Maharashtra Vidhan Sabha Election 2024: राज्यात 20 नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील सर्वंच पक्षांनी तयारी केली आहे. तर भाजप, काँग्रेस, शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने यादी जाहीर केली आहे. रायगडमधील पेण विधानसभा मतदारसंघात (Pen Assembly Constituency) देखील शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्यात खरी लढत होणार आहे. 


पेण सुधागड मतदार संघात देखील युतीकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसून विद्यमान आमदार रवी पाटील यांच्या वयाचा विचार करता त्यांना भाजपने उमेदवारी देण्याबाबत थांबा घेतला आहे. त्यांचे सुपुत्र वैकुंठ पाटील उमेदवारी लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र वैकुंठ पाटील यांना जनतेतून पाहिजे तितकी पसंती मिळतं नसल्याने भाजपने अद्यापही वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. मात्र दुसरीकडं भाजपमधून बंडखोरी करतं अपक्ष लढण्याच्या तयारीत असणारे प्रसाद भोईर यांनी मात्र थेट मातोश्री गाठली आणि उमेदवारीच जाहीर करून आणली. त्यामुळे भोईर यांना अधिकृत उमेदवारी मिळाल्याने आता त्यांना पक्षाची ताकदसुध्दा मिळणार आहे. त्यामुळे अगोदरचभाजप मध्ये असताना युवा वर्गाची मोठी ताकद त्यांनी आपल्या पाठीशी बांधून ठेवली होती ती फळी भोईर यांना निवडणुकीसाठी कामी येणार आहे. त्यांचा बोलबाला या मतदार संघात जास्त असल्याने भाजप पुढे आता मविआ चे उमेदवार प्रसाद भोईर यांचं मोठं आव्हाहन उभे राहिले आहे. त्यामुळे ऐनवेळेस भाजप रवी पाटील यांच्या बदल्यात कोणाला उमेदवारी देईल हे सुध्दा पाहणे महत्वाचे राहील. शेकापकडून या मतदार संघात नवीन चेहरा असलेल्या अतुल म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली असली तरी प्रसाद भोईर आणि त्यांच्यात लढाई झाल्यास कोणाला जास्त मताधिक्य असेल हे पाहणे महत्वाचे राहील.

2019 मध्ये काय घडलेलं?


पेण मतदारसंघ 2019 मध्ये हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. पेण महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये, भारतीय जनता पक्षाचे रवीशेठ पाटील यांनी 24051 मतांच्या फरकाने भारतीय शेतकरी आणि कामगार पक्षाचे धैर्यशील मोहन पाटील यांचा पराभव करून जागा जिंकली.


रायगड जिल्ह्यात महायुतीचं वर्चस्व-


नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाच्या सुनील तटकरे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे नितीन गिते यांना पराभवाचा सामना करावा लागला. रायगड जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 3, भाजप 2, राष्ट्रवादी काँग्रेस 1 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी झाले होते. सध्याचा विचार केल्यास रायगड जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असल्याचे दिसून येतंय. कारण शिवसेनेचे तीनही आमदार सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. तर अदिती तटकरे देखील महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार गटासोबत आहेत. 


संबंधित बातमी:


रायगड जिल्ह्यात कोणाचं वर्चस्व, महायुती की महाविकास आघाडी?, संपूर्ण आमदारांची यादी; जाणून घ्या सध्याची राजकीय स्थिती