स्वातंत्र्यापासून कॉंग्रेसचा पारंपारिक गड म्हणून नवापूर विधानसभा मतदार संघाची संपूर्ण राज्यात ओळख आहे. आतापर्यंत या मतदारसंघात फक्त आणीबाणी नंतर झालेल्या निवडणुकीत आणि २००९ च्या विधानसभा मतदार संघात कॉंग्रेसचे उमेदवार पराभूत झाले आहेत.

या मतदार संघाची दुसरी ओळख सांगायची  तर कॉंग्रेसच्या इतिहासात इंदिरा गांधींपासून थेट सोनिया गांधींपर्यंत काँग्रेस अध्यक्षांनी या तालुक्यातूनच कॉंग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे. जेष्ठ नेते सुरूपसिंग नाईक या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात. तर सलग नऊ वेळा लोकसभा निवडणुका जिंकलेल्या माजी खासदार माणिकराव गावित या दोन्ही दिग्गज नेत्यांची या मतदार संघावर मोठी पकड आहे.



नवापूर रेल्वे स्टेशन


मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारीच्या मुद्यावरून नाईक आणि गावित परिवारातील मतभेद चव्हाट्यावर आले. आमदार सुरूपसिंग नाईक यांनी आमदार के सी पाडवी यांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळवून दिली असा समज झाल्याने माजी खासदार आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव गावित यांचे चिरंजीव आणि माजी जिल्हापरिषद अध्यक्ष भरत माणिकराव गावित यांनी बंडाचा झेडा उभारत भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतला आहे.  त्यामुळे या मतदार संघातील राजकीय लढत अधिक तीव्र झाली आहे.

या मतदार संघात पुरुष मतदारांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या अधिक असल्याने महिला मतदार या मतदार संघात आपला आमदार ठरविण्यात महत्वाची भूमिका बजवतात हे मात्र निश्चित.

पूर्वी नवापूर विधानसभा मतदार संघात धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील काही भागाचा समावेश होता.  मात्र २००९ च्या विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेत तो भाग वगळून नंदुरबार तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील चार जिल्हा परिषद गटांचा समावेश नवापूर विधान सभा मतदार संघात करण्यात आला आहे. या भागाचा मतदार संघात समावेश करण्यात आला आहे. या भागावर डॉ विजयकुमार गावित यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे या मतदार संघातील राजकीय गणिते बिघडली आहेत असं म्हणणं चुकीचे ठरणार नाही.  तसंच याचा प्रत्ययही  २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आला आहे. तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आघाडी असताना आपले बंधु शरद गावित यांना नवापूर विधानसभा मतदारसंघातून समाजवादीच्या सायकलीवर स्वार करून निवडून आणले होते आणि अजिंक्य म्हटले जाणारे आमदार सुरूपसिंग नाईक यांना पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा सुरूपसिंग नाईक यांनी शरद गावितांचा पराभव करीत हा मतदार संघ आपल्या ताब्यात घेतला.

२०१४ च्या विधानसभा मतदार संघातील उमेदवारांना मिळालेली मते

सरूपसिंग नाईक - कॉंग्रेस - ९३७९६
शरद गावित - राष्ट्रवादी - ७१९७९

२०१४ च्या निवडणुकीत माणिकराव गावित यांचा पराभव झाल्यानंतर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावित यांच्या मुलाने पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र आमदार के सी पाडवी यांना या मतदार संघातून कॉंग्रेसने उमेदवारी दिली त्यावरून माणिकराव गावित परिवाराची पक्षावर आणि आमदार  सुरूपसिंग नाईक यांच्यावर नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत भरत गावित कुठेही प्रचारात प्रभावीपणे दिसून आले नाहीत, त्याचा फटका कॉंग्रेसला बसेल असं वाटत असतानाही लोकसभेत नवापूर विधानसभा मतदार संघाने कॉंग्रेसला साथ दिली. या मतदार संघातून कॉंग्रेसला आठ हजाराचं मताधिक्य आहे

लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते
के सी पाडवी कॉंग्रेस  १०३२४६
डॉ हीना गावित भाजपा ९५९१३
(या मतदार संघातून कॉंग्रेस उमेदवार के सी पाडवी यांना ७३३३ मतांचे मताधिक्य आहे)

मतदार संघातील आताची राजकीय स्थिती आणि जातीय समीकरणे
नवापूर मतदार संघात लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विद्यमान आमदार सुरूपसिंग नाईक यांचे वय झाल्याने त्याचे पुत्र शिरीष नाईक कॉंग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत तर माणिकराव गावित यांचे चिरंजीव भरत गावितानी बंडाचे निशाण हाती घेतलं आहे. ते भाजपात प्रवेश करणार असल्याने तेही विधानसभा निवडणूक लढवतील हे स्पष्ट आहे. मात्र त्यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी युतीच्या जागावाटपात हा मतदार संघ शिवसेनेकडे आहे. माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे नेते शरद गावित या मतदार संघातून गेल्या पाच वर्षांपासून तयारी करीत आहेत. ते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. या मतदार संघातील जातीय समीकरणाचा आढावा घेतल्यास हा मतदार संघ आदिवासी बहुल आहे. यातील ८५ टक्के मतदार आदिवासी आहेत. उरलेल्या १५ टक्क्यात इतर समाजाचा समावेश आहे.

मतदार संघातील इच्छूक

कॉंग्रेस :- शिरीष नाईक, आर सी पाडवी
राष्ट्रवादी :- माजी आमदार शरद गावित
भाजपा :- भरत माणिकराव  गावित,  अनिल वसावे, माजी सनदी अधिकारी मधुकर गावित
शिवसेना :- वीरेंद्र वळवी

या मतदार संघात सपाटी आणि डोंगराळ भागाचा समावेश आहे आणि या मतदारसंघातील बराचसा भाग गुजरातच्या सीमावर्ती भागात पसरलेला आहे. राज्य सरकारने नवापूर एमआयडीसीला विशेष दर्जा दिला होता म्हणून मोठ्या प्रमाणात कापड उद्योजकांनी आपला उद्योग सुरु केला.  त्यातून हजारो युवकांना रोजगारही मिळाला. मात्र आताच्या सरकारने या ठिकाणचा विशेष दर्जा काढल्याने याभागातील उद्योग गुजरातमध्ये  स्थलांतरीत होण्याची भीती आहे.  त्याच सोबत शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि स्थलांतर या समस्या मतदार संघात पाहण्यास मिळतात.

या मतदार संघातील पाच प्रमुख समस्या
नवापूर midc तील कापड उद्योग सोडला तर कुठला ही मोठा उद्योग नसल्याने रोजगाराची समस्या
या मतदार संघातून राष्ट्रीय महामार्ग क्रमाक सहा जातो त्याची दूरवस्था झाली आहे, त्याच सोबत ग्रामीण भागातील रस्ते खराब आहेत
ग्रामीण भागात असलेल्या आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळाची अवस्था दयनीय आहे.
आरोग्य सुविधाचा बोजवारा
ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनाची समस्या
सिंचन सुविधा उपलब्ध नाहीत

नवापूर मतदार संघात यावेळी तिरंगी लढत पाहण्यास मिळेल. मात्र नवापुरातील दिग्गज शिरीष नाईक आणि भरत गावित यांच्यातील लढतीमुळे मतविभाजन होईल आणि त्याचा फायदा माजी आमदार शरद गावित यांना होऊ शकतो. दोघांचे भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता या मतदारसंघातील जाणकारांना वाटते.