मलकापूर मतदारसंघ हा आता भाजपचा बालेकिल्ला आहे. मलकापूर मतदारसंघात आजवरच्या इतिहासात केवळ दोनच वेळा काँग्रेसला विजय मिळवता आला.  ते वगळता मलकापूर कायमच भाजपच्या ताब्यात राहिला आहे. गेल्या पंचवीस वर्षापासून आमदार चैनसुख संचेती या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. उमेदवारी कोणालाही मिळाली तरी मतभेद विसरून काँग्रेस उमेदवाराला विजयी करू असा निश्चय काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. यामुळे काँग्रेस उमेदवार निश्चितच भाजपा आमदार संचेती यांना आव्हान देणार असे सध्याचं चित्र आहे.

भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मलकापूरचे विद्यमान आमदार चैनसुख संचेती यांनी आपल्या मतदारसंघात भाजपचा विजयाचा झेंडा अबाधित ठेवला आहे.  १९९५ पासून आजपर्यंत आमदार चैनसुख संचेती मलकापूरमधून निवडून येत आहेत. पहिल्यांदा अपक्ष निवडणूक लढवत विजय मिळवणाऱ्या संचेती यांनी नंतर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत विजयाची मालिका कायम ठेवली. काँग्रेसने प्रत्येकवेळी नवीन चेहरा देऊन संचेती यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. मात्र  विरोधकांना आजपर्यंत संचेती यांच्या विरोधात ५० हजाराच्या मतांचा टप्पा सुद्धा पार करता आलेला नाही.


मलकापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इतकंच महत्वाचं शहर आहे. महामार्गावर असल्यामुळे या शहराची अर्थव्यवस्था बऱ्यापैकी महामार्गावरील उद्योग-धंद्याशी निगडित आहे. पण अलीकडे महामार्ग आणि एमआयडीसीची दूरवस्था ही एक प्रमुख समस्या आहे. नांदुरा-जळगाव-जामोद उडाणपूल, मलकपूरचा पाणी प्रश्न, जिगाव प्रकल्पाचे रखडलेले पुनर्वसन आणि काम, उद्योग  किंवा एखादा मोठा प्रकल्प या भागात नसल्यामुळे रोजगारीचा मोठा प्रश्न या भागात कायम आहे. आजही नांदुरा शहरात साधे ग्रामीण रुग्णालय नाही.

मलकापूर विधानसभा मतदारसंघ  : 2014 च्या निवडणुकीत  झालेले मतदान

१) चैनसुख संचेती(भाजप):- 75,965

२) डॉ. अरविंद कोलते (काँग्रेस):- 49,019

३) वसंत भोजने (शिवसेना) :- 26,291

मलकापूर हा पश्चिम विदर्भातल्या बुलडाण्याचा एक तालुका आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघ बुलडाणा जिल्ह्यात असला तरी लोकसभेसाठी हा मतदारसंघ खानदेशातल्या रावेर मतदारसंघाला जोडतात. लोकसभा निवडणुकीत मलकापूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार खासदार रक्षाताई खडसे यांना ६० हजाराचं मताधिक्य मिळालं होतं. त्यामुळे भाजपच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणं काँग्रेससमोर मोठे आव्हान आहे. त्यातच, पक्षातून उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांचे अर्ज आले आहेत. इच्छुकांची यादी लक्षात घेत सक्षम  उमेदवार निवडणं काँग्रेसाठी अडचणीचं ठरणार आहे.

या मतदारसंघात मराठा, लेवा, मुस्लिम, बौद्ध आणि माळी समाजाचे प्राबल्य आहे. मात्र जातीय बंधनात न अडकता अल्पसंख्यांक असलेल्या आमदार चैनसुख संचेती यांच्या पाठीशी गेल्या पंचवीस वर्षापासून इथला मतदार आहे.  संचेती यांच्या पंचवीस वर्षाच्या कामाचा आढावा घेत काँग्रेस त्यांच्यासमोर उभे करण्याचा प्रयत्न करत आहे.

मागील पंचवीस वर्षाच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसने आमदार संचेती यांना पराभूत करण्याकरता जातीय समीकरण पुढे ठेवून काँग्रेस उमेदवार दिले. यामध्ये हाजी रशीद जमादार हे  मुस्लिम तर शिवचंद्र तायडे हे मराठा आणि अरविंद कोलते हे लेवा अशा प्रकारे उमेदवार देऊनही संचेती पराभूत करता आलं नाही.

आता देशात जरी भाजपला अच्छे दिन येत असले तरी मलकापूर मतदारसंघात मात्र भाजप अडचणीत आहे, अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे. त्याचं कारणही तसंच आहे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करणारे हरीश रावळ यांनी मिळवलेले मतदान. ते आज काँग्रेसमध्ये असून मलकापूरचे विद्यमान नगराध्यक्ष आहेत. त्यांच्या काँग्रेसमध्ये येण्याने काँग्रेसला निश्चितच बळ मिळालं आहे.

काही दिवसांपूर्वी नांदुरा शहराचे माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांचाही काँग्रेस प्रवेश झाला आहे. एकडे यांची नांदुरा शहरावर चांगली पकड आहे. गेली वीस वर्षे नांदुरा नगरपालिकेवर त्यांची सत्ता होती. एकडे यांच्या येण्यामुळे सुद्धा काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झालं आहे. मलकापूर मतदारसंघात सध्या काँग्रेस पक्षाकडे नांदुरा बाजार समितीचे सभापती बलदेवराव चोपडे मलकापूरचे नगराध्यक्ष हरीश रावळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते  पद्माराव पाटील, प्राचार्य गजानन बावस्कर आणि माजी नगराध्यक्ष राजेश एकडे यांनी उमेदवारी मागितली आहे.


हे सर्व जरी खरं असलं तरी  मलकापूर विधानसभा मतदार संघासाठी वंचित बहुजन आघाडीकडून नांदुरा येथील निवृत्ती इंगळे आणि नगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंता रामेश्वर वावगे यांनी उमेदवारी मागितली आहे. लोकसभेत वंचित बहुजन आघाडीने निकालाचे चित्र मोठ्या प्रमाणात बदललं होते. याची पुनरावृत्ती विधानसभेतही होईल का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.