायला लागतात.
प्रतिनिधी : पवार साहेब तुम्ही, छत्रपतींच्या राज्यात आपण आहोत... तुम्ही, छत्रपतींच्या वारसदारांना तुम्ही खूप समजावून सांगितले असा सेन्स बाहेर गेला... का गेले असावेत?
शरद पवार : माहित नाही ... माझ्याशी त्यांनी जी चर्चा केली त्यात मी समजावून सांगायचा काही विषय नव्हता. आमच्यात विषय हा होता की महाराष्ट्रात आक्रमकरित्याने काम करण्याची आवश्यकता आहे आणि त्याच्यामध्ये सातारा जिल्हा जो आहे. त्याच्यातील जबाबदारी त्यांनी घ्यावी आणि साताऱ्याची नुसती जबाबदारी घेऊन चालणार नाही. महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात वगैरे तरुणाची मागणी असायची त्यांना पाठवा. त्यांनी इतर जिल्ह्यात जावे. या संबंधीची आमची चर्चा झाली. त्यांनी त्याबाबतची तयारी ही ठेवली. साताऱ्यात काय काम करायाचे पक्षाचे आणि महाराष्ट्रात काय करायचे. ही नवी पीढी नेतृत्वासाठी उभी करण्यासाठी त्यांनी काही जबाबदारी घ्यावी ही अपेक्षा होती. त्यासाठी त्यांनी अतिशय आनंदाने सहभागी होण्याची भूमिका सांगितली. सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत आखणी झाली. माझ्या घरी आणि दुपारी तीन वाजता मी दुसरा निकाल ऐकला.
प्रतिनिधी : तुमच्या सारख्या पॉलिटिशयनला काय वाटते... त्यांनी का जावे.. बाकी सगळ्यांना काही कारणे होती.. त्यांनी का जावे... मी ही ट्रेस करणार आहे... छत्रपतींचे वंशज या अर्थाने ते प्रोजेक्शन आहे भाजपाचे.
शरद पवार : माहिती नाही ... त्याच्यात ... त्यांनी जे आता सांगितले .. यापूर्वीच्या काळात माझी कामे होत नव्हती.. मला स्वतः ला जी माहिती आहे..डेव्हलपमेंट.. लोकांच्या विकासाच्या कामाच्या बाबतीत कुठे कोणी त्यांना अडवले असे मला जाणवत नाही.. अन्य व्यक्तिगत... ते म्हणतात व्यक्तिगत कामे काही अडली नव्हती... मी त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही... कारण ते फारच चमत्कारिक निघेल.. सगळे बाहेर आले तर.
प्रतिनिधी : पण ती ही वेळ नाही का पवारसाहेब ...
शरद पवार : पण काही मर्यादा .. पाळणे ही समंजस आणि सुसंस्कृत माणसाची जबाबदारी असते. ती आम्ही यशवंतराव चव्हाणांकडून शिकलो. त्यामुळे एका चौकटीच्या बाहेर आम्ही जात नाहीत..
प्रतिनिधी : मी त्याच्या बऱ्याच प्रेस कॉन्फरन्स बघितल्यात की त्यांनी टाळले आहे.. जे पक्ष सोडून गेले त्याच्या संदर्भात बोलण्याचे.. हा सुसंस्कृतपणा जपण्याचा प्रयत्न केला मात्र पुन्हा हा प्रश्न पडतो माझ्या सारख्या अभ्यासकाला... पवार साहेबांनी या मंडळीला काय नाही दिले ... पिचडांचा विषय घ्या.. पद्मसिंह पाटलांचा विषय घ्या ..
शरद पवार : ठीक आहे ना..आपली जबाबदारी आहे ही नेतृत्वाची...लीडरशिप तयार करणे... त्याच्यामार्फत महाराष्ट्रात दैनंदिन जीवनात काही सुधार होईल ही काळजी घेणे. त्याच्यासाठी संच तयार करणे.. त्याच्यात माझे पहिल्यापासून लक्ष आहे. मी ज्यावेळापासून कार्यकर्ता, आमदार होतो ते म्हणत नाही.. राज्यमंत्री...मंत्री होतो ते म्हणत नाही... राज्याची जबाबदारी माझ्यावर आली... पक्षाची जबाबदारी माझ्यावर आली. एक पंचवीस वर्षाचा-तीस वर्षांचा आढावा घेतला. एक लीडरशिप तयार करण्यासाठी मी सात्यत्याने लक्ष दिले. ती लीडरशिप अनेक वर्ष टिकली. पण पुढे पुढे असं कधी होतं...जे मघाशी तुम्ही सांगितले. सत्तेच्या चौकटीच्या बाहेर राहणारे ज्यावेळी अशक्य व्हायला लागते त्यावेळी असे निकाल होता.
प्रतिनिधी : पण तुम्हीच एक रिंगण आखले होते. ह्या रिंगणातील हे सर्व खेळाडू होते. वीस-वीस वर्ष पक्षाला होत असतानाच हे सर्व सोडून गेले. एक मॉडेल की तुम्ही म्हणाल ज्याच्यावर विश्वास दाखवला. मी म्हणणे की जे रिंगण तुम्ही आखलं होत त्याच्या बाहेर तुम्ही बघायला हवे होते.
