परभणी : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून आजपासून बड्या नेत्यांच्या सभा सुरू झाल्या आहेत. देशाचे पंतप्रधान आज विदर्भ दौऱ्यावर असून धुळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Narendra Modi) सभा पार पडली. तर, राज्यातील दिग्गज नेत्यांच्याही सभांचा धडाका सुरू आहे. त्यातच, पक्षप्रवेश आणि पाठिंबा देण्यासाठी नेतेमंडळी व सेलिब्रिटींची रेलचेल दिसून येते. सोशल मीडियातून प्रसिद्ध झालेले परभणीतील (Parbhani) हवामान अभ्यासक पंजाब डख यांनीही अनेकांचा अंदाज चुकवत राजकीय एँट्री केलीय. पंजाबराव डख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला असून भाजपच्या विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्यासाठी ते प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. मात्र, त्यांच्या या पक्ष प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून पंजाबराव (Panjabrao dakh) यांचा अंदाज अचूक ठरणार का, हे पाहावे लागेल.
भाजप नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते पंजाबराव डख यांनी भाजपात प्रवेश करुन कमळाचा गमछा गळ्यात घातला. हवामान तज्ञ अशी ओळख असलेल्या पंजाबराव डख यांच्या भाजप प्रवेशाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, ऐनि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी भाजपात प्रवेश करुन निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरणार असल्याचं सांगितलंय. आता, जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार तथा उमेदवार मेघना बोर्डीकर यांचा प्रचार ते करणार आहेत. पंजाब डख यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती, त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यानंतर आता वंचित सोडून ते भाजपमध्ये गेले आहेत आणि भाजपचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, वंचितचा अंदाज चुकल्याने ते आता भाजपात गेल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
जिंतूर सेलू मतदारसंघात कोण?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजय भांबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर, काँग्रेसमधून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेले, सुरेश नांगरे यांनाही वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंगात तिरंगी लढत होत आहे.
अकोल्यातही वंचितला दे धक्का
अकोल्यात वंचितला मोठा धक्का बसलाय. पक्षाचे जेष्ठ ओबीसी नेते आणि प्रकाश आंबेडकरांचे विश्वासू प्रा. डॉ. संतोष हुशेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. बाळापुर मतदारसंघातील वाडेगाव येथे उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. डॉ. संतोष हुशेंना वंचितने अकोला पूर्व मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्याने नाराज होतेय. त्यातून त्यांनी वंचितचा राजीनामा दिला होता. डॉ. हुशे अकोला जिल्ह्यातील माळी समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या प्रवेशाने ठाकरे गटाला अकोला पूर्व आणि बाळापुर मतदारंसघात मोठा फायदा होणार आहे.
हेही वाचा