एका ठेकेदारची 3 लाख 69 हजार रुपयांच्या बिलाची रक्कम मंजूर करण्याच्या मोबदल्यात चिखलीकर आणि वाघ यांनी त्याच्याकडे 22 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता. त्यानुसार 30 एप्रिल 2013 रोजी लाचलुचपत विभागाने सापळा रचून या दोघांना अटक केली होती. 3 जून 2014 साली याप्रकरणी दोन हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं होतं. तर 7 डिसेंबर 2017 रोजी न्यायालयात या खटल्यावर सुनावणीला सुरुवात झाली.
न्यायालयाने या खटल्यात एकूण 7 साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तपासादरम्यान, चिखलीकर यांच्याकडे 14 कोटी 66 लाख 17 हजार 946 रुपयांची संपत्ती आढळून आली. सुनावणी दरम्यान, 2018 साली 12 जुलै रोजी न्यायालयातून लाचखोरप्रकरणातील मूळ तक्रारदाराच्या तक्रारीची फाईल गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला.
यानंतर सुनावणी पूर्ण झाल्यावर आज निकाल जाहीर झाला, ज्यात न्यायालयाने ठोस पुराव्याअभावी चिखलीकर आणि वाघ यांची निर्दोष मुक्तता केली.