शरद पवार : समाजकारणात काम करत असताना तुम्हाला टीम उभी करावी लागत असते, टीम डेव्हलप करावी लागते, तयार करावी लागते. या टीममध्ये ज्यावेळेला तराजू घेऊन आम्ही बसतो...देशात अ ब क एक तागड्यात...त्यांच्या जमेच्या बाजू किती आहेत...त्यांच्या मायनसच्या किती आहेत. त्याचे मोजमाप केलं जातं आणि जमेच्या बाजू पाहिल्या जातात. प्रत्येकाचा काही ना काही मायनस पॉईंट असतो .... मायनस पॉईंटपेक्षा प्लस पॉईंट अधिक असेल तर आम्ही त्यांना संधी देत असतो... जो मायनस पॉईंट आहे तो घालवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो.... काळजी घेत असतो..... याच्यातून नेतृत्व तयार होत असतं आणि त्या पद्धतीने लीडरशिप महाराष्ट्रात अनेक लोकांची तयार केली. आज तुम्ही गेल्या दहा-पंधरा वर्षात शंकरराव चव्हाण यांच्या आणि शिवाजीराव निलंगेकर यांच्यानंतर या विभागात....म्हणजे उदाहरण सांगतो अनेक लोक तयार झाले. प्रत्येकाला तयार करण्यात माझा काही ना काही हातभार होता. तो इथेच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील...कोकणातील.... मला एक हौस आहे नेतृत्व तयार करण्याची... शेवटी लोकशाहीमध्ये संच असून त्याच्यामार्फत काम करण्याची अधिक उपयुक्त असते. सत्ताही केंद्रीत कधी होता कामा नये. विकेंद्रीत व्हायला पाहिजे. विकेंद्रीत सत्ता अधिक लोकांच्या हातात गेली तर त्याच्यातून केंद्रीय सत्तेचे दोष दूर होतात. यात दोष असतात असं नाही मात्र कमी असतात, तो माझा प्रयत्न आहे...नेहमीचा.
प्रतिनिधी : राजकीय विचारवंत नेहमी असं का म्हणतात तुमच्या बाबतीतील एखादे मत मांडताना पवार साहेबांनी मराठा जातीचे नेतृत्व आणि विशेषतः आपल्या नात्यागोत्यातील नेतृत्व उभे केलं.... तुम्ही चिडला त्या मुद्द्यावर
शरद पवार : त्याच्यावर मी नाही चिडलो.... हे दुसर्या कारणाचा विचार होता....मराठा समाज असा विचार नाही....पक्षाच्या वतीने आम्ही लीडरशिप केली... सत्तेच्या बाहेर गेलो मी... मुख्यमंत्रीपदावरून गेलो...मला अधिकार होता.... एकमताने पक्षाने मला ठराव करुन दिला... तुम्ही नेता निवडा.... सुधाकर नाईक यांची निवड केली.... मी काय मराठा असा विचार केला नाही त्यावेळी.... आता अलीकडच्या काळामध्ये मला महाराष्ट्राच्या नेतृत्वाची निवड करण्याचा अधिकार होता....आम्ही छगन भुजबळ यांना नेता केलं... पहिल्यांदा...विरोधी पक्षनेते झाले. नंतरच्या काळात तुम्ही आमची मालिका बघा. म्हणजे मुंडे त्याठिकाणी आहेत. अशी किती तरी लोक सांगू शकतो मी... पक्षामार्फत नेतृत्व तयार करण्याचं काम केलं आम्ही. अनेकांना संधी दिली....मधुकर पिचड काय... छगन भुजबळ काय... धनंजय मुंडे काय... संबंध मालिका काय सांगते....नेतृत्व करणारी पीढी ही काय मराठा समाजातील नव्हती .... त्यामुळे कोणी माझ्यावर टीका करत असतील ..... करतात ... ते मला ही माहिती आहे.... माझं मन मला सांगतं मी काय केलं आहे. त्यामुळे मला जातीपातीचे राजकारण करायचं काही कारणच पडत नाही. माझा अनुभव असा आहे की आम्ही सगळे जण जे शाहू-फुले म्हणतो...त्या विचारने चालत गेले की तुमचा पाठिंब्याचा बेस हा अधिक व्यापक होतो. राजकरणात याचा बेस हा व्यापकच केला पाहिजे त्या रस्त्याने आम्ही जात असतो.
प्रतिनिधी : हे तुम्ही मला सांगितलं पवारसाहेब .... हे मला मान्य.... 98 ला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली.. सगळी लीडरशिप जर बघितली.... सगळ्या जाती धर्मातील.... रामदास आठवले यांना पॉलिटिकली ग्रूम केलं ते शरद पवारांनी...तरीसुद्धा तुमची काही वक्तव्य... काही वेळेला...वादग्रस्त बनली... जसं तुम्ही छत्रपतींचा रेफरन्स दिला पेशव्यांसंदर्भात... मघाशी तुम्ही बोलताना म्हणालात... फडणवीस जो हिशोब मांडत आहेत अशी मंडळी आमच्याकडे होती.... तुम्ही हे कशा कॉन्टेक्स्टमध्ये बघाल.
शरद पवार : अशी मंडळी म्हणजे...
प्रतिनिधी : तुम्ही आता म्हणालात.. फडणवीस साहेब जो हिशोब देतायत.. तो हिशोब ते ज्या पद्धतीने मांडतायत हे एका लेखनिकाची काम आहे.. अशा अर्थाने तुमचे ते मत आहे असे मला वाटते..
शरद पवार : ते खरंच आहे.. माझे प्रामाणिक ते मत आहे... ते आता सगळीकडे जाऊन जे सांगतायत ही वस्तुस्थिती आहे. याच्यात काही खरं नाही...म्हणजे आज मला ज्या वेळेला... तुमच्या स्टॅटिस्टिकली डिपार्टमेंटकडून नोट येते. त्यांची नोट किती वास्तव आहे...म्हणजे शंका आमच्या मनात खूप आहेत... तशाच पद्धतीच्या गोष्टी यांच्याकडून मांडल्या जातात... त्यात काही जात-पात-धर्म असा विचार नव्हतं.
प्रतिनिधी : पण हे एका मुख्यमंत्र्याच काम नाही असा तुम्हाला मेसेज द्यायचा आहे का? लेखनिकाची काम नाही तुमचे.
शरद पवार : लेखनिकाचा असं नाही... पण या पद्धतीने नाही... हे सांगताना त्यांनी योग्य लेखनिकाकडून आकडेवारी घेऊन.... ती तपासली पाहिजे... जे होताना दिसत नाही, असं मला वाटतं.. ती फक्त लोकांसमोर फेकली जात आहे.
प्रतिनिधी : मग तुम्ही जो पेशवांच्या रेफरन्स सांगितला... संभाजी राजे संदर्भातील.. किंवा पुणेरी पगडी संदर्भातील काही चर्चा...
