सोलापूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) सध्या धूम आहे. अनेक नेतेमंडळी मोठ्या उत्साहात आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. दुसरीकडे राज्यातील राजकीय पक्षदेखील वेगवेगळ्या जागांसाठी आपले उमेदवार घोषित करत आहेत. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे माढा या मतदारसंघाकडे लक्ष लागले आहे. कारण या जागेसाठी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीने तसेच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. त्यामुळे येथील लढत नेमकी कोणत्या नेत्यांनमधून होणार? याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.      


अजित पवार यांची नेमकी रणनीती काय?


माढा विधानसभा मतदारसंघाचा घोळ अजूनही मिटलेला नाही. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अद्याप या जागेसाठी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळेच या जागेसाठी अजूनही अजित पवार गटाचा उमेदवार जाहीर झालेला नाही. 29 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. असे असताना शरद पवार गटाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. त्यामुळे येथे शरद पवार यांचा पक्ष कोणच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांच्या पक्षाकडून ज्या नेत्याला तिकीट नाकारलं जाईल, त्याला अजित पवार यांचा पक्ष तिकीट देणार आहे. त्यामुळेच शरद पवार पक्षाकडून अजूनही उमेदवारी जाहीर करण्यास विलंब होत आहे. परिणामी माढ्यातील लढत फारच चुरशीची ठरणार आहे. 


चारपैकी कोणला तिकीट मिळणार?


मिळालेल्या माहितीनुसार माढा या मतदारसंघासाठी शरद पवार यांच्या पक्षाकडून आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजीत शिंदे, भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि अभिजीत पाटील या चार नावांचा विचार केला जात आहे. या चारपैकी कोणत्याही एका नेत्याला येथून तिकीट मिळणार आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या गटाने उमेदवारी जाहीर केल्यावर अजित पवार यांच्या गळाला कोण लागणार याकडेही माढा विधानसभेचं लक्ष लागलं आहे.


आज शरद पवार निर्णय घेणार?


सूत्रांच्या माहितीनुसार शरद पवार यांनी आज (28 ऑक्टोबर) संध्याकाळी पाच वाजता काही इच्छुकांना बारामतीमध्ये बोलावले आहे. त्यामुळे शरद पवार गटाचा उमेदवार 29 ऑक्टोबर रोजी सकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. असे असताना अजित पवार यांची राष्ट्रवादी किंवा महायुती माढ्यात काय करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


हेही वाचा :


"...तर महाविकास आघाडीची अडचण होईल" ? मीरज जागेवरून राऊतांचं रोखठोक विधान; काँग्रेसच्या भूमिकेवर थेट सांगून टाकलं!


Maharashtra Assembly election 2024: ज्याच्यासाठी अट्टाहास केला तेच हातातून गेलं, पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यातून ठाकरे गट हद्दपार