जिल्ह्यातील सर्वाधिक लक्ष लागून असलेला मतदारसंघ म्हणून यावर्षी मुक्ताईनगरकडे पाहिले जात आहे. कारण गेली ४० वर्षे एकनिष्ठेनं भारतीय जनता पक्षाचे सेवेकरी राहिलेले आणि कायम निवडून येत असलेले आमदार एकनाथराव खडसे यांचा हा मतदारसंघ आहे. सध्या एकनाथराव खडसेंना पक्षाने चारही बाजूने कोंडीत पकडत त्यांना मंत्रीमंडळातून दूर केलं आहे.


विरोधी पक्षनेते म्हणून ज्यांनी सभागृह दणाणून सोडले होते असा करारी आवाज आज स्वपक्षानेच दडपला आहे. स्वत: आमदार एकनाथ खडसे यांनी अनेकदा जाहीर भाषणात याबाबत सूचक वक्तव्य केलंय. नुकतंच शेवटचं विधानसभा अधिवेशन पार पडलं त्यावेळी देखील त्यांनी नालायक आणि भ्रष्ट आमदार म्हणून येथून जायचे नाही, असं म्हणत भावनांना वाट करून दिली होती.

सत्ताधारी गटाकडून नाथाभाऊ खडसेना तिकीट मिळणार की नाही अशा अफवा उठवल्या गेल्याची आहेत.  जिल्ह्याला भाजपचा बालेकिल्ला बनविण्यात ज्यांचा वाटा राहिला आहे, अशांपैकी एक महत्वाची व्यक्ती एकनाथ खडसे यांची ओळख आहे. आमदार  खडसेंवर लावण्यात आलेले आरोप, त्यांच्यावरील चौकश्या समित्या या सर्व चक्रव्यूहातून त्यांची सुटका झाली असली तरीही भाजपमधील त्यांना विरोध करणारा गट अजूनही शांत बसलेला नाही.

मागील विधानसभा निवडणुकीत २०१४ साली भाजपा विरुद्ध शिवसेना अशी लढत रंगली. एकनाथराव खडसेंविरुद्ध शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील अशी लढत झाली होती. सुमारे १० हजार मतांच्या फरकाने एकनाथ खडसे विजयी झाले.  पाचवेळा निवडून आलेल्या खडसेंना चंद्रकांत पाटील यांनी कडवी झुंज दिली होती. तब्बल एक दशकापासूनची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची छुपी युती या निवडणुकीत उघड झाली. याठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे सक्षम उमेदवार असले तरी भाजप-शिवसेनेपुढे ते पूर्ण नापास होतात हा इतिहास आहे. भाजपा शिवसेना युती झाली तर मात्र चंद्रकांत पाटील यांच्यासाठी तिकीट मिळणे अवघड होणार आहे. त्यांना अपक्ष लढणं किवा युतीच्या उमेदवाराचा प्रचार करणं एवढेच पर्याय त्यांच्यापुढे असतील. असं झालं तर यंदा मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात वेगळे चित्र पाहायला मिळेल यात काही शंका नाही.

पक्षांतर्गत कारवाया आणि गिरीश महाजनांच्या नेतृत्वाचा उदय झाल्याने खडसे पक्षात मागे पडले आहेत. यावेळी स्वतःची उमेदवारी मिळवणंदेखील नाथाभाऊंसाठी मोठं आव्हान असल्याचं पक्षात बोललं जात आहे. खडसे यांनी स्वत: लढण्याची तयारी दाखवल्यास जागा शिवसेनेला सोडण्याची खेळी देखील भाजपा करण्याची शक्यता आहे. युती न झाल्यास खडसेंना थांबविण्यासाठी भाजपकडूनच शिवसेनेला रसद पुरविली जाऊ शकते अशीही एक चर्चा आहे. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचीही चांगली ताकद आहे. या मतदारसंघातही गिरीश महाजन यांची भूमिका महत्वाची ठरण्याची शक्यता आहे.

एकनाथराव खडसे यांना अथवा त्यांच्या घरातील व्यक्तीला उमेदवारी जर दिली गेली नाही तर खडसे काय भूमिका घेतात, त्यातून भाजपला नुकसान किंवा फायदा काय होईल हे चित्र नक्कीच पाहण्यासारखे राहील.

मुक्ताईनगर मतदारसंघ लेवा पाटीदार बहुल समाज आहे. मात्र मराठा आणि कोळी समाजाचेही तेवढंच प्राबल्य आहे. त्यामुळे एकनाथराव खडसेंना स्वपक्षातील नेते, कार्यकर्ते कितपत मदत करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यंदा एकनाथराव खडसेंसह त्यांच्या कन्या अॅड. रोहिणी खडसे, माजी जिप अध्यक्ष अशोक कांडेलकर हे भाजपाकडून इच्छुक असल्याचं चित्र असून शिवसेनेकडून चंद्रकात पाटील यांच्याशिवाय अजूनतरी कोणी इच्छुक नाही. कॉंग्रेसचे जगदीश पाटील, एसए भोई, राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अॅड.रविंद्र पाटील, विनोद तराळ, वंचित बहुजन आघाडीकडून नितीन कांडेलकर, संतोष बोदडे यांची नावे चर्चेत आहेत.