शरद पवार : हो मी बोललो .. कॉन्शियसली बोललो. त्यात चुकीचे मी बोललो नाही कारण त्यावेळी फुल्याची पगडी ही त्याठिकाणी देण्यासंबंधीचा माझा आग्रह होता.. आम्ही फुल्यांच्या विचाराला स्वीकार केलेलं आहे. पुणेरी पगडी महाराष्ट्रात पुणेच्या बाहेर फारशी लोकप्रिय आहे असे मला वाटले नाही. मराठवाड्यात... विदर्भात पुणेरी पगडी मी कधी पाहिली नाही. मी पुण्यात वाढलो आहे. आमच्या पुण्यात..आम्हाला अभिमान आहे... फुल्यांची पगडी ही सुद्धा पुण्यातच आली. महात्मा जोतिबा फुले यांचा जन्मच पुण्यातला.. कार्यक्षेत्र त्यांचेच होतं.
प्रतिनिधी : काही जण म्हणतात पुणेरी पगडी त्याची अस्मिता आहे.. खास करुन पुण्याच्या मर्यादेत...
शरद पवार : त्याच्यावरच कॉमेंट केली तर ती कशी जातीवाचक होते ...
प्रतिनिधी : म्हणजे पवार स्पेसिफिक बघितले जाते ... पवार बोलले की.... पवारसाहेब महाराष्ट्रातील सगळे राजेरजवाडे महाराज भाजपात गेले.
शरद पवार : एका दृष्टीने ते चांगले झाले ... मला आठवते कि केंद्रात सुद्धा .. विशेषतः राजस्थानात सगळे राजे जनसंघात गेले होते ... सगळे उत्तरेकडचे राजे ... आणि तो जनसंघ नंतर टिकला नाही ... त्यानंतर फार उशिरा बाजपेयी सारखा नेता .. एक हुशार सर्वाना सामावून घेणारा नेता आला त्यामुळे त्यांना सत्ता मिळाली ... नाय तर हे सगळे राजेरजवाडे निवडणुका जिंकत होते .. पण निवडणुका जिंकून राज्य हातात आले नाही .. निवडून आल्यावर लोकांच्या दैनंदिन कामात काही या लोकांकडून झाले हि नाही .. असे दिसत नाही .. आणि आज सगळे राजे एकत्र येत असतील तर आनंद आहे ... याचा लाभ राजकीयदृष्ठ्या काही काळ होईल ... ज्यांनी यात पुढाकार घेतला ...
प्रतिनिधी : मुख्यमंत्री त्याचे खूप ...
शरद पवार : गोष्ट अशी माझ्यात पक्षातले लोक तिकडे गेले... सामान्य माणसाच्या विचाराची निगडित त्यांनी राहावं ही आमची अपेक्षा होती... आम्ही तो अपेक्षाभंग कधी होऊ दिला नाही... कालचे मुख्यमंत्र्याचे भाषण... आदेश द्यावा... आम्ही काम करु.... वगैरे वगैरे.... चांगली गोष्ट आहे.... एका वेगळ्या रस्त्याला नेऊ पहातायत... त्याचे परिणाम काय होतील ते आज ना उद्या आपल्याला पाहायला मिळतील.
प्रतिनिधी : मी थोडं स्पेसिफिक बोलू... आज लोकसत्ता मध्ये मुख्यमंत्र्यांना कानपिचक्या देणारा अत्यंत सुंदर असा अग्रलेख आहे की... हे राज्य कोणाचे आहे? आदेश कुणाचा घेताय? असं तुम्हाला इंडिकेट करायचंय.
शरद पवार : मी तो अग्रलेखही वाचला नाही... लोकसत्ता मला आज वाचायला मिळाला नाही... असं असेल तर त्यात काही गैर लिहिलंय असं मला वाटत नाही... गिरीश कुबेर यांनी लिहिले असेल.
प्रतिनिधी : त्यांनी मुख्यमंत्र्यांनी राजेंचा आदेश घेऊन राज्यकारभार करावा विशेषतः ज्या राजांच्या विरोधात असंख्य गुन्हे दाखल आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अपवित्र होते...आज मात्र ते सगळे पवित्र झाले हा सगळा रेफरन्स आहे... ही कमाल आहे ना....की तुमच्या पक्षात असताना सगळे अपवित्र होते...भाजपमध्ये जाऊन सगळे पवित्र झाले..
शरद पवार : मध्ये मी एका ठिकाणी वाचले ...लोकांना क्लीन करण्याची फॅक्टरी आमच्याकडे नाही...
प्रतिनिधी : मी तुमच्या अर्ध्या वयाचा आहे... तरी मी बघतो की तुम्ही ज्या पद्धतीने फिरत आहात.... लोकांमध्ये वावरत आहेत... कधी कधी त्रागा येतो का ही सगळी मंडळी कालपर्यंत आपल्याकडे होती.
शरद पवार : अजिबात त्रागा येत नाही....हे मी एन्जॉय करतोय...मी घरात राहिलो की अवस्थ होतो.... आणि त्रास होतो. मात्र लोकात राहिलो की मी एन्जॉय करतो. समाधान मिळते... आजच बघा सकाळी मी नाशिकमध्ये होतो. आतासारखी तिथं लोकांचा उत्साह होता. भेटणाऱ्यांची गर्दी....आज इथे सुद्धा आपण बघितलं... या सगळ्या मेळाव्यात लोक विश्वास देतात एक आपल्याला... मला यांच्यात अतिशय समाधान मिळते... आता ठीक आहे निवडणुका आल्यात... नसल्या तरीही मी फिरतो... गावागावात जातो... लोकांशी बोलतो... त्यांच्याशी बोलतो... प्रश्न समजून घेतो
प्रतिनिधी : त्रागा आणि हतबलता हे दोन वेगवेगळे शब्द आहेत... त्रागा होत नाही पण कधी हतबल वाटत नाही का?
शरद पवार : अजिबात वाटत नाही... मला तसे अजिबात वाटत नाही... अपयश आले तरी मला त्याचे काही वाटत नाही...
प्रतिनिधी : आता तुमच्या पक्षात जे चाललंय ते पहावून...
शरद पवार : मी हसतो... हे सर्व पाहून... ह्याच्या अॅक्शनला पाहिल्यानंतर... मला माहित आहे यापूर्वी ते माझ्याबरोबरच्या चर्चेत काय मांडत होते... ज्याच्याकडे गेले त्याच्याबाबत
प्रतिनिधी : हे ज्यावेळी तुम्हाला भेटायला येतात पक्ष सोडण्याच्या आधी तुम्ही सांगितले ही आहे काही ठिकाणी.. काय सांगतायत हे तुम्हाला... का ह्यांच्या सगळ्यांच्या हृदयात पवार आहेत.
शरद पवार : काही जण येत नाहीत.. काही लोक येतात ते सांगतात.. किंवा नंतर भेटतात त्यावेळी सांगतात असं झालं.. तसं झालं... वगैरे वगैरे... खासगीत सांगतात की तुमच्यावर आमची फार श्रद्धा आहे.
प्रतिनिधी : यातील काही मंडळी अशी आर्ग्युमेण्ट करतायत कि शरद पवारांनी पुलोदचा प्रयोग केला होता. तो काय होता... तुम्ही ज्यावेळी पुलोदचा प्रयोग केला होता त्यावेळी तुम्ही पक्ष फोडला नव्हता का असे ते म्हणतायत.
शरद पवार : त्यावेळी पक्ष फोडला नाही....आम्ही वेगळे होतो... काँग्रेसमध्ये विभागणी झाली होती... इंदिरा गांधींनी मूळ काँग्रेस जी निजलिंगाप्पाच्या नेतृत्त्वातील काँग्रेस होती तिला छेद दिला होता. इंदिरा काँग्रेसही त्यांनी स्थापन केली. लोक विसरतात... पुढे लोकांनी खऱ्या अर्थानी ती काँग्रेस मान्य केली ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी काँग्रेस फोडली. लोक त्याच्या बाजूने गेले हे मला मान्य करावे लागेल. आम्ही जे राहिलो. आमच्या सगळ्यांमध्ये एक भावना.. एक नाराजी इंदिरा काँग्रेसबद्दलची होती. इंदिरा गांधींच्या भूमिकेबद्दलची होती. म्हणून आम्ही सगळे सिंडिकेट आणि इंडिकेट अशी विभागणी झाले. सिंडिकेट म्हणजे काँग्रेसमधील प्रतिगामी शक्ती आणि पुरोगामी शक्ती अशी त्याची मांडणी झाली होती. ज्यांना ही मांडणी पसंत नव्हती ते काँग्रेस एसमध्ये राहिले. यात एस का आलं तर सुवर्णसिंह. पहिल्यांदा आर होतं. काँग्रेस फोडण्यासंदर्भातील नाराजी आम्हाजवळ व्यक्त होत होती. मी ज्युनियर होतो. त्या सगळ्या काळानंतर हळूहळू इंदिरा गांधींच्या विचारला समर्थन करण्याची भूमिका घेतली जाऊ लागली. त्याला आम्ही विरोध केला. त्यावेळी कसं झालं सरकार एक झालं. आम्ही काँग्रेस एसवाले काँग्रेस आयमध्ये तिरपुडे. वसंतराव दादा ह्या दोघांचे सरकार आल्यानंतर काँग्रेस आय तिरपुडे रामराव आदिक यांच्या नेतृत्वाखाली जे माणसे होती त्याचा जाहीरपणाने हा दृष्टीकोन होता की हळूहळू आम्हाला संपावायचे होते. तिरपुडे यांनी जाहीर हे सांगितले होते. मला हे सरकारच नको... ते सरकार चालू देत नव्हते.. इंदिरा गांधींच्या सांगण्यावरुन त्यांना बरोबर घ्यावे लागले होते... पदोपदी दादाचा अपमान करत होते. ते आम्हाला पसंत पडत नव्हते. तोंड दाबून बुक्क्याचा मार किती सहन करायचा. म्हणून एक दिवशी आम्ही हा निर्णय घेतला. हा निर्णय घेण्यात यशवंतराव चव्हाण काय रोल होता हे मी सांगत नाही.
प्रतिनिधी : थांबा पवार साहेब... माझा जन्म आहे ७७ चा ...तुमचा प्रयोग आहे ७८ चा. माझ्यासारखा अभ्यासक फक्त वाचून समजून घेतो. पुलोदचा प्रयोग आहे. अनवॉण्टेड एक मराठीतील वाक्यप्रयोग तुमच्याशी जोडला गेला आहे. तुम्ही आता जे सांगतायत ते खूप वेगळे आहे. ह्या सगळ्याला यशवंतरावांचा पाठिंबा होता.
शरद पवार : माझे म्हणणे असे आहे तुम्ही एक काम करा. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये गोविंदराव तळवलकर यांनी लेख लिहले होते. आम्ही निर्णय घेण्याच्या आधी पंधरा दिवस. काही अग्रलेखही होते. त्याचे टायटल होते. हे राज्य जावे ही श्रीची इच्छा... तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही... महाराष्ट्रात एक काळ असा होता कि गोविंदरावांनी 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये काही लिहिले तर ते यशवंतरावचे मत होते असा महाराष्ट्रात समज होता
प्रतिनिधी : हा तुम्ही समज करुन घेतला की प्रत्यक्ष साहेबाचा तसा विचार होता...
शरद पवार : त्याची विचारधारा अनेक वेळा गोविंदरावच्या लेखणीत स्पष्ट होत होती... ही वस्तुस्थिती होती. आणि ही श्रीची इच्छा हा लेख त्यांनी लिहिला. त्याच्या आधी दहा दिवस एक सविस्तर बैठक पार पडली होती. एक दिवशी आम्ही सर्वजण एकत्र असताना. म्हणजे चव्हाण साहेब अत्यंत नाराजीने त्यांनी हे सर्व आता बसा झाले असे म्हणाले. मीच नाहीतर यशवन्तरावच्या अत्यंत जवळचे सातारा जिल्ह्यातील अनेक नेते... हे लोक त्यावेळेला ह्या भूमिकेशी सुसंगत होते.
प्रतिनिधी : तुम्ही ज्यावेळी हे वाचता की शरद पवार यांनी वसंतदादाच्या पाठीत खंजीर खुपसला.. काय असते तुमची मन:स्थिती?
शरद पवार : हे मला माहीत आहे की काय होती वस्तुस्थिती. मी हे सगळे एन्जॉय करतो.
प्रतिनिधी : लोक माझा सांगती ह्यात हि तुम्ही यावर काही लिहले नाही जास्त ...
शरद पवार : मला वाटत मी लिहले आहे... दादाबद्दल मनात फार आदर होता. तिरपुडे आणि दादा यांच्यात कटुता वाढायला लागली, यांच्या वेगळ्या बैठका होत असत. दादा मुख्यमंत्री होते. एक दिवस दादांनी सांगितले जाऊ द्या सोडून द्या. या निष्कर्षाशी स्वतः दादा आले होते. आम्ही निर्णय घेतला त्यावेळी ते अतिशय रागावले. नंतर कटुता निर्माण झाली. तुम्ही बारकाईने बघितले तर दादा राज्यपाल म्हणून राजस्थानला गेले. बरीच वर्ष गेली. त्यानंतर दादांनी परत आल्यावर आम्ही सगळे एकत्र आलो. महाराष्ट्र सावरायचा असेल तर शरदला मुख्यमंत्री केले पाहिजे हे दादांनी सांगितले. ८७ साली मी पुन्हा मुख्यमंत्री झालो. दादांनी सांगलीत जाहीरपणाने सांगितले. आमच्या बैठकीत निलंगेकर, रामराव आदिक यांचा आग्रह होता की आम्ही सीनियर आहात त्यामुळे ही जबाबदारी आम्हाला द्यावी. त्यावेळी दादांनी स्वच्छपणे सांगितले की राज्य व्यवस्थित चालवायचे असेल तर शरद च्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
प्रतिनिधी : तरीही मी प्रश्न विचारतो कि यशवंतराव.. वसंतदादा आणि शरद पवार ह्याचे नातेसंबंध.. राजकीय कसे राहिले?
शरद पवार : चव्हाण साहेबा बरोबर संबंध प्रचंड चांगले होते ... सरकार गेल्याच्या नंतर एक सहा महिने नाराजी राहिली मात्र काही काळानंतर चव्हाण साहेब आणि मी अनेक कार्यक्रमात एकत्र आलो .. एका सभेत चव्हाण साहेबानी सांगितले कि आज मी बघतोय कि महाराष्ट्रातील कुठल्याही भागातील प्रश्न सोडवला नाही असे दिसत नाही ... मला अतिशय समाधान आहे .. राज्य या उत्तम प्रकारे सुरु आहे .. असे त्याचे व्यक्तव्य होते .. त्याचे राज्यच आम्ही घालवले होते .. त्यामुळे साहजिकच नाराजी होती ... राज्यकर्ते असताना आम्हाला त्यांनी कधी क्षमा केली नाही ... मात्र पुढील काळात मला मुख्यमंत्री करण्यासाठी त्यांनी हातभार लावला होता ...
प्रतिनिधी : यशवंतराव काँग्रेस मध्ये परत गेले मात्र तुम्ही गेला नाहीत ?
शरद पवार : त्यावेळी गेलो नाही. त्याचे कारण यशवंतराव सारख्या स्वातंत्र्य चळवळीत प्रचंड योगदान देणाऱ्या. सार्वजनिक जीवनात एक आदर्श ठेवणाऱ्या. एका व्यक्ती. ज्याचे योगदान इंदिरा गांधीपेक्षा जास्त होते. काँग्रेसमध्ये पदे नसतील मात्र सीनियरीटी.. ते नेहरूंचे सहकारी होते. तर त्या यशवंतरावनी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला त्यांना जी वागणूक मिळाली ती आम्हाला आवडली नाही. साताऱ्यात त्यांनी काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला होता. बहुसंख्येने असलेल्या आम्हा लोकांना तो निर्णय काही पटला नाही. मला ते मुलासारखे समजत. माझ्यापासून त्यांनी काही कधी लपवले नाही. त्यांनी इंदिरा गांधीला जाऊन सांगितले कि तुझी काँग्रेस लोकांनी मान्य केली आहे. मी खरा काँग्रेसच्या विचारावर चालणारा आहे. मला काँग्रेसमध्ये अखेरचा काळ घालवायचा आहे. त्यावेळी आम्ही दिल्लीत होतो. ते आल्यावर त्यांना विचारले काय झाले. त्यांनी सांगितले की मला इंदिरा गांधीने सांगितले की हा प्रस्ताव मी काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर ठेवते. हे आम्हाला अजिबात आवडले नाही. त्याच्यानंतर सहा महिने त्यावर निकाल घेतला नाही. चव्हाण साहेबांनी काँग्रेस एस च्या पार्लमेंटरी बोर्डचा राजीनामा दिला होता. त्यांना काँग्रेस आय मध्ये घेण्यात आले नव्हते. मधील सहा महिन्यात ते कोणत्याही पक्षात नव्हते. यशवंतराव चव्हाण हे देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री होते, स्वतंत्रसैनिक होते, परराष्ट्रमंत्री, विरोधीपक्ष नेता होता. असा मोठा माणूस. त्याची हि अवस्था झाली होती. ते आम्हाला पचले नाही. आम्ही कमालीचे अस्वस्थ होतो. त्यामुळे त्यावेळी आम्ही गेलो नाही. नंतर इंदिराजी गेल्या.. राजीव गांधींनी माझ्याशी सुसंवाद ठेवण्यास सुरुवात केली. त्यावेळीही काही आव्हाने आपण सोडवली पाहिजेत असे त्याच्याकडून सांगण्यात आले. त्यातून औरंगाबादचा कार्यक्रम झाला.
प्रतिनिधी : मग ९८ ला काय झाले. तुम्ही पक्ष फोडला नाही. तुम्ही जे लिहले आहे. त्यातून असा सेन्स येतो कि तुम्हाला परावृत्त केले गेले. मात्र आताची पक्ष सोडणारी मंडळी सांगतायत की नाही का पवारांनी पक्ष सोडला.
शरद पवार : ९८ ला एक्सपेल्ड केले गेले... तसे मला का केले गेले... त्या वर्किंग कमिटीच्या बैठकीत. मी संगमा आणि तारिक अन्वर यांनी एक भूमिका घेतली. ती भूमिका सोनिया गांधीच्या मनाविरोधात होती. सर्व वर्किंग कमिटी एकीकडे आम्ही तिघे एकीकडे... ते सोनिया गांधींना अजिबात आवडले नाही. मी संध्याकाळी मुंबईला निघून आलो. तेथे नंतर रडारडी झाली. नाराजी झाली. आमच्या तिघाला काँग्रेसच्या वर्किंग कमिटीतून सहा वर्षांसाठी एक्सपेल्ड करण्यात आले होते.. पार्टी आम्ही सोडली नव्हती.. पक्षाच्या अंतर्गत बैठकीत मते मांडणे हा लोकाशाहीत अधिकार आहे. पक्षाच्या वर्किंग कमिटीत नेतृत्वाच्या पेक्षा वेगळं मत मांडले होते. मग करणार काय शिवाजी पार्क वर सभा घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली.
प्रतिनिधी : मला एक असे लक्षात आले अमित शहाच्या सोलापूरच्या सभेत भाजपाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या मुद्द्यात कलम ३७० आहे.. पटत तुम्हाला हे... राज्याच्या राजकारणात देशाच्या पातळीवरचा मुद्दा आणणे.. त्यात शरद पवार हे मतदानाला हजर राहिले नाहीत.
शरद पवार : माझ्या जिभेचे ऑपरेशन झाले होते... मी नव्हतो.. माझ्या पक्षाने काय केले.. माझ्या पक्षाच्या खासदारांनी मतदानात भाग घेतला
प्रतिनिधी : तुमचा आजचा काय स्टॅन्ड आहे ३७० बद्दल?
शरद पवार : आमचा ३७० वर काही तक्रार नाही यात दोन गोष्टी आहेत कश्मिराचा निर्णय झाला आहे चांगलं झालं आहे. मला आनंद झाला असता राहिलेला काश्मीर सुद्धा आणला असता तर.. मग आम्ही काही अचिव्ह केले असे सांगितले असते... दुसरी गोष्ट अशी ३७१ ... ३७० मध्ये काय होते ... तुम्हा आम्हाला तेथे जाऊन जमीन घेता येत नव्हती.. आज ३७१ मध्ये तुम्हाला आणि मला नागालँडला मिझोरामला, सिक्कीमला ... जमीन घेता येत नाही.. तो जो नियम कश्मीरमध्ये लागू केला तो इकडे ही करा ना.. आपण भारतीय आहोत ना... कश्मीरमध्ये सांगण्यात येत भारतीयांना जमीन घेण्याची संधी मिळाली.. मग इकडे हि संधी द्या..
प्रतिनिधी : ३७० हा अजेंडा आहे पोलोराजेशन मुद्दा हा आहे ..
शरद पवार : ते काम त्यांनी केलेच त्यात काही वाद नाही ..
प्रतिनिधी : लोकांना आवडत आहे ते..
शरद पवार : लोकांना काही समाज घटकाबाबत अतिभाष्य केलेले आवडते..
प्रतिनिधी : हा मुद्दा असणार आहे पुढे ..
शरद पवार : सगळीकडे ३७० सांगतायत मात्र मला असे वाटते हळूहळू तो राहून जाईल. त्याचा काही फार परिणाम होईल असे वाटत नाही. विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक प्रश्न आणि स्थानिक उमेदवाराकडे अधिक लक्ष असते..
प्रतिनिधी : शरद पवार साहेब तुमचे सर्वात मोठे शिष्य आहेत नरेंद्र मोदीसाहेब ...
शरद पवार : शिष्य... ?
प्रतिनिधी : असे का रिअॅक्ट झालात?
शरद पवार : माझे आणि त्यांचे संबंध अतिशय चांगले आहेत.. ते मुख्यमंत्री होते... त्याकाळात काँग्रेस एनसीपीचे सरकार होते. मनमोहन सिंहांच्या नेतृत्वाखाली. त्यावेळी भाजपाकडे जास्त सत्ता नव्हती. ते सरकारवर टीका करण्याच्या अनुषंगाने पूर्ण तयारी करुन यायचे. टीकाटिप्पणी करण्याचे नेतृत्व हे मोदीकडे होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात मोदी बाबत एक कटुता होती. मोदींना यांच्याबाबत कटुता होती. ह्यांना त्याच्याबद्दल यांच्यात सुसंवाद नव्हता. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात. राज्याच्या प्रशासनासाठी केंद्राने राज्याने केंद्राकडे एक सामंजस्य भूमिका घ्यायला पाहिजे. या कटुतेमुळे कुठलाही काँग्रेसचा मंत्री मोदीबाबत सकारात्मक नव्हता. तसेच मोदींचे होते. अशावेळी मोदी फक्त माझ्याकडे येत असत. माझे घर त्याच्यासाठी स्वागतार्ह होते. मोदींच्या कुठल्याही किंवा राज्यातल्या कार्यक्रमाला केंद्रातून प्रतिनिधी येत नव्हता तर मी जात असे. कुठल्याही प्रश्नासाठी आम्ही नेहमी लक्ष केंद्रीत करत असू... कुठल्याही राज्यात त्याच्या कार्यक्रम असेल तर मी जात असे. एकदा मला कोणीतरी विचारले. आमच्या कॅबिनेटमध्ये. मी म्हणालो मी शेतीमंत्री आहे. मला काही झाले तरी परदेशातून आयात थांबवायची आहे. भारताला मोठे बनवायचे आहे. हे मी दिल्लीत बसून करु शकत नाहीत. मला राज्ये फिरावी लागणार. यासाठी मी प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधत असे मग तो कुठल्या पक्षाचा आहे हे बघायचे कारण नाही. ह्या राज्यात शेती उत्पादन वाढवायला मदत करणे. त्याच्यातून शेवटी देशाची गरज भागवण्याची परस्थिती निर्माण करणे ही माझी जबाबदारी आणि ती मी पाळणार. गुजरात हे विशेषत: तेलबियांच्या अग्रेसर असलेले राज्य आहे. तेथे काम करणार. याला मनमोहन सिंह यांनी पाठिंबा दिला होता त्यावेळी.
