Sadabhau Khot on Sugarcane : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) कोणीही मतदानापासून वंचित राहू नयेत याकरिता यावर्षीचा साखर गळीत हंगाम हा 21 नोव्हेंबरनंतर सुरु करावा असे मत रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी व्यक्त केलं. राज्यातील साखर कारखान्यांचा 2024-25 चा गळीत हंगामाला 15 नोव्हेंबरपासून प्रारंभ होणार आहे. मात्र, गावोगावच्या टोळ्या येण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं ऊसतोड मजुर मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ऊसाचा गळीत हंगाम  21 नोव्हेंबरपासून सुरु करावा अशी मागणी खोत यांनी केली आहे. 


21 नोव्हेंबरनंतर सुरू करणेबाबतचा सुधारित अध्यादेश काढावा


विदर्भ, मराठवाड्यासह राज्यभरातील ऊसतोड मजुरांच्या टोळ्या राज्यभरात गावोगावी दाखल होऊ लागल्या आहेत. परंतू, आपल्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलं आहे. निवडणुकीचं मतदान 20 नोव्हेंबरला आहे. त्यामुळं साखर कारखान्याचा गळीत हंगाम 15 नोव्हेंबरला चालू केल्यास ऊस तोडणी कामगार व संबंधित इतर लोक हे मतदानापासून वंचित राहतील. त्यामुळं वरील बाबीचा गांभीर्यानं विचार करुन कोणीही मतदानापासून वंचित राहणार नाही, यासाठी या वर्षीच्या गळीत हंगाम हा 21 नोव्हेंबरनंतर सुरू करणेबाबतचा सुधारित अध्यादेश काढावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राज्याचे साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे. राज्यामध्ये 22 लाख ऊसतोड कामगार आहेत. त्यातील एकट्या बीड जिल्ह्यात चार लाख 85 हजार मजूर आहे.


15 नोव्हेंबरपासून ऊसाचा गाळप हंगाम सुरू होणार


गाळप हंगाम सुरू करण्यासाठी 15 नोव्हेंबर ही तारीख एकमताने ठरवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मागील वर्षीच्या तुलनेत 15 दिवसांनी उशिरा साखर कारखाने सुरू होणार आहेत. राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर परिसरातील ऊस मोठ्या प्रमाणावर कर्नाटक राज्यातील साखर कारखान्यांसाठी जातो. पण यंदा कर्नाटक राज्यातही साखर कारखाने 15 नोव्हेंबर रोजी सुरू होणार आहेत. त्यासंदर्भातील पत्र त्यांनी महाराष्ट्रातील राज्याला दिल्यामुळे आपण 15 नोव्हेंबर रोजी गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानंतर राज्यात निवडणुकांची घोषणा झाली आहे. 


दरम्यान, येत्या 20 नोव्हेंबरला राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला विधानसभेचा निकाल लागणार आहे. दरम्यान, ऊसतोडणीसाठी अनेक ठिकाणचे कामगार ऊस पट्ट्यात दाखल झाले आहे. त्यांना देखील मतदानाचा हक्क बजावता आला पाहिजे. यासाठी ऊसचा गळीत हंगाम 21 नोव्हेंबरपासून सुरु करावा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे.