Ladki Bahin Yojana : लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभवाला सामोरे गेल्यानंतर जून महिन्यामध्ये सादर करण्यात आलेली लाडकी बहीण योजना महायुती सरकारसाठी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अक्षरशः वरदान ठरली. या एका योजनेच्या जोरावर महायुतीला पुन्हा सत्तेमध्ये येण्यास संधी मिळाली. महायुतीला राज्यातील लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान देत भक्कम बहुमताने सरकार स्थापन करण्यासाठी संधी दिली आहे. त्यामुळे आता महायुतीने सत्तेमध्ये आल्यानंतर पहिला निर्णय या लाडकी बहीण योजने संदर्भात घेण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महायुतीकडून धडाधड निर्णय घेण्यात आले. अनेक शासन निर्णय सुद्धा जारी करण्यात आले होते. मात्र, या सर्वांमध्ये महत्त्वाचा घटक लाडकी बहीण योजना होता. या योजनेचे आगाऊ पैसे देण्यात आल्याने मतदारांमध्ये सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला होता. 






योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये केली जाण्याची शक्यता


लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये देण्यात आले होते. मात्र, आता ही रक्कम वाढवण्याची घोषणा महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आली होती. त्यानुसार या योजनेचे 1500 वरून 2100 रुपये करण्यात येतील, असं जाहीर करण्यात आलं होतं. तो निर्णय सरकार स्थापन होताच पहिल्याच कॅबिनेट बैठकीमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेनंतर पहिलं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये पार पडणार आहे. या अधिवेशनामध्येच या योजनेची रक्कम पंधराशे रुपयांवरून 2100 रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्या योजनेनं यश मिळवून दिला त्या योजनेबाबत दिलेलं आश्वासन महायुती सरकार लवकर पूर्ण करणार असल्याची शक्यता आहे.


दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही योजनेची रक्कम डबल करण्याचा आश्वासन देण्यात आलं होतं. यासाठी पाच गॅरंटी सादर करण्यात आल्या होत्या. मात्र, राज्यातील लाडक्या बहिणीने पुन्हा एकदा महायुतीकडे कल दिल्याने आता लाडक्या बहिणींना योजनेची रक्कम वाढवली गेल्यास दरमहा 2100 रुपये मिळणार आहेत. जवळपास दोन कोटी 32 लाख महिलांना या योजनेचा थेट लाभ मिळत आहे. ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येत असल्याने महायुती सरकारसाठी विधानसभा निवडणुकीमध्ये एक प्रकारे गेम चेंजर ठरली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या