मोर्शी विधानसभा मतदारसंघ. अमरावती जिल्ह्यातला एक महत्वाचा मतदारसंघ. हा मतदारसंघ प्रामुख्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. संत्रा हे प्रमुख पीक असलेल्या या मतदारसंघात संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचा अभाव आणि संत्र्याचे पडलेले भाव आणि संत्रा बागांसाठी पाण्याची अनुपलब्धता हे या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न.

अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांचा मिळून बनलेला हा मतदारसंघ लोकसभेसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघाला जोडला जातो.  या मतदारसंघाचं नाव मोर्शी असलं तरी पूर्ण वरुड तालुका आणि मोर्शी शहरासह तालुक्यातील अंबाडा, हिवरखेड, रितपूर आणि मोर्शी या सर्कलचा या मतदारसंघात समावेश होतो.

देवेंद्र फडणवीस यांच्या अलीकडच्या मंत्रिमंडळ विस्तारात मोर्शीतून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेले डॉ. अनिल बोंडे यांची कृषिमंत्री पदी वर्णी लागली.  शिवसेना- भाजप युतीतील जागावाटप अजून निश्चित झालेलं नाही. मात्र भाजपने आधीच जाहीर केल्याप्रमाणे ज्या ठिकाणी भाजपचे आमदार विद्यमान आहेत, त्या जागांविषयी भाजप तडजोड करणार नाही. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी  भाजपात येऊन मोर्शीची आमदारकी दुसऱ्यांदा जिंकलेल्या डॉ. अनिल बोंडे यांना कृषिमंत्रीपद मिळाल्यावर तेच मोर्शीचे उमेदवार असणार, हे जवळपास निश्चित आहे. तरीही भाजपाचे माजी जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे आणि महात्मा फुले बँकेचे अध्यक्ष राजेंद्र आंडे हे ही भाजपाच्या उमेदवारीसाठी गुढघ्याला बांशिंग बांधून सज्ज झाले आहेत.

२०१४ ची निवडणूक भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने स्वतंत्रपणे लढवली. या निवडणुकीत भाजपाचे डॉ. अनिल बोंडे निवडून आले. या मतदार संघात काँग्रेस आणि राष्ट्रवादीची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. परंतु २०१४ च्या निवडणुकीत सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यामुळे झालेल्या मत विभाजनाच्या फायदा भाजपाला झाला. 2014 ला भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ. अनिल बोंडे 2009 च्या टर्मला मोर्शीचे अपक्ष आमदार होते. त्यापूर्वी ते शिवसेनेत होते.

यापूर्वी मोर्शी विधानसभा मतदारसंघाला दोनवेळा मंत्रीपद मिळालं आहे. 1972 च्या निवडणुकीत आमदार झालेले मल्हारराव माहुलकर या मतदारसंघातील पहिले मंत्री. त्यांनी उर्जा मंत्रालय सांभाळलं. त्यानंतर 1990 साली आमदार झालेल्या हर्षवर्धन देशमुख यांना त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजे 1996 मध्ये मंत्रीपदाची संधी देण्यात आली. 1990 आणि 1995 या दोन निवडणुकांनंतर हर्षवर्धन देशमुख पुन्हा 2004 साली मोर्शीतून निवडून आले. त्यानंतर 2009 सालच्या निवडणुकीत सध्या कृषिमंत्री असलेले डॉ. अनिल बोंडे अपक्ष म्हणून निवडून आले. 2014 च्या निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि आमदारकीच्या यशाची पुनरावृत्ती केली.

अमरावती जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी शिवसेनेला किती मतदारसंघ मिळणार? याबाबत उलट-सुलट चर्चा सुरु आहे. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने या मतदारसंघातून साहेबराव तट्टे यांना उमेदवारी दिली होती, मात्र विद्यमान आमदार अनिल बोंडे यांनी त्यांचा पराभव केला. ते अपक्ष उमेदवार होते. 2009 ची चूक पुन्हा होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ जनसंग्रामचे आमदार आमदार बोंडे यांना भाजपाची उमेदवारी देवून २०१४ मध्ये निवडून आणलं. त्यामुळे या मतदार संघावर भाजपाचे वर्चस्व प्रस्थापित झालं आहे.

वरूड-मोर्शी विधानसभा हा मतदार संघ  एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. या मतदार संघाने काँग्रेसच्या पुरुषोत्तम मानकर, नरेशचंद्र ठाकरे, हर्षवर्धन देशमुख यांना विधानसभेत पाठवलंय. यापैकी हर्षवर्धन देशमुख हे नंतर राष्ट्रवादीत दाखल झाले, परंतु ते राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयी झाले नाही. 2004 च्या निवडणुकीत हर्षवर्धन देशमुख अपक्ष निवडून आले आणि पुन्हा राष्ट्रवादीत गेले. वरूड मोर्शी या काँग्रेसच्या गडाला सुरूंग लावण्याचं काम विद्यमान कृषी मंत्री बोंडे यांनीच केलं आहे. त्यामुळे पुन्हा या मतदार संघावर काँग्रेसचा झेंडा फडकावयाचा असेल तर कृषिमंत्री अनिल बोंडे हे मोठं आव्हान त्यांच्यापुढे असेल. याचा मुकाबला काँग्रेसवाले कसं करणार याकडेही मतदार संघाचं लक्ष लागलेलं आहे.

काँग्रेसमध्ये उमेदवारीसाठी पंचायत समिती सभापती विक्रम ठाकरे, माजी जिल्हा परिषद सभापती गिरीश कराळे हे इच्छुक आहेत. राष्ट्रवादी - स्वाभिमानीची आघाडी झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे देवेंद्र भुयार आणि राष्ट्रवादीचे हर्षवर्धन देशमुखही उत्सुक असल्याचं सांगितलं जातंय. काँग्रेसमध्ये उमेदवारी मिळू शकत नसल्यामुळे आणि मतदार संघात डॉ. अनिल बोंडेचा मुकाबला फक्त बाळासाहेब सोलव करू शकत असल्यामुळे शिवसेनाही बाळासाहेब सोलव यांच्या संपर्कात असल्याचं बोलल्या जात आहे. बाळासाहेब सोलव आणि अनिल बोंडे यांच्यात सरळ लढत झाल्यास बोंडेचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही अशीही चर्चा  मतदारसंघात आहे. पण हा सर्व जर-तरचा मामला झाला, कारण 2009 च्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला असला तरी 2014 च्या सर्व पक्ष स्वतंत्र लढलेल्या निवडणुकीत भाजपने या मतदारसंघावर कब्जा केलाय.

सध्याची परिस्थिती  पाहता काँग्रेसमध्ये इच्छुकांची गर्दी वाढलेली आहे. जो तो उमेदवार म्हणूनच मतदार संघात वावरत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतच वंचित आघाडी एकत्र आली तरच भाजपाच्या उमेदवाराला या मतदारसंघात तगडे आव्हान निर्माण होवू शकते असं राजकीय जाणकारांना वाटतं.