Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तसतशी कार्यकर्त्यांची धावपळ उडालेली पहायला मिळते. रायगड जिल्ह्यातील उरण मतदार संघात सध्या अपक्ष लढलेले आणि अपक्ष म्हणून विजयी झालेले महेश बालदी यांची चांगली पकड आहे. त्यांनी राज्यातील सत्ता स्थापन करताना भाजप ला पाठींबा दिला मात्र यंदाच्या जवळ येऊ ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये या मतदार संघात कोण बाजी मारणार असा प्रश्न सर्वांना पडून राहिलाय.शिवसेनेच्या मनोहर भोईर यांचा मागच्या निवडणूकीत 5 हजार 710 मतांनी पराभव झाला, त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची देखील मोठी ताकद या मतदार संघात असल्याचे दिसण्यात आलं. मनोहर भोईर यांचा निसटता पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. यंदाच्या  निवडणूकीत पुन्हा ते उभे राहणार असल्याची जोरदार चर्चा आहे. तर तिसरीकडे शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नावाची देखील शेकाप मधून जोरदार चर्चा आहे.


उरण मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात प्रितम म्हात्रे उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी नाव चर्चेत राहिलेले शेकाप चे माजी आमदार विवेक पाटील यांच्या पराभवानंतर पक्षाची धुरा तरुण आणि तडफदार कार्यकर्ते प्रीतम म्हात्रे यांच्या हातात आता  देण्यात आली आहे. त्यामुळें एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असणारा उरण मतदार संघ विवेक पाटिल यांच्या पराभवामुळे निसटला.आता मात्र पुन्हा हातातून गेलेला मतदार संघ मिळविण्यासाठी प्रीतम म्हात्रे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जोरदार या मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेताना दिसत आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उरण मतदार संघातून तिहेरी लढत झालेली सर्वांनी पाहिली, यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे विवेक पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे मनोहरशेठ भोईर तर अपक्ष लढलेले महेश बालदी या तिहेरी लढतीत महेश बालदी विजयी झाले. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा एकेकाली बालेकिल्ला असणारा हा गड पुन्हा गमवावा लागला होता .मात्र तो पुन्हा मिळवण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने तरुण चेहरा म्हणून प्रीतम म्हात्रे यांची निवड केली आहे, तिथं म्हात्रे यांनी शेकापचा वर्धापन दिनाच्या दिवशीच उरण मध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत एक सभा आयोजित केली होती यावेळी त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करतं मतदार संघात आपली छाप उमटविण्यास सुरूवात केली आहे.


शेकापला सध्या नव्या चेहऱ्याची प्रतीक्षा होती, प्रितम म्हात्रे यांचा पनवेल महानगर पालिकेतील नगरसेवक,ते विरोधी पक्ष नेते असा  राजकिय प्रवास आहे शिवाय त्यांना राजकारणाची आवड असल्याने या विधानसभेत त्यांचा करिश्मा कामी येऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्याचे आमदार आणि अपक्ष लढलेले महेश बालदी हे भाजपकडून उमेदवारी लढण्यासाठी  इच्छुक असल्याचे बोलले जातय, त्यामुळे त्यांना महायुतीकडून पुन्हा भक्कम पाठींबा मिळू शकतो.तर मनोहर भोईर यांना  पक्षात पडलेली फूट पाहता मोठी ताकद स्वबळावर तयार करावी लागणार आहे.त्यामुळे होणाऱ्या निवडणूकीत कोण बाजी मारेल हे पुन्हा उरण कर च सांगू शकतील.


2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय घडलं?


2019 मध्ये हा मतदारसंघ अपक्ष उमेदवाराने जिंकला होता.उरण हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी शिवसेनेचे मनोहर गजानन भोईर यांचा 5710 मतांनी पराभव करून विजय मिळवला.


संबंधित बातमी:


रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती`