Malabar Hill Vidhan Sabha Constituency 2024 : दक्षिण मुंबईतील (South Mumbai) अत्यंत महत्त्वाचा आणि श्रीमंत मतदारसंघ म्हणजे, मलबार हिल मतदारसंघ (Malabar Hill Constituency). मलबार हिलमधील मतदारांनी आपला आमदार म्हणून पुन्हा एकदा भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांची निवड केली आहे. मतदारसंघात मंगलप्रभात लोढा यांनी दमदार विजय मिळवला आहे.
मलबार हिलमध्ये गुजराती, जैन आणि मराठी मतदारांची संख्या या मतदारसंघात अधिक असल्याचं पाहायला मिळतं. राज्याचा गाडा हाकणाऱ्या सरकारमधील प्रमुख मंत्र्यांची निवासस्थानं याच मतदारसंघात आहेत. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उच्चभ्रू मतदारसंघातही चुरस रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. मलबार हिलमध्ये प्रामुख्यानं महायुती (Mahayuti) विरुद्ध महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) अशी लढत होणार आहे. महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर, लोढांसमोर तगडं आव्हान म्हणून महाविकास आघाडीनं मराठी उमेदवार न देता, चक्क एका जैन उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे भेरुलाल दयालाल चौधरी (Bherulal Dayalal Choudhary) निवडणूक लढवली होती. पण मंगलप्रभात लोढा यांनी भेरुलाल चौधरी यांचं आव्हान मोडीत काढत दणदणीत विजय मिळवला.
2024 च्या विधानसभेच्या रिंगणात कोण आमने-सामने?
उमेदवाराचं नाव | पक्ष |
मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) | भाजप (महायुती) (विजयी) |
भेरुलाल दयालाल चौधरी (Bherulal Dayalal Choudhary) | शिवसेना : ठाकरे गट (महाविकास आघाडी) |
2019 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल
भाजपचे मंगल प्रभात लोढा यांना 93,538 मतं मिळाली (विजयी)
काँग्रेसच्या हिरा नवाजी देवासी यांना 21,666 मतं मिळाली
लोकांनी NOTA ला 5,392 मतं दिली.
2014 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल
भाजपच्या मंगल प्रभात लोढा यांना 97,818 मतं मिळाली (विजयी)
शिवसेनेचे अरविंद दुधवडकर यांना 29,132 मतं मिळाली.
मतदारसंघाबाबत थोडंसं...
मुंबई शहर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. मलबार हिल हे मुंबईतील उच्चभ्रू वस्ती असलेला भाग. अनेक व्यावसायिक आणि चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींची घरंही इथेच आहेत. एवढंच काय तर राज्याच्या कारभाराचा गाडा हाकणाऱ्या सरकारमधील मोठमोठ्या मंत्र्यांची शासकीय निवासस्थानंही याच भागात आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा बंगला, सरकारी अतिथीगृह सह्याद्री, व्हीव्हीआयपी राज्य अधिकाऱ्यांची अधिकृत निवासस्थानं, जिना कुटुंबाची साऊथ कोर्ट मॅन्शन, हँगिंग गार्डन, जैन मंदिर आणि बाणगंगा या प्रसिद्ध ठिकाणांचा समावेश या मतदारसंघात आहे.
उच्चभ्रू इमारतींपासून ते खोताची वाडी सारख्या ऐतिहासिक वारसा असलेल्या चाळी तसंच गिरगाव, अल्ट्रामाऊंट रोड, नाना चौक असे विविध भागही याच मतदारसंघात येतात. मराठी,गुजराती, जैन, मुस्लिम नागरीक या मतदारसंघातील नागरीक आहे. मलबार हिल मतदार संघात पिण्याच्या पाण्यापासून ते पार्किंगपर्यंत बऱ्याच समस्या आहेत.
दरम्यान, यंदा राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत रंगणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील फुटीनंतर राज्यात मोठी उलथापालथ झाली. पक्ष चिन्ह आणि नावाची लढाई यंदाच्या निवडणुकीत आता थेट अस्तित्वापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रत्येक पक्षासाठी तेवढीच महत्त्वाची होती. अशातच मुंबईतील सर्वात श्रीमंत मतदारसंघ कुणाच्या पारड्यात पडणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच मंगलप्रभात लोढा यांनी सातव्यांदा आमदार होत मलबार हिल मतदारसंघावरचं आपलं निर्विवाद वर्चस्व कायम ठेवलं आहे.