Mohol Assembly Election : मोहोळ विधानसभा (Mohol Vidhansabha) मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी आमदार रमेश कदम यांची कन्या सिद्धी कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळं नाराज झालेल्या संजय क्षीरसागर (Sanjay Kshirsagar) यांनी बंडाचे निशाण फडकावलंय. या बंडखोरीनं शरद पवार गटाच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमधून शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश केलेले संजय अण्णा क्षीरसागर यांनी उमेदवारी डावलताच त्यांनी बंडखोरीचे निशाण फडकवले आहे. आता कोणत्याही परिस्थितीत आर या पारची लढाई होईल अशी भूमिका क्षीरसागर यांनी घेतली आहे. लोकसभा निवडणुकीत संजय क्षीरसागर यांना विधानसभा उमेदवारीचे आश्वासन दिल्यावरच त्यांचा प्रवेश झाल्याचा दावा क्षीरसागर समर्थक करत आहेत.
29 ऑक्टोबरला क्षीरसागर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार
मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघातून पहिल्यापासून संजय क्षीरसागर यांची उमेदवारी नक्की मानली जात होती. मात्र यानंतर शरद पवार गटाने धक्का तंत्र वापरत सिद्धी रमेश कदम यांना उमेदवारी दिली. आज उमेदवारी जाहीर केल्याने क्षीरसागर समर्थकात मोठी नाराजी पसरली होती. गेले आठ दिवसापासून मुंबईत उमेदवारीसाठी तळ ठोकून बसलेल्या क्षीरसागर यांना आज सिद्धी कदम यांचे उमेदवारी जाहीर होताच मोठा धक्का बसला. यानंतर आक्रमक कार्यकर्त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची भूमिका घेतली आहे. परवा म्हणजे 29 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटटा दिवस आहे. या दिवशी संजय क्षीरसागर अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मतदार संघातील प्रत्येक गावात त्यांचा मोठा गट
संजय क्षीरसागर यांनी मोहोळ विधानसभेची निवडणूक यापूर्वीही लढवून मोठ्या संख्येत मते मिळवली होती. भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून मोहोळ तालुक्यात त्यांची ओळख असून मतदार संघातील प्रत्येक गावात त्यांचा मोठा गट आहे. क्षीरसागर यांची बंडखोरी शरद पवार गटाला डॅमेज करणार अशी स्थिती आहे. संजय क्षीरसागर हे जरी खाटीक धनगर या समाजाचे असले तरी मोहोळमधील मोठ्या संख्येने असणारा धनगर समाज हा सुरुवातीपासून त्यांच्यासोबत आहे. लोकसभा निवडणुकीत क्षीरसागर यांच्या प्रयत्नाने खासदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ मधून मोठी आघाडी मिळू शकली होती. लोकसभेपासूनच संजय क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याने आता फक्त त्यांचे कार्यकर्ते उमेदवारीच्या एबी फॉर्म ची वाट पाहत होते. आज मात्र पवार गटाने अचानक सिद्धी रमेश कदम यांच्या नावाची घोषणा केल्याने संजय अण्णा क्षीरसागर यांच्या गटाने बंडखोरीचे निशाण फडकवले आहे.
संजय क्षीरसागर शरद पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीत
मोहोळ विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार रमेश कदम हे उमेदवारी मागत असताना पवार गटाने धक्का देत या ठिकाणी त्यांच्या मुलीला उमेदवारी दिली. खरे तर कालपर्यंत संजय क्षीरसागर यांची उमेदवारी पक्की असे मानले जात होते. त्या पद्धतीने त्यांना पक्षाकडून संकेतही देण्यात येत होते. मात्र शरद पवारांनी नेहमीच्या शैलीत शिरसागर यांना धक्का दे उमेदवारी कापल्याने आता संजय क्षीरसागर ही शरद पवार गटाला धक्का देण्याच्या तयारीला लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या: