या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियासमोर 150 धावांचं आव्हान ठेवलं होतं. विराटच्या नाबाद अर्धशतकामुळे टीम इंडियाने हे आव्हान सात विकेट्स आणि सहा चेंडू राखून पार केलं. विराटने 52 चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 72 धावांची खेळी उभारली. त्याचं ट्वेन्टी ट्वेन्टी कारकीर्दीतलं हे 22वं अर्धशतक ठरलं.
त्याआधी कर्णधार क्विंटन डी कॉक आणि टेंबा बवुमाच्या दमदार फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत पाच बाद 149 धावांची मजल मारली. डी कॉकने ३७ चेंडूत आठ चौकारांसह 52 धावांची खेळी साकारली. तर बवुमाने तीन चौकार आणि एका षटकारासह 49 धावा फटकावल्या. भारताकडून दीपक चहरने दोन तर नवदीप सैनी, हार्दिक पंड्या आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.
विराटचा अप्रतिम झेल
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या चपळ क्षेत्ररक्षणाने क्रिकेटरसिकांची मनं जिंकली. विराटने या सामन्यात क्विंटन डी कॉकचा घेतलेला झेल थक्क करणारा होता. अर्धशतक झळकावणाऱ्या डी कॉकचा नवदीप सैनीच्या चेंडूवर उडालेला उंच झेल मिड ऑफवर उभ्या विराटने लिलया टिपला.