2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत भलेभले गारद झाल्यानंतर बहुजन विकास विकास आघाडीही गारद झाली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार चिंतामण वणगा यांना 1,04, 723 मतं मिळाली तर बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव 71,199 मतं मिळाली होती. 33,524 मतांच्या फरकाने बहुजन विकास आघाडीला हरवत मोदी लाटेत चिंतामण वणगा खासदार झाले होते. मात्र त्यानंतर काही महिन्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मात्र आमदार हितेंद्र ठाकूरांनी आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केलं. जिथे मनसेसारखा पक्ष महाराष्ट्रात हतबल झाला तिथे हितेंद्र ठाकूरांनी आपला वसई विधानसभा पुन्हा ताब्यात घेतली. शिवाय नालासोपारा आणि बोईसर विधानसभाही जिंकल्या.
त्यावेळी नालासोपारा विधानसभेतून ठाकूरांचे पुत्र क्षितीज ठाकूर हे 59,067 मतांनी भाजपाच्या राजन नाईक आणि शिवसेनेच्या शिरीष चव्हाणांना नमवून जिंकले. त्यावेळी युती न झाल्याने सेना भाजपा वेगवेगळे लढले होते. या दोघांची ही मतं एकत्र केली तरी 14,178 अधिक मतं क्षितीज ठाकूरांना होती.
2014 विधानसभा निवडणुकीत मिळालेली मतं
क्षितीज ठाकूर - बहुजन विकास आघाडी – 1,13,566,
राजन नाईक – भाजपा – 59,067
शिरीष चव्हाण – शिवसेना – 40,321
असा इतिहास असताना लोकसभेची तुलना विधानसभेत करण जिकरीच ठरेल. 2009 साली पहिल्यांदा बहुजन विकास आघाडीने लोकसभेत एन्ट्री करुन लोकसभा जिंकलीही होती. मात्र त्यानंतर मोदी लाटेत भाजपाचे चिंतामण वणगा यांनी 1,04,723 मतं घेतली तर बहुजन विकास आघाडीला 71,199 मतं मिळाली. त्यानंतर चिंतामण वणगाच्या निधनानंतर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत सेना आणि भाजपा वेगवेगळे लढून ही बहुजन विकास आघाडीला पालघर लोकसभा जिंकता आली नाही. तर 2019 च्या लोकसभा लोकसभा निवडणुकीत तर सेना भाजपाची युती होती. त्यावेळी नालासोपाऱ्यातून सेनेला 1,33,259 तर बहुजन विकास आघाडीला 1, 07, 724 मतं मिळाली होती.
नालासोपाराच्या बालेकिल्ल्यातून बहुजन विकास आघाडी 25,535 मतांनी पिछाडीवर राहिली. त्याचमुळे शिवसेना आणि भाजपाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्ला भेदणार असा आत्मविश्वास सामान्य कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यातच शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदिप शर्मा यांना ठाकूरांच्या समोर उतरवलं असल्याने मोठी फाईट नालासोपारा विधानसभेत बघायला मिळेल. असं असलं तरी 2014 च्या लोकसभेच्या नंतर झालेल्या विधानसभेचा इतिहास विसरता येणार नाही.
नालासोपारा विधानसभेत अनेक समस्या आहेत. तो सोडवणारा नेता आता नालासोपारावासियांना हवा आहे. नालासोपाऱ्यात अनधिकृत बांधकामाच साम्राज्य उभं राहिलं आहे. मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळी, इमारती उभ्या राहिल्या आहेत. तिथे प्रामुख्याने पाण्याची समस्या आहे. मागच्या वर्षी आणि यंदाही पावसाच्या सरीत वसई विरारचं संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं. रस्त्यावर, तळघरात, दुकानात पाणी साचून नागरिकांचं लाखोचं नुकसान झालं आहे. नवीन इमारतीना अजून नळ कनेक्शन मिळालं नाही. चाळींना पाण्याचं कनेक्शन मिळालेलं नाही. क्षेत्रात पाण्याची भीषण टंचाई आजही जाणवत आहे. टॅंकर माफिया आजही येथे सक्रिय आहेत. एक रुम दोन ते तीन जणांना विकणारा चाळ माफीयाही येथे सक्रिय आहे.
कितीतरी नागरिकांना चिटर बिल्डरांनी फसवलं आहे. नालासोपारा उड्डाणपुलाजवळ तसेच शहरात इतरही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॅफीकची समस्या आहे. विरार, नालासोपारा, विरार येथे अजून एक रेल्वेहून जाणारा पूर्व पश्चिम उड्डाणपूल बनवणं गरजेचं आहे. आरोग्याची सेवा देखील तोकडी आहे. फेरीवाल्यांनी येथे उच्छाद मांडला आहे. फेरीवाला धोरण अजून राबवण्यात आलं नाही. महावितरणाच्या भोंगळ कारभाराविरोधात ही जनसामान्यात आक्रोश आहे. अशा अनेक समस्यांनी नालासोपारा विधानसभा क्षेत्र ग्रासलेलं आहे.
सर्व समाजातील लोकांचा वर्ग येथे पाहायला मिळतो. तसं असलं तरी उत्तर भारतीयांची मतं मात्र निर्णायक ठरतात हे नक्की. येथे लाखाच्यावर उत्तर भारतीय आहेत. त्यामुळेच लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उत्तर प्रदेशच्या दिग्गज नेत्यांच्या सभा नालासोपाऱ्यात निवडणुकीच्या दरम्यान होतात. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभा नालासोपाऱ्यात लावल्या जातात. त्याचा इफेक्ट ही मतदानात होताना दिसून येतो. त्यासाठी उत्तर भारतीयांचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी शिवसेनेनं प्रदिप शर्मांसारखा एक चेहरा शोधला आहे. त्यामुळे सध्या नालासोपारा निवडणूक ही मोठी अटीतटीची आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.
हितेंद्र ठाकूरांच्या वर्चस्वाला खिंडार पाडण्यासाठी शिवसेना-भाजप याठिकाणी ताकत पणाला लावणार हे नक्की. साम, दाम, दंड, भेद वापरून कोणत्याही परिस्थितीत हा गड जिंकायचा असा कयास त्यांनी बांधला आहे. नालासोपारा विधानसभेतून शिवसेनेकडून उतरविण्यासाठी प्रदिप शर्मांची राजकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे. प्रदिप शर्मा यांनी पोलीस खात्यातून स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला आहे. पण तो अजून मंजूर झालेला नाही. त्यामुळे प्रदिप शर्मा अजूनपर्यंत उघडपणे कोणतीच राजकीय भूमिका घेताना दिसत नाहीत. मात्र प्रदिप शर्मा हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित आहे. त्यासाठी त्यांनी कामाला सुरुवातही केली आहे. मात्र वाघाच्या जबड्यातून एखादी शिकार पळवण्यासारखं हे काम प्रदिप शर्माकडे असणार आहे. नालासोपारा विधानसभेत एण्ट्री घेण्याअगोदरच शर्मांचे हितचिंतक कामाला लागले आहे. मात्र बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर हे आयत्या वेळेला कोणता निर्णय घेवून राजकीय खळबळ माजवतील याचा नेम नाही.
जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान