Nanded Loksabha Election : विधानसभेचे निकाल जाहीर झाले आहेत, या निकालामध्ये नांदेड जिल्ह्यात मात्र काँग्रेसचा सुपडा साफ झालाय. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या जीवावर काँग्रेसने अशोक चव्हाण यांना जबरदस्त टक्कर देत लोकसभेची निवडणूक जिंकली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची चांगलीच वाताहात झाल्याचे पाहायला मिळाले. नांदेड जिल्ह्यात काँग्रेस म्हणजेच अशोक चव्हाण आणि अशोक चव्हाण म्हणजेच काँग्रेस हे समीकरण जुळलेले होतं. मात्र अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडल्यानंतर आता अशोक चव्हाण म्हणजेच भाजप आणि भाजप म्हणजेच अशोक चव्हाण असं म्हणायची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये असताना अशोक चव्हाण यांनी नऊ पैकी नऊ जागा काँग्रेसच्या निवडून आणल्या होत्या. त्याची पुनरावृत्ती अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये आल्यानंतर करून दाखवली.
लोकसभेच्या निवडणुकीत जरांगे फॅक्टर मराठवाड्यात पाहायला मिळाला. जरागे फॅक्टरमुळे मराठवाड्यात महायुतीला चांगलाच झटका बसला होता. विधानसभेसाठी देखील हा फॅक्टर चालेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं. मात्र या निवडणुकीत लाडकी बहीण योजना ओबीसी फॅक्टर मोठ्या प्रमाणात भाजपच्या मागे उभा राहिल्याचे स्पष्ट झाले. विधानसभेची घोषणा झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. अशोक चव्हाण यांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची भोकर मतदारसंघ जाहीर सभा कॉर्नर बैठकांचा सपाटा लावला होता. मात्र, अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघात तळ ठोकून होते. मला संपवायला सगळेजण भोकरला घेत असल्याचा दावा देखील अशोक चव्हाण यांनी केला होता. मात्र, विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपने चांगला विजय मिळवलाय.
नांदेड जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीने चांगलीच मोर्चे बांधणी केली होती. चांगले उमेदवार देखील मैदानात उतरवले होते. मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत नऊ मतदारसंघात काँग्रेसला क्रमांक दोनची मत मिळवण्याकरिता सुद्धा चांगली दमछाक करावी लागली. अशोक चव्हाण यांच्यावर काँग्रेसने दणदणीत विजय मिळवल्यानंतर अवघ्या पाच महिन्यातच विधानसभेच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसचा चांगला सुपडा साफ झाल्याचे पाहायला मिळाले. एकेकाळी काँग्रेसचे चार आमदार 2019 च्या निवडणुकीत निवडून आले. मात्र या विधानसभेच्या निवडणुकीत विद्यमान आमदारांना देखील पराभव पहावा लागला. पाच महिन्यापूर्वी काँग्रेसची लाट या मतदारसंघात फिरत होती, प्रचार देखील सुरू झाला होता, मात्र आता या धक्कादायक लागलेल्या निकालामुळे काँग्रेसला स्वतःलाच आता आत्मपरीक्षण करावं लागणार आहे.
विधानसभेचे निकाल लागल्यानंतर अशोक चव्हाण यांनी भोकर मतदार संघात आभार बैठका घेत मतदारांचे आभार मानले. अशोक चव्हाण यांचे एक विधान सध्या चांगले चर्चेत आलेले आहे. ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिला त्यांच्या सगळ्यांचा सुपडा साफ झाला, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी भोकर मतदार संघात नागरिकांशी संवाद साधताना व्यक्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आमदार होताच दिलीप वळसे पाटील घेणार शरद पवारांची भेट, मोठं कारण समोर