शरद पवार : आर्थिक आघाडीवर सर्वार्थने फेल आहेत असे दिसत.. ही आर्थिक मंदी नाही मंदीसदृश्य स्थिती आहे... दी नाहीये
शरद पवार : मला सरळ-सरळ असं दिसतंय. याच्यावर मी आजच नाशिकमधून आलोय. तिथे १६ हजार कामगार घरी बसलेत. ३०-३५ कारखाने बंद पडलेत आणि हे चित्र अनेक ठिकाणी आहे. कामगारांना स्टे आऊट दिलेलाय. का कारखाने बंद पडतात...का एकदम उत्पादन घटवायची वेळ आली. कृयशक्ती लोकांची कुठे गेली. आज शेती अवस्था असेल औद्योगिक असेल. या सगळ्यामध्ये ही अवस्था निर्माण झाली. का हे घडतंय त्याला उगीचच मंदीसदृश मंदी असा शब्दांचा खेळ करण्यात अर्थ नाही. इथे लोकांची परिस्थिती फार वाईटय आणि ज्या उत्पादित बाबी आहेत. त्याला मार्केट उपलब्ध करुन देणं यासाठी ठोस पावलं टाकायची गरज आहे. मला त्या सगळ्या गोष्टींचा आता अभाव दिसतोय.
प्रतिनिधी : अथोटीरिअन पद्धतीने चालतंय सरकार...
शरद पवार : सरकार कस चालतंय हे मी सांगू शकणार नाही...पण आज जी अर्थव्यवस्थेतेची स्थिती आहे ती दुरुस्त करायची असेल तर सरकारने विरोधकांना सुद्धा विश्वासात घेऊन योग्य ती पावले टाकली पाहिजेत कारण ही राष्ट्रीय गरज आहे. आता तो मोठेपणा दाखविण्याची गरज आहे...तो मला दिसत नाही.
प्रतिनिधी : तुम्ही एवढे पंतप्रधान बघितले.. या पंतप्रधानचे तुम्ही कसे मूल्यमापन कराल?
शरद पवार : या पंतप्रधानाला मी फार जवळून बघतले आहे. यांच्यात जमेची बाजू ही ते अत्यंत कष्टाळू आहेत. वर्कहोलिक आपण म्हणतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम काम काम दुसरे काही सूचत नाही. संगीतात त्यांना रुची आहे का नाही याची मला फारशी माहित नाही. पण सतत काम काम ही त्याची निश्चितपणे जमेची बाजू आहे. ती बाजू त्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे मात्र देशाच्या दृष्टीने उपयुक्त असतेच असे नाही. कसल्याही परस्थिती लोकांसमोर मांडणी करतानाची जी कला त्याच्याकडे आहे, त्याच्यामुळे किती गैरसमज सुद्धा होतात. सामान्य माणसाला त्याचे गांभीर्य लक्षात येत नाही. ही कला आहे त्याच्याकडे....ही जमेची बाजू आहे
प्रतिनिधी : एका अर्थाने फसवणूक आहे. तुम्ही तो शब्द नाही वापरत
शरद पवार : कसं असतं... शेवटी प्रायमिनिस्टरला मी एक इन्स्टिट्यूशन म्हणून बघतो ती अपेक्षा ठेवली पाहिजे हा माझा आतापर्यंतचा प्रयत्न राहिला आहे.
प्रतिनिधी : पण यांची सगळी आर्थिक धोरण..परराष्ट्र धोरण
शरद पवार : यांच्यात एकाच सांगतो.. हे जे निर्णय घेतले जातात. त्याच्यात डायलॉग आहे का नाही हे मला दिसत नाही. डायलॉगचा अभाव का वाटतो. यांच्यातल्या एक सीनिअर मंत्री जो पक्षाचा अध्यक्ष होता जे अनेक वेळा बोलतात गडकरी ते काय उगाच बोलणारे गृहस्थ नाहीत. त्यांच्या बोलण्यावरुन असं दिसतं. अस्वस्थ नाही त्यांच्या बोलण्यातून असं दिसत जे घडायला हवं ते घडत नाही असं दिसतंय. त्यासाठी जो सुसंवाद पाहिजे ते त्याठिकाणी नसावं यावरुन वाटतं. माझ्यामते ही कमतरताय. शेवटी सरकार चालवताना असा निर्णय कोणी एकटा व्यक्ती घेऊ शकत नाही. हा सामूहिक निर्णय असतो. या सामूहिक निर्णयाचे परिणाम राष्ट्राच्या हिताच्या जपवणुकीसाठी होत असतात. हे बघण्याची आवश्यकता असते. आज मला तसं चित्र दिसत नाही. आणि पक्षाचे लोक जेव्हा पार्लमेंट मध्ये आम्हाला भेटतात. त्यांच्याही बोलण्यातून कधी-कधी ऐकायला मिळत काय चाललंय आम्हाला कळतच नाही, आम्हाला माहितीच नाही.
प्रतिनिधी : आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे
शरद पवार : मी काय फार त्यांच्या दैनंदिन कामात नसतो. पण एक सभ्य माणूसय त्याचा लौकिकही काय बिघडलाय असं मी म्हणत नाही. पण सुसंस्कृत कुटुंबात वाढले असताना सुद्धा ज्या पद्धतीने ते जनतेसमोर भूमिका मांडतात, त्या भूमिका मांडत असताना राज्याच्या हितासाठी आपण काय करतो हे सांगण्यापेक्षा ते विरोधकांवर ते अधिक बोलतात. राज्याचा प्रमुख असं बोलतोय अशी अनेक उदाहरणे हे काही शोभत नाही आणि हे काय शोभत नाही सुसंस्कृत माणसाला.
प्रतिनिधी : पण ते म्हणतात की गेल्या पाच वर्षात खूप छान विकास झालाय.
शरद पवार : ते काय खरं नव्हे. यासंबंधीचे विश्लेषण अनेकांनी केलंय. विशेषतः अर्थशास्त्रज्ञांनी काही गोष्टी केल्या आहेत. याच्यातून वेगळं चित्र दिसतंय.
प्रतिनिधी : निवडणुकांच्या पॅरामीटरवरती बघितले तर ते म्हणतात गेल्या पाच वर्षात नगरपालिकेत वाढलो. जिल्हा परिषदेमध्ये वाढलो. आमची आमदारांची संख्या वाढली. काम चांगलंय म्हणून तर वाढली.
शरद पवार : असं ठीक आहे पण आज ते म्हणू शकतात. विरोधक जेवढं मजबूत पाहिजे सगळ्याबाबतीत त्याची कमतरता आहे आणि त्याचा लाभ हे घेतात. मी हल्ली सत्ताधारी पक्ष ज्यापद्धतीने निवडणुका नगरपालिकेच्या असोत जिल्हा परिषदेच्या असोत ज्या पद्धतीने साधनसामुग्री वापरतात, त्याच्या अनेक वेळा मी बघतो पक्षाच्या सहकाऱ्यांना साथ देण्याबाबतचा त्यांचा लौकिक आहे अशी काय माणसं आहेत एक- दोन..ते यापूर्वी कधी आम्ही पहिले नव्हतं, कुठल्याही सरकारमध्ये आणि जे जे विरोधक आहेत त्यात कुणाची आसपास सुद्धा कुवत नाही. त्यामुळे त्या साधनसंपत्तीच्या जोरावर एक वेगळ्या पद्धतीने लोकमत आत्मसात करण्यात दृष्टीने भूमिका घेण्यास सुरुवात झालेली आहे. जे कधी महाराष्ट्रात कधी नव्हतं.
प्रतिनिधी : तुम्ही जे इंडिकेट करताय ते काय तोडपाणीकडे गेल्यासारखं वाटतंय.
शरद पवार : मी काय तो शब्द वापरत नाही. पण सरळ-सरळ ओ..पण माहिती नाही. प्रचंड रिसोर्सेस उपलब्ध कारयाचे. त्याचा वापर आपल्या निवडणुकाच्या प्रक्रिया नाकारायचा आणि त्याच्यामार्फत यश संपादन करायचे अशी स्थिती आहे असं लोकांच्या आणि पक्षांच्या. सहकाऱ्यांच्या सुद्धा मनात असल्याचे ऐकायला मिळतं. तसा ठोस पुरावा वगैरे असं मी सांगू शकत नाही पण त्या पद्धतीने त्या पक्षातले लोक मला सांगतात.
प्रतिनिधी : विधीमंडळातले दोन्ही नेते मंडळीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ह्या सरकारचे मुद्दे मांडलेत विधीमंडळात असे तुम्हाला वाटते.
शरद पवार : विधानसभेत आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वाला सांगितले होते कि ते सभागृहात तुमच्या विचाराशी सुसंगत भूमिका घेतील असे नाही. ते सहकार्याची भूमिका घेत आहेत. एकेदिवशी त्याच सरकारमध्ये जाण्याचा त्याची भूमिका आहे.
प्रतिनिधी : ते तर पूर्णपणे म्हणतायत... मी गेलो.. माझ्यानंतर तर गेटच उघडे पडले आहे. पवारसाहेबानी माझ्या एका जागेसाठी अॅडजेस्टमेंट केली असती तर आज ही वेळच आली नसती.
शरद पवार : जागा कोणाकडे होती राष्ट्रवादीकडे होती. ती जागा माझ्या मुलाला मिळालीच पाहिजे असा कसा हट्ट करता येईल.
प्रतिनिधी : तुम्ही अनेक ठिकाणी अॅडजेस्टमेंट केली मात्र येथेच का राग आहे विखे घराण्याबाबत आहे का?
शरद पवार : बाळासाहेब विखे हे माझे बंधू होते. वैयक्तिक राग असण्याचे काय कारण आहे. त्याच्याबरोबर अतिशय घनिष्ठ संबंध होते.
प्रतिनिधी : तुम्ही अनेक ठिकाणी अॅडजेस्टमेंट केली मात्र येथेच का राग आहे विखे घराण्या बाबत आहे का ? ..
शरद पवार : बाळासाहेब विखे हे माझे बंधू होते. वैयक्तिक राग असण्याचे काय कारण आहे. त्याच्याबरोबर अतिशय घनिष्ठ संबंध होते ...
प्रतिनिधी : ह्या निवडणुकीत विरोधीपक्षाचे प्रॉस्पेट किती असे तुम्हाला वाटते. एकतर्फी निवडणूक आहे अशी वातावरण निर्मिती केली जात आहे.
शरद पवार : मला तसे वाटत नाही... लोक विरोधकांना चांगले यश देतील.
प्रतिनिधी : राज ठाकरे तुमच्या बरोबर येतील?
शरद पवार : राज ठाकरे लढवतील का नाही मला माहीत नाही? ते मला भेटले आणि त्यांनी मला सुचवले की आपण सर्वांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला पाहिजे. ते आम्ही स्वीकारु शकत नाहीत.
प्रतिनिधी : तुम्हाला वाटते ते निवडणूक लढवणार नाहीत ?
शरद पवार : आम्हाला सांगितले होते. बहिष्कार टाका म्हणून, ते काय करतात त्यांना माहीत ...
प्रतिनिधी : ईव्हीएम बाबत आज हि तुमचे तेच मत आहे?
शरद पवार : त्याच्यासंबंधीची निश्चित शंका आहे.
प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीत पडणारे जे जे हि प्रश्न आहेत ते सगळे विचारण्यात आले आहेत. कसलाही त्रागा न करता त्यांनी त्याची शांतपणे उत्तरे दिली आहेत. याही वयात राजकारणासाठी. जेवढे म्हणून कष्ट घ्यावे लागते ते घेणारा नेता माझ्याबरोबर आहे.