Akola Election Reservation 2022 : अकोला महापालिकेचं प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली. यावेळी अकोला महापालिकेच्या 11 जागा वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेत आता एकूण 91 जागा आहे. यातील 46 जागा महिलांसाठी राखीव आहेत. यातील 15 जागा अनुसुचित जाती तर दोन जागा अनसुचित जमातीसाठी राखीव आहेत. आजच्या नव्या आरक्षणामूळे दिग्गजांना फटका बसला आहे. अकोल्याच्या भाजप  महापौर अर्चना मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी यांचे प्रभाग आरक्षणामुळे प्रभावित झालेत. तर भाजपचे गटनेते राहुल देशमुखांचा प्रभागही महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना पत्नीच्या तिकीटासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे या दिग्गजांना दुसऱ्या प्रभागातून उभं रहावं लागण्याची शक्यता आहे. आजच्या आरक्षण सोडतीमुळे सध्याच्या महापालिकेतील किमान वीसवर विद्यमान नगरसेवकांना निवडणूक रिंगणाबाहेर राहवं लागण्याची शक्यता आहे. आजच्या आरक्षण सोडतीनंतर अकोला महापालिकेच्या राजकीय रणधुमाळीला आता खऱ्या अर्थाने सुरूवात झाली आहे. 


अशी असणार आहे अकोला महापालिकेची आरक्षण रचना : 


अकोला महापालिकेतील सदस्यसंख्या  91 असणार आहे. एकूण 30 प्रभागांतून हे सदस्य निवडले जाणार आहेत. यातील 46 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. अनुसुचित जातीसाठी राखीव असलेल्या 15 पैकी आठ जागा या महिलांसाठी राखीव असणार आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या  दोनपैकी एक जागा ही महिलेसाठी राखीव असणार आहे. याशिवाय सर्वसाधारण असलेल्या 74 पैकी 37 जागा या महिलांसाठी राखीव असणार आहे. त्यामुळे अकोला महापालिकेत 'महिलाराज' असणार आहे. 46 राखीव जागांसह खुल्या गटांतूनही महिला निवडून आल्यास महापालिकेतील महिलांचा आकडा 50 वर जाण्याची शक्यता आहे. 


आरक्षणाचा दिग्गजांना फटका : 


आजच्या नव्या आरक्षणामुळे दिग्गजांना फटका बसला आहे. अकोल्याच्या भाजप  महापौर अर्चना मसने, उपमहापौर राजेंद्र गिरी यांचे प्रभाग आरक्षणामूळे प्रभावित झालेत. तर भाजपचे गटनेते राहुल देशमुखांचा प्रभागही महिलेसाठी राखीव झाल्याने त्यांना पत्नीच्या तिकीटासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यामुळे या दिग्गजांना दुसऱ्या प्रभागातून उभं रहावं लागण्याची शक्यता आहे. यासोबतच काँग्रेसचे युवा नगरसेवक पराग कांबळे यांच्या प्रभागातील दोन जागा आरक्षित झाल्याने त्यांना ऐनवेळी नव्या प्रभागाचा पर्याय शोधावा लागू शकतो. आजच्या आरक्षण सोडतीमुळे माजी महापौर विजय अग्रवाल, मदन भरगड, उज्वला देशमुख, सुरेश पाटील, सुमन गावंडे यांच्या प्रभागात त्यांना आरक्षणाचा फटका बसलेला नाही. मात्र, एखाद-दुसरा अपवाद सोडला तर माजी महापौरांचं सभागृहात 'कमबॅक' होणं कठीण झालेलं आहे. याशिवाय सध्याचे विरोधी पक्षनेते डॉ. जिशान हुसेन, माजी विरोधी पक्षनेते साजिदखान पठाण, सेना गटनेते राजेश मिश्रा हे आरक्षणाच्या फटक्यातून वाचले आहेत. आजच्या आरक्षण सोडतीमुळे सध्याच्या महापालिकेतील किमान वीसवर विद्यमान नगरसेवकांना निवडणुक रिंगणाबाहेर रहावं लागण्याची शक्यता आहे. 


सध्याच्या महापालिकेतील पक्षीय बलाबल

 


एकूण जागा : 80

 


  • भाजप : 48

  • काँग्रेस : 13

  •  शिवसेना : 08

  • राष्ट्रवादी : 05

  • वंचित बहुजन आघाडी : 03

  • एमआयएम : 01

  • अपक्ष : 02