नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांचं आज 66 व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अरुण जेटली यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक महत्वाची खाती सांभाळली. महत्त्वाच्या पदावर काम करत असताना त्यांनी अनेक महत्त्वाचे देशहिताचे निर्णय घेतले.


अरुण जेटली यांची राजकीय कारकीर्द


अरुण जेटली यांच्या राजकीय कारकिर्दिची सुरुवात 1974 मध्ये दिल्ली विद्यापीठातून छात्रसंघ अध्यक्ष म्हणून झाली. 1977 मध्ये त्यांनी जनता पार्टीचा प्रचार केला. त्यानंतर 1980 मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर ते भाजपचे सदस्य झाले. आपल्या कामगिरीच्या जोरावर जेटला यांना 1991 मध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य बनवण्यात आले.



अरुण जेटली यांनी सरकारमध्ये मोठी पदं भूषवली, मात्र ते पहिल्यांदा 47 व्या वर्षी खासदार बनले. अरुण जेटली 1999 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती आणि प्रसारण मंत्री होते. त्यानंतर केंद्रीय कायदामंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रात संरक्षण आणि अर्थ खात्याची जबाबदारी दिली होती.


2000-2012 असं तीन वेळा ते गुजरातमधून राज्यसभेत गेले. 2010 मध्ये त्यांना सर्वोत्कृष्ट खासदार म्हणून सन्मानित करण्यात आले. 2018 मध्ये चौथ्यांदा जेटली यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर पाठवण्यात आलं. विरोधी पक्षात असताना देखील त्यांची भाषणं खुप गाजली. अनेकांनी त्यांच्या भाषणांची स्तुती केली. मात्र एवढ्या मोठ्या राजकीय कारकिर्दीत ते एकदाही लोकसभेचे सदस्य होऊ शकले नाहीत.


नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करण्यास ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी तयार नव्हते. त्यावेळी जेटलींनी अडवाणींची नाराजी पत्करुन मोदींना पक्षाचा चेहरा म्हणून पुढे आणलं. मोदी बडोदा आणि वाराणसी मतदारसंघातून लढले. जेटलींसाठी त्यांनी अत्यंत सेफ अशी अमृतसरची जागा निवडली. तरीही जेटली पराभूत झाले होते. मात्र त्यानंतरही मोदींनी त्यांना केंद्रात संरक्षण आणि अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली.


राजकारण आणि वकीली या व्यतिरिक्त क्रिकेटवरही त्यांचं प्रेम होतं. त्यामुळेच ते दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष राहिले. त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी बीसीसीआयच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारीही पार पाडली.



28 डिसेंबर 1952 रोजी दिल्लीमध्ये जन्मलेल्या अरुण जेटली यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. यानंतर त्यांनी प्रॅक्टिस केली आणि लवकरच सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ तसंच नामवंत वकिलांच्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश झाला.


श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून (एसआरसीसी) पदवीचं शिक्षण घेताना अरुण जेटली 1974 मध्ये विद्यार्थी परिषदेचे अध्यक्षही होते. या काळात काँग्रेस फारच मजबूत होती. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार म्हणून अरुण जेटलींचा विजय हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात म्हटली जाते.