कधी काळी धवल क्रांतीचं शहर म्हणून धुळे शहराची ओळख होती. मुंबईसाठी त्याकाळी धुळे शहरातून दुधाच्या वॅगन जात असत. मिल मजदुरांचं शहर अशीही एक धुळ्याची ख्याती पूर्वी होती. आता ती ओळख पुसली गेलीय. ना राहिली धवल क्रांती, ना सुरू आहे शासकीय दूध डेअरी, ना ही सुरु आहे टेक्सटाईल मिल. मात्र आजही महामार्गांचं हब म्हणून अशी ओळख धुळे शहराची असली तरी या शहरात आजही पक्के रस्ते, पिण्याच्या पाणी अशा मूलभूत समस्या कायम आहेत.
२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप - शिवसेना यांची युती नव्हती. काँग्रेस - राष्ट्रवादीचीही आघाडी न झाल्याने सर्वच प्रमुख पक्षांनी स्वतंत्रपणे लढवलेल्या निवडणुकीत भाजपचे आमदार म्हणून अनिल गोटे विजयी झाले. भाजप सेना यांच्या युतीत धुळे शहर आणि धुळे ग्रामीण हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला जातो. यंदा देखील २०१४ पेक्षा वेगळी स्थिती नसेल म्हणजेच प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढतो की काय अशी स्थिती आहे.
पुण्या-मुंबईसह उर्वरीत महाराष्ट्रासाठी धुळे शहर हा तसा अनिल गोटे यांचा मतदारसंघ. एकेकाळी पत्रकार असलेल्या अनिल गोटे यांनी राज्यभरात समाजवादी जनता पार्टी आणि नंतर त्यांच्या स्वतःच्या लोकसंग्राम पक्षाच्या वतीने रंगवलेल्या भिंतीमुळे त्याचं नाव सर्वदूर पोहोचलेलं. पुन्हा तेलगी प्रकरणात त्यांचं नाव चर्चेत आलेलं. आमदार अनिल गोटे यांनी तब्बल तीन वेळा वेगवेगळ्या पक्षाच्या चिन्हावर या मतदारसंघातून निवडणूक लढवून जिंकलीय.
धुळे शहर विधानसभा मतदार संघात १९९९ मध्ये समाजवादी जनता पार्टी तर्फे, २००९ मध्ये लोकसंग्राम पक्षातर्फे, २०१४ मध्ये भाजप तर्फे अनिल गोटे विजयी झाले. २००४ मध्ये मात्र खरी लढत झाली ती राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत. २००४ मध्ये राष्ट्रवादी चे राजवर्धन कदमबांडे यांना ५४ हजार ४५७ मतं मिळालीत तर शिवसेनेचे उमेदवार डॉ . सुभाष भामरे यांना ४९ हजार ११४ मते मिळाली तर अनिल गोटे यांच्या पत्नी हेमा गोटे (समाजवादी जनता पार्टी) यांना २३ हजार ९०० मतं मिळाली होती. २००४ सालच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नीने हा मतदारसंघ लढवला कारण त्यावेळी ते तेलगी प्रकरणात अडकले होते.
धुळे शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी अनिल गोटे यांनी २००१ मध्ये धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील अनेर या धरणातील मृतसाठा देखील धुळेकरांच्या उपयोगी आणला होता. राज्यातील हा त्यावेळचा पहिलाच प्रयोग असल्याचं सांगण्यात आलं .
महानगर पालिकेत सध्याचा काळ सोडला तर राष्ट्रवादीचीच सत्ता होती. महानगर पालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असतांना देखील शहर विकासाबाबत उदासीन असलेली राष्ट्रवादी आणि विरोधी पक्ष असेलल्या शिवसेनेचीही तेवढीच उदासीनता यामुळे महानगर पालिकेच्या निवडणुकीत शहरातील मतदारांनी आता भाजपच्या हाती एकहाती सत्ता मतदारांनी दिली. मतदारांचा विश्वास भाजप किती सार्थ करते आहे हे धुळे शहरवासीय अनुभवताहेत.
धुळे शहर विधानसभा मतदार संघातील प्रमुख काही समस्या
( १ ) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, पक्के रस्ते, गटारी
( २ ) रेल्वेमार्गाचा अभाव
( ३ ) रोजगारीची समस्या
( ४ ) पर्यटनस्थळाचा अभाव
( ५ ) महामार्गांचे हब म्हणून असलेल्या शहरात तापी खोरे, वीज वितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांची विभागीय कार्यालये धुळ्यात नसून जळगांव शहरात असल्याने नागरिकांना ते गैरसोयीची वाटतात.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाने भाजप उमेदवार आणि माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे यांना मताधिक्य दिलं. या मतदारसंघातून त्यांना तब्बल ८६ हजार मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार असलेले कुणाल पाटील यांना या मतदारसंघातून ५७ हजार मते मिळाली.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अनिल गोटे भाजपच्या तिकीटावर ५७ हजार मतांसह निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजवर्धन कदमबांडे यांचा पराभव केला.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत काही महिन्यापूर्वी भाजप आमदारकीचा राजीनामा दिलेले अनिल गोटे लोकसंग्राम पक्षाच्या वतीने पुन्हा निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत.
तर भाजपच्या वतीने अर्धा डझनपेक्षा जास्त जण इच्छुक आहेत. यात प्रामुख्याने भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, रवी बेलपाठक, हर्षल विभांडीक, डॉ . माधुरी बाफना, सुभाष देवरे आणि विनोद मोराणकर यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.
शिवसेनेतर्फे प्राध्यापक शरद पाटील, डॉ. सुशील महाजन आणि राष्ट्रवादीकडून माजी आमदार राजवर्धन कदमबांडे तर मनसेच्या प्राची कुलकर्णी यांचीही नावे चर्चेत आहेत. काँग्रेस तर्फे साबीर शेख निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
लोकसभा निवडणुंकापूर्वी आस्तित्वात आलेली वंचित बहुजन आघाडी देखील यंदा धुळे शहर विधानसभा मतदार संघात आपलं नशीब आजमावणार आहे.
यंदाच्या २०१९ च्या विधान सभा निवडणुकीत अनिल गोटे आपला गड राखतील की नवीन चेहरा या मतदार संघात राहील हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल .